सांगावेसे वाटले, म्हणून

सांगावेसे वाटले, म्हणून


काही पुस्तके आपण एखाद्या प्रदर्शनातून किंवा पुस्तकालयातून विकत घेतो. पुस्तकाच्या कपाटात व्यवस्थित ठेवतो.नंतर वाचू नंतर वाचू करता करता वाचल्याच जात नाही. आपण आपल्याच कामात आणि धावपळीत इतके मग्न होतो की आपल्या आवडत्या लेखिकेचं पुस्तक आपण विकत घेतलंय हे विसरून पण जातो. मग कधीतरी कपाट साफ करताना किंवा दुसरं पुस्तक हुडकून काढताना हे पुस्तक हाती लागतं .आपण त्याला बाहेर काढतो. असली-नसली धुळ झटकतो,आणि चाळता चाळता,वाचता-वाचता इतके रंगून जातो की असं वाटतं, अरे !आतापर्यंत का नाही वाचला आपण हा सकारात्मक प्रेरणा देणारा खजाना? आतापर्यंत आपण का गप्पा मारल्या नाही शांताबाईंशी या पुस्तकातून? 
'सांगावेसे वाटले म्हणून' या ललित लेखनाच्या पुस्तकाबाबत अगदी तसेच झाले! केव्हा तरी पुस्तक विकत घेतले आणि आज  अनेक वर्षांनी हाती पडल्यावर अक्षरशः अधाशासारखे वाचून काढले. खाली ठेवावेसेच वाटत नव्हते!
 प्रसिद्ध कवयित्री शांताबाई या पुस्तकात आपल्याशी चक्क गप्पा मारतात. जिव्हाळ्यानं मनापासून काहीतरी सांगतात. आणि तेवढ्याच मन लावून आपण त्या गप्पा ऐकत राहतो. आपली आजी किंवा आई कधी कधी गप्पा मारताना असच मनातलं सांगायची !अगदी तसंच हे पुस्तक वाचताना आपण अनुभवतो. लहानपणापासून प्रौढपणापर्यंत वेगवेगळ्या प्रसंगात आलेल्या अनुभवांकडे अत्यंत तरल पातळीवरून शांताबाई पाहतात .त्या प्रत्येक अनुभवातलं चैतन्य, सौंदर्य त्याच्या अनुभूतीतील सच्चेपणा आणि अनुषंगाने येणारं चिंतन यांचा सुंदर मेळ या २९ ललितलेखाच्या पुस्तकात आहे. 
 तशी तर मुळात शांताबाईंना मनुष्य स्वभावाचे कंगोरे न्याहाळण्याची आवड आणि भरपूर वाचन असल्यामुळे या पुस्तकात त्यांची काव्यात्म वृत्ती आणि कृती शब्दाशब्दातून दिसून येते.त्यांच्या शब्दशैलीची रसवत्ता आणि गुणवत्ता वाक्यावाक्यातून झळकते. त्यांचे उत्कट जीवनप्रेम प्रत्येक लेखाची महत्ता वाढवते. शांताबाईंना आलेले अनुभव इतरांपर्यंत पोचवण्यासाठी त्या फार उत्सुक असतात.यामुळे त्यांचे ललित लेख वाचकांना मनापासून आवडतात.

