ग्रंथपालांना समर्पित - "माणूस माझी जात"*
*ग्रंथपालांना समर्पित - "माणूस माझी जात"*
लहान असताना टीव्ही घरी आला तेव्हा दर बुधवारी ६.३० वाजता 'सुंदर माझं घर' असायचं. एकच चॅनेल असल्याने कुठलाही कार्यक्रम अगदी मन लावून बघितला जायचा. एक गो-या घा-या बाई दिसत 'सुंदर माझं घर' मध्ये.. त्या काय बोलत किंवा तो कार्यक्रम नीट कळण्याचं ते वय नव्हतं पण पद्मजा फाटक हे नाव कुठेतरी स्मरणात राहिलं..
थोडं मोठं झाल्यावर आईने वाचनाची गोडी लावली.. गोष्टी , कथा , थोड्या मोठ्या वयात कादंबऱ्या बरोबरच हळूहळू ललित वाचू लागले आणि.. एक छान खजिना हाती गवसल्यासारखं झालं.. रविवार लोकसत्तातलं पण ललित मी गोडीने वाचत असे.. मैत्रिणीकडे महाराष्ट्र टाईम्स यायचा.. तेव्हा पद्मजा फाटकांचे काही लेख वाचनात आले.. ह्याच त्या 'सुंदर माझं घर' वाल्या हे कळलं.
माणूस_माझी_जात हा असाच त्यांचा ललितलेखसंग्रह.. एकूण १५ लेखांचा.. किती ओघवती आणि खुसखुशीत भाषा..
हे पुस्तक त्यांनी त्यांच्या लेखन-वाचन-अभ्यासात सहभागी होणा-या सगळ्या आस्थेवाईक आणि निरपेक्ष ग्रंथपालांना अर्पण केलंय.. आणि याच पुस्तकात #वाचनालयं_अशी_वागतात हा त्यांचा सुंदर लेख आहे.. आयुष्यात पाहिलेली तमाम वाचनालयं, तिथे आलेले ग्रंथपालांचे प्रेमळ अनुभव आणि त्याच लेखाच्या सुरुवातीचं त्यांचं एक अत्यंत सुंदर व मला भावलेलं वाक्य.. ग्रंथालय चालवणं हे एक शास्त्र आहे आणि ते वाटतं तितकं सोपं आणि कंटाळवाणं नाही हे सुदैवाने मला फारच लौकर कळलं आणि त्यामुळे ग्रंथपालाला कारकून समजण्याची चूक मी कधी केली नाही. किती कृतज्ञता!! त्या लेखात त्यांनी बडोद्यातल्या एका काचमहालासारख्या लायब्ररीचं इतकं सुंदर वर्णन केलंय
वाचल्यावर आपण तिथे फिरून आल्यासारखं वाटतं.
तसेच सुट्टीतलं घर हा एक अजून मनाला मोहवणारा लेख.. त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईवडिलांनी लोणावळ्याला बांधलेलं ते सुट्टीतलं घर, तिथली मजा सगळी त्या आपल्या डोळ्यांसमोर उभ्या करतात!! त्या म्हणतात.. "अर्थशास्त्रीय दृष्ट्या सुट्टीतलं घर ही आईबाबांच्या आयुष्यातली घोडचूक की गोडचूक? या पर्यायी घरानं आमच्यासारख्या कट्टर शहरी, मूळ गाव, त्याचा मागही हरवून बसलेल्या कुटुंबाला जे दिलं ते कुणी देऊ शकलं असतं का?"
खूप अंतर्मुख करणारं वाक्य..
तसेच खेळणी, गच्ची विसरत चाललेले आपण याबद्दल गच्ची_आणि_आपण, कॅशिया, मुंबईतील माणसांबद्दल हृद्य आणि चपखल वर्णन करणारा लेख #महानगरातील_माणसं .. आणि इतरही सुरेख लेख..
मिर्च मसाला या सिनेमाबद्दल समरसून लिहून त्यांनी पूर्ण सिनेमा डोळ्यांपुढे उभा केलाय आणि त्या लाल रंगाची जणू उधळण केलीय
लेखिका पद्मजा फाटक यांनी कादंबरी, कथासंग्रह, ललित लेख संग्रह ,चरित्र, प्रवास वर्णन ,बालसाहित्य अशा कितीतरी विषयावर लेखन केलेले आहे
सहज, सोपी, प्रत्यक्ष अनुभव आपल्या शब्दात स्पष्टपणे मांडणी हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य.
इतकी वर्ष लिहून झाल्यावरही वाटतं की,लिहिणे सोपे नाही.आणि इतकी वर्षे जगून झाल्यावरही वाटतं की जगणं देखील सोपं नाहीच आणि जगण्याबद्दल लिहिणं तर तिप्पट कठीण!.
माणूस माझी जात या लेखाने अनेक शिव्या आणि ओव्याही पदरात बांधून गेलेला लेख असे पद्मजा फाटक म्हणतात.
त्या म्हणतात की,मला आठवतं माझ्या लहानपणी मी चांगली मोठी होईपर्यंत मला आपली जात काय आहे हे ठाऊकच नव्हतं . हुशारी काय फक्त जातीवरच असते असं नाही.
अठराव्या वर्षी लग्न करून पद्मजा महाराष्ट्रात पुण्यात आल्या आणि कितीतरी जाती-पोटजाती पाया-पायातच वळवळ करु लागल्या.
खरंतर मैत्री करताना जात कधीच पाहू नये चांगले वागणुकीच्या मुलींची मैत्री करावे एवढीच माझी आईची फारशी घट्ट नसलेली अट होती पण जाती मोडणं कधीच शक्य नाही,माणूस आहे तेथे जाती आहेतच. वर्णभेद ,धर्मभेद,मतभेद प्रांतभेद काही असो कमीजास्त लेखन आहेच.
