रावण- राजा राक्षसांचा"
रावण- राजा राक्षसांचा"
|| "डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं
चकार चण्डताण्डवं तनोतु न: शिव: शिवम्", ||
'रावण- राजा राक्षसांचा' ही श्री. शरद तांदळे लिखीत कादंबरी वाचुन झाली. लिखाणाच्या बाबतीत असं म्हणतात की, 'खरा किमयागार हा धातुचे रूपांतर सोन्यात करत नाही तर तो जगाचे रूपांतर शब्दात करतो.' काही पुस्तके वाचतेवेळी शब्दश: असा अनुभव येतो. 'रावण राजा राक्षसांचा' हे याचं उत्तम उदाहरण.
ऐन तिशीतील लेखकाचं हे पहिलंच पुस्तक पण वाचतेवेळी कुठंही वाटत नाही की हे पहिलंच असावं. लेखकाने स्वत:च्या सर्व शक्यता वापरून "रावण" नावाचा कैलास लीलया उचलला आहे, दिमाखात खांद्यावर पेलला आहे.
"रावण" या नावासोबतच मनामध्ये नकळत एक चित्र तयार होते. रामायणातील खलनायक, क्रुर, अहंकारी, दहा तोंडे असलेला राक्षसराज. शतकानुशतके ग्रंथामधुन, पुराणांमधुन, कथांमधुन आणि आजकाल टीव्ही मालिका आणि सिनेमांमधुन रावणाचे खलनायकी रूप आपल्यासमोर येत राहिले. स्वत: राम होण्याची अल्पशीही पात्रता नसताना आम्ही मात्र 'रावण' जाळत राहिलो. कदाचीत यामुळेच आजवर कोणी खरा रावण मांडण्याचा प्रयत्न केला नसेल. रावणाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे शरद तांदळे हे पहिले लेखक आहेत. केवळ मराठीतच नाही तर इतर कोणत्याही भाषेत अशा प्रकारे 'रावण' साकारणारे हे एकमेव आहेत ही मराठी वाचकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.तांदळे सरांना विचारलं होतं की रावणावर तुम्हाला का लिहावंसं वाटलं? त्यांनी प्रस्तावनेत यावर लिहिलं आहे. आणि पाच वर्षांच्या खोल अभ्यासानंतर कादंबरी स्वरूपात त्यांनी हा रावण उभा केला.
जवळपास ४३० पानांचे हे पुस्तक वाचकाला खिळवुन ठेवते, गुरफटुन टाकते. रावणावर प्रेम करायला लावते. रावणाला मिळालेली लंका ही काही त्याला जन्मजात किंवा तपश्चर्या करून कोणाच्या आशीर्वादाने मिळवलेली नव्हती तर त्याने स्वत:च्या हिमतीवर, प्रत्यक्ष झगडुन मिळवली होती. रावणाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ म्हणजे त्याचं बालपण, त्याची जडणघडण, आर्य आणि अनार्य यांमधील त्याची होणारी घुसमट, सुडाची भावना, आईवरील प्रेम, महादेवावरील भक्ती लेखकाने अप्रतिम साकारले आहे. सोबत येणारी निसर्ग वर्णने कादंबरीची उंची आणखीन वाढवतात, खासकरुन लंका आणि हिमालय.
आर्य म्हणून जगत असलेल्या दशग्रीवाला जेव्हा हे कळतं की वडील हे आर्यऋषी असून आई असुर राजकन्या असल्याने आपल्याला आर्य म्हणून स्वीकारले जात नाही, तेव्हा स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा त्याचा जो संघर्ष आहे तोच दशग्रीव ते रावण हा प्रवास या कादंबरीत लेखकाने मांडला आहे.
दशग्रीवाची मानसिक अवस्था ,वडिलांकडून व आर्य संस्कृतीकडून सतत नाकारले जाणे आणि आई व मावश्या यांच्यावरच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला श्रेठत्व हवं, ही भावना त्याच्या मनात तयार होते. हा प्रवास दशग्रीवासोबत आपण करत असताना हे पावलोपावली जाणवतं की रावण अत्यंत बुद्धिमान होता. विवेकपूर्ण विचार करू शकत होता ज्यामुळेच त्याच्या हे लक्षात आलं की धर्मसंहितेचा फायदा काही विशिष्ट लोकांनाच होतो. त्याची नियमावली म्हणजे मानसिक गुलामीचं आहे आणि कोणत्याही भेदभावाशिवाय जगण्यासाठी निसर्ग नियमांशी सुसंवाद साधणारी धर्मसंहिता असलेली सार्वभौम संस्कृती तयार करणं गरजेचं आहे.म्हणून रावणाने एकच धर्म व संस्कृती असलेली रावणसंस्कृती तयार केली.
ही संस्कृती ज्यात स्त्रियांना ही स्वतःचं स्वातंत्र्य होतं. या प्रवासात त्याला येणाऱ्या अडचणी, त्याने केलेली मात, महादेवावरची निष्ठा, आप्तांवरच त्याचं प्रेम,त्याचा मानसिक संघर्ष हे सर्व लेखकाने या कादंबरीत अगदी साध्या सोप्या भाषेत आपल्यापुढे मांडले आहे.
रावणाची तत्वे आणि धर्म यांना अनुसरून त्याने प्रजेसाठी समता ,न्याय, नीतिमत्ता यामध्ये वेळोवेळी ज्या कृती केल्या , त्या पाहता रावण हा इतका क्रूर नव्हता जितकं त्याच चित्र आधी आपल्या डोक्यात निर्माण केलं गेलं आहे.
मातृहत्या निषेध मानणाऱ्या रावणसंस्कृतीत शूर्पाच्या नवऱ्याचा वध केला जातो तर त्याच शूर्पाचे लक्ष्मणाकडून नाक व कान कापले गेल्याचे कळताच अधर्म केल्यामुळे सीतेचे अपहरण केले जाते. इथे रावणाला, दिराला टोचून बोलणारी सीता ही खटकते पण रावण तिच्या बाबतीत शेवटपर्यंत मर्यादा सांभाळून राहतो ही गोष्ट खूप मोठी वाटते.
मंदोदरी आणि रावण यांचं एकमेकांवरील प्रेम, संवाद आणि वागणूक आपल्याला जाणवून देतात की रावणासोबत मंदोदरीही अतिशय बुद्धीमान आणि विवेकी होती.
रावण खरंतर गुणसंपन्नच होता .बुद्धिमत्ता, ज्ञान, दया, महत्वकांक्षा ,धैय, हिम्मत , निष्ठा, प्रेम आणि दुसऱ्यांसाठी जगणारा राजा आपल्याला या कादंबरीत भेटतो.
फक्त राजाच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकासाठी सोन्याचे घर बांधणारा रावण, माणसांना गुलाम ठेवण्याची पद्धत बंद करणारा रावण, राज्यातील प्रत्येकासाठी शिक्षणाची सक्ती करणारा रावण, महादेवावरील शिवतांडवस्त्रोत्र लिहीणारा रावण, आयुर्वेदाचा गाढा अभ्यासक, संगिताचा जाणकार, रावणसंहितेचा लेखक, बारा विद्या आणि चौंसष्ट कलांचा अधिपती, सर्व नात्यांना समान न्याय देणारा, युद्धात बाण लागुन शेवटच्या घटका मोजतानाही लक्ष्मणाचे शिष्यत्व स्विकारून त्याला जिवणाचे सार सांगणारा राक्षसराज रावण... जेवढा "रावण" अद्भुत तेवढीच लेखकाची शैलीही सुंदर. कथेमध्ये प्रत्येक पात्राला वजन आहे, महत्व आहे. मुळ कथेला धक्का न लावता हे चरित्र मांडल्यामुळे हे पुस्तक मनाला भावते. दहा तोंडासारख्या कित्येक भाकडकथांना बाजुला सारून शेकडो वर्षे खलनायक ठरवले गेलेल्या "दशग्रीवाला" लेखकाने न्याय दिला आहे.रावण हा राक्षससंस्कृतीचा राजा होता.या कादंबरीत आपण रावणाच्या जवळ जातो ते वेगळ्याच अँगलने.तो आपल्याला जवळचा वाटू लागतो कारण तो विवेकपूर्ण विचार करतो.
रावण महान होता तो का हे शेवटच्या क्षणी मृत्यूसमयी लक्ष्मणाला ज्ञान देतो तेव्हा जास्त खोल कळतो. त्याच्याबद्दल तिथे आदर वाटतो हे खरंय.लेखकाने अतिशय उत्कृष्टपणे आपल्यापुढे त्याचा जीवनपट कादंबरी रुपात उभा केल्याने तो जास्त भावतो ,कळतो.
"रावण- राजा राक्षसांचा"
एक वेगळा ज्ञानार्जनाचा प्रवास , वेगळ्या दृष्टिकोनातून करून पाहायला हरकत नाही.
एखादं पुस्तक लिहीणं हे रात्रीच्यावेळी दाट धुक्यात वाहन चालवल्यासारखं आहे, चालकाला फक्त हेडलाईटच्या प्रकाशापुरतंच दिसतं पण असं करत करतंच पुर्ण प्रवास पार पडतो.... ही लेखकाची पहिली कलाकृती जरी असली तरी यांची भुख खुुप मोठी आहे. पहिल्याच घासाला त्यांनी 'रावण' पचवला आहे...
प्रत्येकाने आवर्जुन वाचलीच पाहिजे अशी ही कादंबरी आहे...
.....आणि हो, एका गोष्टीची मला एक वाचक म्हणुन शाश्वती आहे की तुम्ही एकदा का हे पुस्तक वाचलं तर इथुन पुढे 'रावणाला' जळताना पाहायची तुमची इच्छा होणार नाही......
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment