अभ्यासोनि प्रकटिजे

अभ्यासोनि प्रकटिजे

 

पानसेसरांनी आपल्या प्रदीर्घ संशोधनातून आणि व्यासंगातून विकसित केलेल्या बालशिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा सुबोध परिचय लेखिका आपल्याला या ग्रंथात करून देत आहे. तत्त्वज्ञान या शब्दाचा साधासुधा अर्थ- सुजाणता, सुज्ञता, विवेक याविषयींचे सम्यक ज्ञान व त्यावरील प्रेम. वैज्ञानिक पायावर आणि चिरंतन मानवी मूल्यांवर आधारलेल्या परिवर्तनशील बालशिक्षण प्रक्रियेतील सुज्ञतेविषयीच्या तत्त्वांचे सैद्धांतिक ज्ञान व त्यावरील नि:सीम प्रेम म्हणजे पानसे सरांचे ‘बालविकासकेंद्री तत्त्वज्ञान’. सरांनी शरीरशास्त्र, मानसशास्त्र, मज्जाशास्त्र, आकलनशास्त्र, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, ज्ञानरचनावादी शिक्षणशास्त्र, अर्थशास्त्र, इ. अनेक शास्त्रांच्या तत्त्वज्ञानांचा व्यासंग करून त्यांच्या आधारे हे बालविकासकेंद्री तत्त्वज्ञान समृद्ध केले आहे.
पुस्तकाच्या वाचनाचा प्रस्ताव अपेक्षित वाचकवर्गापुढे अभ्यासपूर्वक ठेवणे, ते पुस्तक वाचणे का आणि कसे श्रेयस्कर आहे हे सांगत त्यासाठी वाचकांना उद्युक्त करणे हे प्रस्तावनेचे मुख्य प्रयोजन असते. त्यामुळे ती पुस्तकाच्या आरंभीच छापली जाते. मात्र लिहिली जाते शेवटी आणि वाचली जाते क्वचितच! अनेक पुस्तकांच्या बाबतीत आकर्षक शीर्षक व मुखपृष्ठ, विषयवस्तूचे महत्त्व, लेखकाचा लौकिक, ब्लर्ब्स, सचित्र पृष्ठ सजावट, चित्तवेधक अनुक्रमणिका, सोशल मीडियावरील जाहिराती या बाबी वाचकांस पुस्तक वाचायला प्रवृत्त करण्यास पुरेशा असतात. असा वाचक मग त्याच्या वाटेत आडवी येणारी प्रस्तावनेची पाने लगबगीने दूर सारून सहसा मुद्द्याच्या पानावर येतो. हे सत्य मी वाचक म्हणून स्वानुभवाने जाणते!! तरीही डॉ. वर्षा उदयन कुलकर्णी लिखित ’
‘शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे : अभ्यासोनि प्रकटिजे’ या अप्रतिम ग्रंथाला प्रस्तावना  विवेक सावंत यांनी लिहिली आहे ती मार्मिक व वाचनीय अशीच आहे . 

प्रा.रमेश पानसे यांच्या बालशिक्षण क्षेत्रातील समर्पित भावनेने केलेल्या प्रदीर्घ कार्याविषयी, प्रयोगनिष्ठ संशोधनाविषयी, सातत्यपूर्ण व्यासंगाविषयी आणि मूलभूत तत्त्वचिंतनाविषयी उत्साहाने आणि आत्मीयतेने माहिती घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला आहे. त्यामुळे शिक्षणविषयक विचार व कार्यही अनेकांचे प्रभावित झाले आहे. पण पानसेसरांचे लेख वाचताना, त्यांच्याशी चर्चा करताना, त्यांची भाषणे ऐकताना, त्यांच्या प्रयोगप्रकल्पांना क्षेत्रभेटी देताना, त्यांच्या कार्यशाळा अनुभवताना या प्रचंड विचारधनाचा सारांश सूत्ररूपाने सर्वसामान्य जिज्ञासू मराठी वाचकांपर्यंत कसा पोहोचणार अशी रुखरुख वाटत असे. गेली चार दशके अव्याहत चाललेल्या कार्याद्वारे विकसित होत गेलेले, विस्तृतपणे प्रकटलेले पण अनेक ठिकाणी विखुरलेले, प्रसंग विशेषी पुनरुक्त होत राहिलेले आणि काही अंशी अद्याप अप्रकाशित राहिलेले पानसे सरांचे समृद्ध असे ‘बालविकासकेंद्री शिक्षण विचारधन’ सर्वसामान्य मराठी वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी एका आटोपशीर- पण समग्र आणि सुनियोजित ग्रंथाची निकराची गरज आहे, असे अनेक जाणकारांनाही वाटत असे. अनेकांना अशा ग्रंथाची जणू प्रतीक्षाच होती.

प्रस्तुत ग्रंथाने ती प्रतीक्षा अखेर संपवली. नुसती संपवलीच नाही, तर अतिशय समाधानकारकरीत्या संपवली. शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या विचारप्रवर्तक ग्रंथलेखनाबद्दल डॉ. वर्षा उदयन कुलकर्णी यांचे कायमचे आणि शतश: ऋणी राहतील. पानसेसरांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला साजेसे शीर्षक या ग्रंथाला दिल्याबद्दलही लेखिकेचे आभार. इतका विचारपूर्वक रचलेला ग्रंथ खूप पूर्वीच वाचकांना मिळायला हवा होता अशी चुटपुट ग्रंथ वाचल्यावर लागून राहिली. हा ग्रंथ वाचताना माझी स्थिती तर अलिबाबाच्या गुहेत (विचार) रत्ने निरखत निरखत हरखून गेलेल्या आणि भान हरपून गेलेल्या कासीमसारखी होऊन गेली!

लेखिकेने शिक्षणशास्त्रातील पदव्युत्तर पदवी मिळविल्यावर पीएच.डी. पदवीसाठी संशोधनपर प्रबंधलेखन केले आहे. पानसेसरांच्या मार्गदर्शनाखाली बालशिक्षण क्षेत्रात ज्ञानरचनावादी कार्य करण्याचा अनुभव आहे. शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातील अध्यापनाचा अनुभवही तिच्या गाठीशी आहे. ‘बालशिक्षणातील समस्या आणि उपाय’ याविषयी स्वत:ची वैचारिक बैठक तिने अभ्यासू वृत्तीने जोपासली आहे. या पार्श्वभूमीचा यथायोग्य उपयोग या ग्रंथाच्या निर्मितीत झालेला आपल्याला पानोपानीं दिसतो. पानसेसरांच्या बालविकासकेंद्री शिक्षणविचाराचा शोध साक्षीभावाने घेणे हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नोहे! तिथे पाहिजेत विचक्षण मतीचे!! लेखिकेने तो अधिकार आपल्या अपार कष्टातून या ग्रंथाची निर्दोष रचना करून निर्विवादपणे सिद्ध केला आहे. लेखिकेचे विशेष कौतुक यासाठीही की तिने स्वत:ला बहुपरिचित असलेल्या पण सर्वसामान्यांना दुर्बोध वाटतील अशा शिक्षणशास्त्रातील क्लिष्ट पारिभाषिक शब्दांना संपूर्ण ग्रंथात कुठेही शिरकाव करू दिलेला नाही. इतक्या गुंतागुंतीच्या विषयावर इतके सुबोध लेखन मराठीत क्वचितच सापडेल. हे सर्व लेखिकेने कसे साधले हे समजून घेण्यासाठी ‘प्रक्रिया’ या शीर्षकाचे लेखिकेचे मनोगत वाचनीय आहे.

सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण बालशिक्षण मिळावे हा पानसेसरांकडून घेतलेला वसा समाजापर्यंत पोहोचवण्याची अपार कळकळ लेखिकेच्या शब्दाशब्दांत जाणवते. ग्रंथाची विषयवस्तू गंभीर आहे. आरामखुर्चीत बसून वाचण्याचे हे ललित साहित्य नाही. येथे गेल्या चारशे वर्षांत विकसित झालेला पाश्चात्त्य व भारतीय शिक्षणविचार आणि वैज्ञानिक संकल्पनांचा व्यापक असा पट मांडण्याचे आव्हान लेखिकेपुढे आहे. पण लेखिकेचा व्यासंग सखोल असल्यामुळे आणि तिची कथनशैली ओघवती असल्यामुळे माझ्यासारख्या इतर कामांत व्यस्त अशा वाचकाचाही उत्साह आणि उत्कंठा ग्रंथाच्या शेवटापर्यंत कायम ठेवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. सोपी उदाहरणे देत आपल्याला या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर जागृत करणारी तिची लेखनशैली प्रभावी आहे. चपखल शब्दांची, सोप्या भाषेतली, छोटी छोटी पण कमालीची अर्थवाही वाक्ये बालशिक्षणविषयक अनेक समस्या मांडून आपल्याला अस्वस्थ करतात, वैज्ञानिक आणि तात्त्विक संकल्पना अलगद आपल्या मेंदूत उतरवतात आणि बालशिक्षण आनंददायी करण्याची उमेदही जागवतात. ‘भविष्याकडे’ या अखेरच्या प्रकरणातील लेखिकेच्या स्वतंत्र प्रतिभेचा आविष्कार अतिशय उद्‌बोधक आहे.

 हा ग्रंथ ज्या आई-वडिलांना केवळ जन्मदाते व अन्नदाते एवढ्याच मर्यादित भूमिकेत न राहता आपल्या मुलांचे सुजाण पालक व्हावेसे वाटते, त्यांच्यासाठी जसा मार्गदर्शक आहे, तसाच ज्या शिक्षकांना केवळ विषयांचे शिक्षक न राहता विद्यार्थ्यांचे शिक्षक व्हावेसे वाटते, ज्ञानरचना सुलभ व्हावेसे वाटते त्यांच्यासाठीही स्फूर्तिदायक आहे. हा ग्रंथ बालकांच्या आईवडिलांनी, शिक्षकांनी, शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी, शिक्षणसंस्थांच्या चालकांनी, शिक्षणविषयक धोरणकर्त्यांनी, शासकीय अधिकाऱ्यांनी, मंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी, समाजपरिवर्तन चळवळीतील कार्यकर्त्यांनी व व्हिसल ब्लोअर्सनी तसेच माध्यमांच्या संपादकांनी आवर्जून वाचायला हवा. कारण आजचे कुटुंबांपुढील, शाळांपुढील आणि देशापुढील अनेक जटिल आणि जुनाट (क्रॉनिक) प्रश्न सोडविण्याच्या तंत्रयुक्ती या ग्रंथात आहेत. लेखिकेने आठ क्रमवार प्रकरणांच्या आकृतिबंधांत कल्पकतेने रचलेला पानसेसरांच्या बाल-शिक्षणातील प्रदीर्घ साधनेचे मर्म वाचकांपर्यंत पोहोचवणारा हा विलक्षण असा अर्कग्रंथ आहे. प्रौढकेंद्री समाजाच्या जोखडातून मुलांना मुक्त करण्यासाठी हजारो वाचकांना तो प्रोत्साहित करीत राहील.

शिक्षक, पालक, संवेदनशील नागरिक, विचारवंत, साहित्यिक, कलावंत, समाजसुधारक, माध्यमकर्मी, इत्यादींच्या मनात शिक्षणासंबंधीचे अनेक जटिल प्रश्न काहीशा संदिग्ध स्वरूपात वर्षानुवर्षे घर करून राहिलेले आहेत हे आपल्याला जाणवते. त्यांना सतावणारी, अस्वस्थ व चिंताग्रस्त करणारी शिक्षणविषयक गहन कोडी आणि त्यामुळे होत असलेली विद्यार्थ्यांची कोंडी ते आपापल्या आकलनानुसार व्यक्त करीत असतात. त्यात बऱ्याचदा पुरेशी वैचारिक स्पष्टता नसली तरी त्यातली कळकळ निर्विवाद असते. एकंदरच आजच्या शिक्षणाविषयी समाजात सार्वत्रिक असंतोष दाटलेला आहे हे त्यातून आपल्याला जाणवते. प्रचलित शिक्षण व्यवस्थेविषयी क्वचितच कोणी समाधानी असल्याचे निदर्शनास येते. हे शिक्षण काही थोड्यांना अपवादात्मक यश देते आणि बहुतेकांच्या पदरात हमखास अपयश टाकते हे आपण वर्षानुवर्षे विविध पाहणी अहवालांवरून पाहतो आहोत. याचे कारण मुलांच्या निसर्गदत्त अशा व्यक्तिभिन्नतेला आणि तिला प्रतिसाद देत साधावयाच्या व्यक्तिअनुरूपतेला आपल्या शिक्षणात आणि मूल्यमापनात स्थान नाही. ‘सब घोडे बारा टक्के!’ बहुतेक मुलांच्या वाट्याला येणारे अपयश ही त्यांच्या बेजबाबदारीची किंवा मंद बुद्धीची फलश्रुती नसून त्यांना दिल्या गेलेल्या अशास्त्रीय शिक्षणाचा तो परिपाक आहे, हे शिक्षक व पालकांच्या चटकन लक्षात येत नाही. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक जण कुशाग्र बुद्धिमत्तेचा असतो. पण माशाचे यश तुम्ही त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर पारखू लागलात, तर तो स्वत:ला मूर्ख समजण्यात आपलं सारं आयुष्य व्यतीत करेल! आज आपल्या देशातील लाखो मुले त्या माशाप्रमाणे अशास्त्रीय शिक्षणाचे बळी ठरत आहेत. शाळाबाह्य अवस्थेत पुन्हा निरक्षर होत आहेत. न्यूनगंडाने पछाडलेले जीवन जगत आहेत. कोट्यवधी मुले शाळेत जाताहेत पण ती खरेच शिकताहेत का याबद्दल शंका घेण्यास सबळ पुरावे उपलब्ध आहेत. मात्र ती स्वत:ला आणि समाज त्यांना त्यांच्या शैक्षणिक मागासलेपणाबद्दल दोष देत आहे.

अगदी उच्च शिक्षण व संशोधनापर्यंतच्या या व अशा सर्व अपयशांच्या व असंतोषाच्या मुळाशी मात्र समाजाची आणि शासनाची पायाभूत अशा बालशिक्षणाविषयीची कमालीची अनास्था, अक्षम्य दुर्लक्ष, भ्रामक समजुती, पराकोटीचे अज्ञान आणि अशास्त्रीयता कारणीभूत आहे हे प्रा.रमेश पानसेसरांचे प्रतिपादन लेखिका ग्रंथाद्वारे ठळकपणे आपल्या समोर आणते आहे. जन्मानंतरची पहिली सहा वर्षे मुलांच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाची असतात आणि त्या वयातले शिक्षण किती संवेदनशीलपणे व विचारपूर्वक करावे लागते याविषयी समाजात व्यापक जागृती होण्याची पानसेसरांनी वारंवार मांडलेली गरज लेखिका अधोरेखित करते. बक्मिन्स्टर फ्यूलर हा विख्यात शास्त्रज्ञ म्हणत असे की, सर्व मुले जन्मत: कुशाग्र बुद्धिमत्तेची असतात, आपण त्यांच्या वयाची पहिली सहा वर्षे त्यांना बिनडोक बनवून सोडण्यात खर्ची घालतो! प्रेमळ, अज्ञानी आई-वडील, अप्रशिक्षित शिक्षक व असंवेदनशील समाज यांच्या कळत-नकळत चाललेल्या बालविकासद्रोही वर्तनाबद्दलचे हे जळजळीत सत्य लेखिका पोटतिडिकेने आपल्या समोर मांडत आहे.

सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*