माणसं म्हणजे काही कारखान्यात निर्माण केलेल्या साबणवड्या नाहीत. त्यांच्यात भेद विविधता,श्रेष्ठ-कनिष्ठ पण राहणारच. बुद्धी रंग-रूप मत कर्तुत्व याबाबतीत तफावत असणारच पण गुणांपेक्षा कुळाला कधीच किंमत दिली जाऊ नये.
.शेवटी पद्मजा फाटक म्हणतात ,यापुढे
माझं कर्तव्य म्हणजे माझ्या मुलांना मी माणूस आपली जात आहे असे ओळखून असं मानायला शिकवलं*. 'माणूस माझी जात' हे लिहिणे मांडणं म्हणून जितका सोप्प आहे तितकं तसं वागणं सहज शक्य नाही*.
प्रारंभी इंग्लिश वाचायला मिळालं नाही की जिव कासावीस होत असे तसंच हळूहळू मराठी साठी होऊ लागलं
विचारांची,वाचनाची भोवतालची भाषा एकच,लेखकही त्यातलेच यात काही वेगळ्याच गरजा निभून मीही माझ्या भाषेने लिहू लागली.
ग्रंथालय चालवणं हे एक शास्त्र आहे आणि ते वाटतं तितकं सोपं आणि कंटाळवाणे नाही. चांगले शिंपी, डॉक्टर्स, शिक्षक भेटतात तसेच ग्रंथपाल भेटणे गरजेचे आहे. चांगला ग्रंथपाल वाचकाला ग्रंथप्रेमातून ग्रंथभक्तीकडे नेतो, त्याचं वाचन सकस, समृद्ध करतो असं त्यांचं मत आहे.वाचकाला त्याचे पुस्तक आणि पुस्तकाला त्याचा वाचक मिळवून देणं अनेक ग्रंथपाल हे करत असतात.
अखेर ग्रंथालय ही सेवा असते,दुकान नव्हे .वाचक हा वर्गणीदार असतो, ग्राहक नव्हे. अभ्यासक हा रसिक असतो,विद्यार्थी नव्हे.
शिक्षणाप्रमाणेच वाचन हा माणसाचा अधिकार असायला हवा.
'
"कॅशिया" या झाडा बद्दल त्यांनी सुरेख वर्णन केले आहे.
पसरट, पिवळ्या पाकळ्या आणि मधोमध केशरी पराग. पण कॅशियाचं फुल एकटक पाहण्यात मजा नसते*. कॅशियाचंही कुठेतरी अनपेक्षित ठिकाणी उभं राहून डोक्यावर शेकडो एकरंगी फुलपाखरं वागावने निशब्दपणे चालेलले असते.
"कॅशिया "म्हणजे ज्या कारणामुळे आवडतो, बरोबर त्याच्याविरुद्ध कारणामुळे लेखिकेला सूर्यफूल आवडू शकतं.सूर्याबरोबर,माणसांवरही इम्प्रेशन मारण्यासाठी त्याची दिवसभर चाललेली धडपड.
खरा "कॅशिया "आपल्या मनातच असतो. मनातलाच कॅशिया आपल्याला फुलं पुरवित असतो म्हणूनच काहीना तो लहानपणी दिसतो, काहींना उशिरा पावतो आणि काहीकाहींना कधीच मिळत नाही. कॅशियाचं फुल कधीच आत्महत्या करत नाही, एरवी ते जमिनीवर पडल्यावरही हसरे कसं दिसेल?
पावसाळा सुरुवात झाली की कॅशिया आपल्या फुलाफुलांची छत्री या वर्षा पुरतं मिटून टाकत असतो.
खेळणे या लेखामध्ये आपल्याला मिळालेल्या खेळण्याची हौस मोठेपणी पालक आपल्या मुलांना घेऊन भागवीत असावेत ,तसेच खेळासाठी कुठले वयाचं बंधन नसावे,खेळ हे लहान मुलांसाठीच असावाअसं नाही सर्व वयातील लोकांना खेळाचा अनुभव ,आनंद घेता आला पाहिजे अशा कितीतरी विषयावरती लेखिका पद्मजा फाटक यांनी अतिशय वास्तव शब्दात वर्णन केले आहे.
स्वतःवर सहज प्रेम करण्याची क्षमता फारच थोड्या माणसाकडे असते. माणसाने माणसाकडे माणुसकीने पाहणं हे माणुसकीचं खूप मोठं लक्षण आहे*
प्रत्येक भागातील,प्रांतातील तिथल्या परिस्थितीवर माणुसकीचं दर्शन घडत असतं,मग ते मुंबई सारख्या लोकल ट्रेन मध्ये आपणास पहायला मिळेल का? माणसांमध्ये नोकरवर्ग,कामगार वर्ग या दोन्हीचा त्यांच्या वागणुकी मध्ये काय परिणाम दिसेल का? असे कितीतरी प्रश्न आपल्याला भेडसावत असतात.
पण शेवटी माणूस ही एकच जात आहे अन त्याही पलिकडे माणुसकी जपणं हे माणुसकीचे आणि आपल्या सर्वांचेच फार मोठं कर्तव्य आहे .असं मला तर वाटतं..
आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये माणुसकी जपणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं काम आहे, पण शेवटी आयुष्यामध्ये पैसा ,धनसंपत्ती,जात इ. काहीच शिल्लक राहत नाही. शिल्लक राहते ती फक्त माणुसकी आणि माणुसकीच.........
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment