जंगलाच देण

जंगलाचं देणं'
फोटो गुगल स्त्रोत




        हा मारुती चितमपल्ली यांचा ललितलेखनाचा उत्कृष्ट नमुना असणारा कथासंग्रह नुकताच दुसऱ्यांदा वाचला. निसर्गाबद्दल इतक्या अप्रतिमपणे क्वचितच एखाद्या लेखकाने लिहिलेले असावे. एकूण २७ कथांमधून पशुपक्षी, वनस्पती व अनेक अनभिज्ञ प्रसंग यांचे हुबेहूब चित्रण आपल्या डोळ्यासमोर ते अगदी लिलया उभे करतात. अनेक विस्मयकारक प्रसंग अगदी सहजपणाने सांगून जातात. जंगलाचा अभ्यास असणाऱ्या अनेक व्यक्तींचा अनुभव ते उदाहरणादाखल देतात. याशिवाय प्राचीन काळापासूनच संदर्भ व देश-विदेशातील साहित्यात आलेले उल्लेखही ते ओघवत्यापणाने वाचकांना उपलब्ध करून देतात. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो. मात्र आपण जर त्याची हेळसांड केली तर आपल्यावर आपत्ती ओढवू शकते असा इशाराही ते वेळोवेळी देतात. आजच्या घडीला जगावर आलेले कोरोनाचे संकटही असेच मानवाने निसर्गाच्या विरोधात जाऊन केलेल्या गैरकृत्याचे फळ आहे असे मला वाटते.

लेखकांनी हातचं न राखता हे जंगलचं देणे भरभरून दिले आहे. अंतकरणात जिव्हाळा असेल, अनुभवात जिवंतपणा असेल आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर किती उत्तम ललित गद्य जन्माला येऊ शकतो याची ही झलक आहे, त्यात कथा, आत्मकथा आहे .काव्यात्मकता आहे भावनेने ओथंबून आलेल्या क्षणात हुरहूर आहे. संवेदनशील मनाची स्पंदने आहेत .तरल सौंदर्यदृष्टी आहे आणि या सार्‍यात राहूनही अलिप्त असलेली चिंतनात्मक वृत्ती आहे. चित्रकार आलमेलकर यांनी आपल्या सुरेख रेखाटन हे जंगलचं देण सजवला आहे .शांत संयमी असणाऱ्या लेखकांनी तरल हळुवार लेखन केलेले आहे. पक्षांची तपशील, त्यांच्या विणीची माहिती हंगाम, ऋतूनुसार होणारी पक्ष्यांची वीण याविषयी आपल्याला बरीच काही माहिती यात मिळते .शहरातील रूक्ष नीरस जीवनामुळे, अरण्यातील आनंददायी आणि प्रसन्न वातावरणाची त्यातील सौंदर्याची माहिती फार थोड्यांना असते. अरण्यातील वास्तव मन विचारी बनतं. भावना अधिक पवित्र होतात. यात काही, झाडं ,पक्षी तळे, बोड झिलानी याविषयी च लिखाण आपल्याला त्यातील माहितीला समृद्ध करतं.
    चिंचेची झाड भंडारा जिल्ह्यातील कल्पवृक्ष आहेत . चिंच माघ व फाल्गुनी या महिन्यात पिकून तयार होतात. चिंचा बहूपयोगी आहेत.
   पळसाचे झाड मात्र आकारहीन असतं .वनातील जमीन निकस व्हायला लागली की पळसाचे प्रमाण वाढू लागतं. पळस फुलला के गुलाबी रंगाच्या पळस मैना यांचे थवेच्या थवे युरोप ,आशिया ,मध्य पूर्व प्रदेश, तुर्कस्तान या भागातून भारतातील पळसाच्या जंगलात येतात. पक्षीनिरीक्षणाचे पहिले धडे फुललेला पळस देतो पोपट,पाणपोपट,हळदू ,कोतवाल भृंगराज ,साळुंकी, मैना बुलबुल आणि असे अनेक प्रकारचे पक्षी मधासाठी येत असतात. सर्वांनाच मध हवा असतो असं नाही तर काही त्या फुलातील कीटकांसाठी येतात.
      मोहाच्या फुलाचा रंग हरीणीच्या पोटरीच्या वर्णा सारखा फिकट पिवळा असतो. प्रत्येक फांदीच्या शेंड्याला मार्च-एप्रिल महिन्यात फुलांचे झुपके लागतात. फुलांच्या देठात मधुर रस असतो .झाडावर राहणाऱ्या या फुलांना बहर येतो तो रात्रीचा. सूर्योदयापूर्वी त्यात खमंग तापलेल्या दुधावरच्या सायीसारखी वृक्षाखाली सडा पडतो. भाजलेल्या काळ्या जमिनीवरती फुले फारच सुंदर वाटतात .जंगलातील शेकडो आदिवासी तरुणी ही मोहाची फुले गोळा करण्या करता भल्या पहाटे घराबाहेर पडतात. या शिवाय दुसऱ्या पुस्तकांमध्ये मोहाची फुले खाण्यासाठी अस्वले नियमित येत असतात असाही उल्लेख सापडला आहे.
        पाणपिपुलीचं वास्तव्य झिलानी म्हणजे पाणथळ जागा या ठिकाणी असतं. तिचा आवाज तिथे देवभातात येतो. ते चाललं तिचा आवाज ,तिचा विणीचा हंगाम त्यांचे सौंदर्य याचा वर्णन ऐकून मला आमच्या वारजे टेकडीवरील पाहिलेल्या पाणपिपुली ची आठवण झाली.
    पक्ष्यांच्या जन्माचे गुढ या विषयावर लेखन करताना चातक व पावशा हे कोकिळ कुळातील पक्षी आपली अंडी कसाई -खाटीक -पक्षी व सात बहिणी च्या घरट्यात घालतात. हे सांगतात.
      गिधाडांचा टापू.... इटियाडोहाच्या खालच्या भागाला गांधारी गाव वसले आहे, गांधारी गावात एक तलाव आहे. कोहळी लोक काश्मीर या भागातून आले तेव्हा त्यांनी प्रथम गांधारी गाव वसवून तळे बांधले. जवळच गांधारी पहाडावर मोठा बिकट उंच अजस्त्र पहाड आहे तो धरणांचा पहाड म्हणून ओळखला जातो. इटियाडोह सौंदर्य त्याचबरोबर गिधाडांची सर्व काही माहिती आपल्याला समजते.
    सांबराचे लोटणमध्ये शंभरीच्या नराला ढाक म्हणतात. अरण्यात ढाक बाराशिंगी व रानगवा ठराविक ठिकाणी लोळण घेण्यासाठी पाण्याची स्थळ निवडतात. अशा जागेस लोटण म्हणतात. अशा रीतीने एकदा तयार झालेले लोटण जंगलात कायम असते.
      टेकराज या मधून आपल्याला नाग, साप या जाती विषयी त्यांच्याविना विषयी तसेच अजगर, वारूळ वारुळाची पिरॅमिडची केलेले तुला रचना व गुणधर्मात वाटणारे साम्य याविषयी माहिती मिळते.
       तर सापाचे आवाज, साप काढत असलेले इतर प्राणी व पक्षांचे आवाज या विषयी आदिवासींची माहिती आपल्याला देऊन जंगल ज्ञानाविषयी समृद्धी आणतात.
     तर उन्हाळ्यामध्ये झाडावर चढणारे कासव, कासवांची उत्पत्ती, डिंक खाणारे कासव कासवांची अंडी उबविण्यासाठी लागणारा आठ महिन्यांचा कालावधी या सर्वांची माहिती नवेगाव बांध येथील भटकंतीतून लेखक आपल्याला सांगताना नवेगावबांध ला जाऊन येण्याची इच्छा आपल्या मनात जागृत होते.
         दिवा आणि दिवारो यामध्ये तलावांमध्ये दिसणारा दिवा तसेच समुद्रातील दिवे याविषयी आपल्याला माहिती मिळते.
   गांधारी तळ त्याचं वर्णन तेथील पक्षी आपल्याला तेथे पहायला राहायला बोलवतात.
      तर जंगलातील आदिवासी मधील गोंड जंगलातील शिकारी तर दीवर पाण्यातील असं सांगून आदिवासींची ओळख आपल्याला लेखक करून देतात.
       पुस्तक म्हणजे जंगल ज्ञान अरण्य विद्या, आणि तुम्हाला जंगलात बोलणारे एक माध्यमच आहे.   

जंगल आपल्याला काय देते याविषयी चितमपल्ली यांच्या शब्दात सांगायचे झाले तर.. शहरातील वृक्ष आणि निरस जीवनामुळे अरण्यातील आनंददायी आणि प्रसन्न वातावरणाची त्यातील सौंदर्याची माहिती फार थोड्यांना असते. अरण्यातील वास्तव्याने मन विचारी बनतं. भावना अधिक पवित्र होतात. माझ्या लिखाणातून हेच सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे.
   वनांच्या सावलीत मी वाढलोय्. ग्रंथात आढळून येणार नाही, असे ज्ञान जंगालातून मी प्राप्त केलयं. गुरूजनांकडून शिकता येणार नाही ते वृक्ष व दगडांनी पढविलंय्. वृक्षांइतका धर्मात्मा कोणी नाही. त्यांच्यापासून मी देवाचे अस्तित्व जाणलंय्. झाडं जशी सूर्यप्रकाश व दंव शोषून घेतात तसं चांगलं तेवढं घेतलंय्. पानं गळतात. फुलं कोमेजतात. पण ती पुन्हा विकसित होतात. मितव्ययी म्हणजे काय ते जंगलापासून शिकावं. आभाळाच्या, पर्वताच्या, हिरव्या मैदानाच्या, चमकणाऱ्या पाण्याच्या केवळ दर्शनाने कितीतरी स्मृती माझ्यात जागृत होतात. तुम्हाला वाटतं ना आपली मुलं विचारी बनवीत. त्यांना भावानांतील पावित्र्य जाणावं, तर त्यांना जंगलात व पर्वतावर न्या. तिथल्या हिरवळीवर त्यांना मुक्तपणे भटकू द्या. पर्वतावरील वा-याच्या प्रत्येक झुळकेबरोबर त्यांच्यातील पवित्र भावनाच जागृत होतील.!!
  'मोहा फुलला' या कथेत हालच्या गाथासप्तशतीचे संदर्भ अनेक ठिकाणी आढळतात. याच कथेत नाशिकचा उल्लेख आला आहे प्राचीन काळी गोदातीरी मोहाची झाडे होती. आणि त्या ठिकाणी प्रियकर-प्रेयसी भेटत याची काव्यमय वर्णने राजा हालने गाथासप्तशती मध्ये उत्कटपणे करून ठेवली आहे. त्याविषयी लेखकाने सुंदर प्रसंग नमूद केले आहे.
  एकंदरीतच पुन्हा पुन्हा वाचावी आणि वाचताना नित्यनूतन वाटावी अशी ललित साहित्यकृती म्हणजे 'जंगलाचं देणं' होय.

सौ.मनिषा राजन कडव

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*