'सांगावेसे वाटले म्हणून' हा आशयगर्भ विषयांचा आविष्कार आहे. प्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांना हा लेखसंग्रह अर्पण केलेला आहे.विविध वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेले त्यांचे लेख आणि काही स्वतंत्रपणे केलेले लेखन यांचा संग्रह म्हणजे 'सांगावेसे वाटले म्हणून'! आपल्या सिद्धहस्त ,शैलीदार लेखनाद्वारे शांताबाई वाचकांशी हितगुज करताना दिसतात. बाष्कळ बडबड करण्यापेक्षा मौन जास्त बोलके असते. नुसत्या स्मिताने, डोळ्यांनी, स्पर्शाने, रंगगंधाच्या भाषेत सुद्धा शब्दांची ताकद भरून असते. शब्दाशिवाय असलेली भाषाच आपण विसरून चाललो आहोत. हे 'शब्द शब्द शब्द' या पहिल्याच लेखात मार्मिकपणे त्यांनी सांगितले आहे .पूर्वग्रहांनी पछाडलेले आणि निरागस अशी दोन व्यक्तिमत्वे प्रत्येकाच्या 'मी' मध्ये दडलेली असतात. आनंदयात्रेला जाण्यापूर्वी आनंदावर विरजण टाकणाऱ्या मी ला फेकून द्यावे असे 'जेथे जातो तेथे 'मध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे. 'हेमाला मुलगी झाली' 'ययातीचे वारस' हे तर अप्रतिम लेख आहेत .कुण्या अनामिक स्त्रीकडून फोनवर हेमाला मुलगी झाली आणि ती गोंडस, देखणी ,गोरी आहे अशी वार्ता समजते. हेमा कोण कुठली ही माहिती मिळायच्या आधी फोन बंद होतो. क्षणभर गंमत वाटणाऱ्या अशा घटना नेहमीच घडत असतात .आनंद, दुःख, अपमान अशा अनेक विकारांचे उद्रेक सतत होत असतात. इच्छा असो वा नसो त्याचे चार शिंतोडे आपल्यावर उडत असतात.हे चिंतन 'जेथे जातो तेथे 'मध्ये त्यांनी केले आहे. 'सलगी 'या लेखात व्यक्तीचा दर्जा, प्रसंग, परिस्थितीनुरूप वागले तर ते सुसंस्कारितपणाचे लक्षण ठरते.' तुमच्या सहवासात आलेल्या कुठल्याही माणसाला अवघडल्यासारखे वाटता कामा नये तरच तुम्ही खरे सुसंस्कृत!' ही पंडितजींची सुसंस्कृत माणसाची व्याख्या' सलगी देणे 'मधून चपखलपणे अनुभवायला मिळते.अनुकरण काही वयापर्यंत काळापर्यंत ठीक असते आवश्यकही असते. पण ते कधीतरी सोडून आपल्या स्वयंभू व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणेही गरजेचे असते. ते 'सावल्या' या लेखाद्वारे स्पष्ट करतात. 'हळवी दुसरी जागा' हा अप्रतिम असा लेख आहे. अतिशय नाजूक किमती पेले एका डॉक्टरीणबाईंनी रोजच्या वापरासाठी काढलेले असतात .सहामधील एक पेला फुटलेला असतो. या प्रत्येक पेल्याला कुठेतरी अशीच हळवी दुखरी जागा आहे .एरवी तो वाटेल ते धक्के सोसू शकतो, असे डॉक्टरीणबाई सांगतात. आपल्यातील प्रत्येकाचीच अवस्था पेल्यासारखी असते. .प्रत्येक व्यक्तिमत्वाला मग ते कितीही कणखर असो, हळवी, दुखरी जागा असतेच. एका अर्थाने आपण सगळेच काचेचे पेले आहोत असे अगदी सहजपणे शांताबाई बोलून जातात.
'आही चुकी' हा लेख पण खूप सुंदर आहे. एखादा व्यंग असलेला माणूस 'आता आलाच आहे नशीबी इतर नेऊ ओढत' असा भाव घेऊन वागतो.त्या भावाचं जे दर्शन त्या घडवतात ते अतिशय मार्मिक आणि डोळे उघडायला लावणारं आहे. साध्या साध्या गोष्टी, आजूबाजूला घडणारे प्रसंग पण त्यांची सांगड घालून शांताबाई जो कॅलिडोस्कोप आपल्यासमोर उभा करतात तो केवळ बघतच राहावा असा असतो.हा लेख वाचल्यावर माझ्या अंगावर सरसरून आलेला काटा अजून आठवतो आहे. तसेच मानवी प्राण्यांचे मोल वाचताना अंगावर राहिलेले रोमांचही कधीही न विसरता येण्याजोगी आहे. 
'पोरकी पुस्तके' हाही असाच एक अस्वस्थ करून जाणारा लेख आहे .एखाद्या पुस्तकाच्या वाईट स्थितीबद्दल वाचलं तरी मनावर ओरखडा उमटतो. आपण जिवंत असताना आपला पुस्तक संग्रह आपण अतिशय जिवाभावाने जपत असतो. अशा पुस्तकांचा मालक अनंताच्या यात्रेला निघून गेल्यानंतर पुस्तकांची आबाळ होते. किडे, वाळवी लागते. जुन्या बाजारात विक्री होते. अशा भोगांची कथा शांताबाई यात सांगतात. जुन्या बाजारात विकत घेतलेल्या पुस्तकांच्या पहिल्या पानावर असलेल्या सह्या देणाऱ्याची, घेणाऱ्यांची नावे या देवघेवीला निमित्त ठरलेले प्रसंग यांचीही एक किनार या लेखाला आहे. तरीपण हा लेख खूप अस्वस्थ करून जातो. वाईट वाटते! आपणही अनेक पुस्तकांचा संग्रह घरी करतो पण आपल्या नंतर त्यांची सोय कशी करणार? हा प्रश्न या लेखाच्या निमित्ताने उफाळून येतो..
शांताबाईंच्या चिंतनाची डूब अतिशय खोल आहे. अगदी लहानपणी पाळलेल्या मांजरीपासून, शाळेतल्या सहलीपासून, कॉलेजातल्या आठवणींपासून ते पार सेवानिवृत्त झाल्यानंतर निवांतपणे केलेल्या पुस्तक वाचनापर्यंत अनेक लहान मोठ्या गोष्टीतून त्यांचं चिंतन-मनन जाणवत राहतं. या चिंतनाचे काही अमूल्य थेंब आपल्यालाही मिळतात. काहीही न राखता कमालीच्या सहजतेने शांताबाई त्यांचं अनुभवविश्व आपल्यासमोर खुलं करतात आणि त्या विश्वातल्या अनेक रंजक गोष्टींचा खजिना पाहून थक्क व्हायला होतं!शांताबाईंच्या वाचन अफाट होतं हे 'मोनालिसा न भेटलेली , भेटलेली'या लेखातून दिसून येते. पॅरिसला त्या गेल्या असताना त्यांचा तेथील अनुभव त्यांनी या लेखात मांडला आहे. फ्रान्स, फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच साहित्यिक, फ्रेंच चित्रकार यासंबंधी जे जे आतापर्यंत वाचले आहे त्यातले अनेक तपशील वादळात भिरभिरणार्‍या पाचोळ्या सारखे त्यांच्या डोक्यात भिरभिरतात. रुसो ,वोल्तेअर,अलेक्सांद्र ड्यूमा , यांच्यापासून ते आजच्या आंद्रे जीद, काम्यू, सार्त्र यांच्यापर्यंत अनेक फ्रेंच लेखकांची नावे त्यांच्या कानावरूनच गेली नव्हे तर त्यांनी ती पुस्तके वाचलेली सुद्धा आहेत.
'संवाद' नावाच्या ललित लेखातून तर शांताबाईंनी वाचकांशी इतका सुंदर संवाद साधला आहे की असं वाटतं इतका विश्वात्मक संवाद जर आपल्याला साधता आला तर आपले एकाकीपण शिल्लक राहणारच नाही. 'आपण सामान्य माणसे एकमेकांशी संवाद साधण्यासाठी तर उत्सुक असतोच. पण माणसांच्या या जगापलीकडे पशुपक्ष्यांचे, झाडावेलींचे, निसर्गाचे आणि त्याच्याही पलीकडच्या संपूर्ण अवकाशाचे एक विशाल विश्व आहे. त्यातल्या साऱ्यांनी परस्परांशी संवाद साधलेला असतो. शब्दाची देणगी माणसाला लाभलेली आहे. पण पशुपक्ष्यांचीही विशिष्ट भाषा असते. त्या भाषेत ते एकमेकांशी बोलत असतात. स्नेहाचे धागे जोडत असतात. आणि त्याच्याही पलीकडे निसर्गाची, स्पर्शाची एक सुंदर भाषा असते.'किती सुंदर आहे हे सगळं!!
लाखेचे म्हणी, आयुष्याचे उखाणे, नवी ओळख, चिमुटभर मानसशास्त्र, फसवी दारे, थबकलेली वये, मांजरे आणि मी, वाट ही चालावी पंढरीची अशा अनेक सुंदर लेखांची माला आपल्याला सुखावून जाते.
काही लेखांचा परिचय दिला, पण संपूर्ण पुस्तक मुळातून वाचण्यासारखे आहे .पुस्तकातील सुंदर संवादाचा आनंद अत्तराच्या सुवासासारखा बराच वेळ आपल्याभोवती दरवळत राहतो .पुस्तक वाचून प्रसन्नतेचे कारंजे थुईथुई मनात नाचत राहतात!!
 या पुस्तकाने खरोखर मला अमाप आनंद दिला. एक असं व्हिटामिन दिलं की ज्या व्हिटामिन मुळे नवचैतन्य आलं!! आणखी काय लिहावे बरे?



सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*