जादूई जंगला'ची अद्भुतरम्य सफर
जादूई जंगला'ची अद्भुतरम्य सफर
उस्मानाबादचे समाधान शिकेतोड हे एक उपक्रमशील शिक्षक आणि सर्जनशील लेखक आहेत. यापूर्वी त्यांचे 'माझा विद्यार्थी' आणि 'पोपटाची पार्टी' हे दोन बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
बालकुमारांसाठी त्यांची 'जादूई जंगल' ही कादंबरी राजहंस प्रकाशनाने नुकतीच प्रकाशित केली आहे. ह्या कलाकृतीत मुक्त असे कल्पनारंजन आणि कल्पनाविलास आहे.
हे जादूई जंगल विविध प्रकारच्या झाडाझुडपांनी नटलेले आहे. विविध प्रकारचे पशुपक्षी हीच ह्या कथेतील प्रमुख पात्रे आहेत. पशुपक्षी हे ह्या कथेत नायक आहे आणि माणूस नावाचा विनाशकारी प्राणी इथे खलनायक आहे.
सिंह हा ह्या जंगलाचा राजा आहे. ह्या जादूई जंगलात सर्व पशुपक्षी आनंदाने नांदत आहेत. इथल्या सशाला जादू करता येते. तो जादूने आपले रंग बदलतो, तसेच माकडांचेही रंग बदलून टाकतो. जिराफांच्या माना आखूड करून टाकतो. वाघोबांची गुहाच गायब करून टाकतो. इतरांची फजिती पाहून ससोबा मनात हसत असतो. जादूच्या जोरावर आपणच ह्या जंगलाचा राजा बनावे, असे सशाला वाटत असते.
जंगलात घडणाऱ्या चमत्कारांचा शोध घेण्याची जबाबदारी कोल्होबाला देण्यात येते. कोल्होबा जादूगार सशाला शोधून काढतो आणि चतुराईने, फसवून त्याची जादूची कला मिळवतो. आता कोल्होबाला आपणच जंगलाचा राजा बनावे, असे वाटते. राजा होण्यासाठी इतर प्राण्यांचा पाठिंबा मिळविणे आवश्यक होते. जादूच्या जोरावर आता तो इतर प्राण्यांना त्रास देऊ लागला. सशाची गेलेली दिव्यदृष्टी काही दिवसांनी त्याला परत मिळते. ह्या शक्तीच्या बळावर ससा पाण्यावर चालू शकतो, हवेत उडू शकतो. जादूच्या जोरावर तो शिकारी कुत्र्यांना चिमण्या बनवून टाकतो. ह्या चिमण्या चिवचिव करत नाहीत, तर भूभू करतात. येथील काही प्राणी आपले मूळ रूप बदलून वावरतात.
सोन्या हरीण हा ह्या जंगलातील गुप्तहेर आहे. हत्तीदादा हा सिंहराजाचा सल्लागार आहे. जंगलात दर महिन्याला प्राण्यांची सभा भरते. ह्या सभेत सिंहराजा सगळ्या प्राण्यांची गार्हाणी ऐकून सगळ्यांच्या समस्या सोडवतो. प्राण्यांच्या सभेत सहविचाराने निर्णय घेतले जातात. जंगलात मानवाचा हस्तक्षेप वाढतोय, याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. जंगलतोडीबद्दल सगळेच तक्रार करतात. शहरातील कारखान्यांचं घाण पाणी जंगलातल्या नद्यांमध्ये येतं, हा सगळ्यांच्या चिंतेचा विषय आहे.
प्राण्यांच्या सभेत कोल्हा जंगलाचा राजा होण्याची इच्छा जाहीर करतो. राजाच्या दरबारात ससा कोल्ह्याची फजिती करतो.
ससोबा काळविटांच्या मदतीने चंदनचोरांना अद्दल घडवतो. ह्या कामगिरीबद्दल ससोबा आणि काळविटांना 'पर्यावरणरक्षक' हा किताब देऊन गौरविण्यात येते.
जंगलतोडीमुळे ओसाड झालेल्या जागेवर नवीन झाडे लावण्याचा निर्णय होतो. माकडे गावात जाऊन माणसांनी केलेली रोपवाटिका पाहून येतात. सगळे प्राणी मिळून विविध झाडांच्या बिया गोळा करतात. सागाच्या पानांच्या पिशव्या तयार करून त्यात बिया लावतात. हत्ती आपल्या सोंडेने रोपांना तुषार सिंचन करतात. येथे प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कटाक्षाने टाळतात. पहिला पाऊस पडताच करोडो झाडे लावतात. झाडांना पाणी कमी पडताच बांबूची पाईप लाईन करून झाडांना पाणीपुरवठा करतात. वृक्षतोडीमुळे उजाड झालेले माळरान वृक्षारोपणानंतर हिरवेगार होते. प्राणिजगताचे हे शहाणपण माणसांनी शिकायलाच हवे!
हत्तींची शिकार करणाऱ्या लोकांवर एकत्रित हल्ला करून मधमाश्या शिका-यांना पळवून लावतात. नगण्य जीवांची ही एकी कौतुकास्पद आहे.
पुरात वाहून जात असलेल्या हत्तीच्या पिलांना ससोबा वाचवतो.
ससा आपल्या जादूई शक्तीने माकडांना झाडावर घरे बांधून देतो आणि सगळ्यांच्या कौतुकाला पात्र ठरतो. सिंहराजाने ससोबाला शाबासकी दिली. याचा सेनापती वाघोबाला राग आला. रागापोटी वाघोबा इतर निरपराध प्राण्यांना त्रास देऊ लागला. शिक्षा म्हणून सिंहराजाने वाघोबाला सेनापती पदावरून काढून टाकले आणि परोपकारी ससोबाला सेनापती केले. ससोबा जंगलातील सर्व प्राण्यांना सुखात ठेवण्यासाठी धडपडत होते. सशाचे हे मोठेपण वाघाला आणि कोल्ह्याला सहनच होत नव्हते. एका रात्री सशाला मारण्यासाठी ते दोघे करवंदाच्या जाळीत लपून बसले होते. त्यांनी हल्ला करताच ससोबाने त्या दोघांना जादूने उचलून ढगात फेकून दिले. पुन्हा ते खाली आलेच नाहीत.
पुढे काही दिवसांनी वाघोबा आणि कोल्होबा झाडाचे रूप धारण करून जंगलात अवतरतात. ही दोन झाडे रोज आपली जागा बदलतात. वाघोबा, कोल्होबा आणि अजगर हे तीन अपवाद वगळता बहुतेक सगळे पशुपक्षी एकमेकांच्या मदतीला धावून जातात.
ससोबा सेनापतीने जंगलाच्या सुरक्षेसाठी वॉकीटॉकीचा वापर सुरू केला. वॉकीटॉकीच्या वापरामुळे सिंहराजाला जंगलातील बातम्या झटपट समजू लागल्या. जंगलातील गुप्तहेर आणि संरक्षक सजग झाले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर दाखवून लेखकाने जादूई जंगलाला आधुनिकतेचा टच दिला आहे. लेखकाने वाघासारख्या हिंस्र प्राण्याला बाजूला सारून आणि सशासारख्या शाकाहारी प्राण्याला सेनापती बनवून उपेक्षित वर्गाला न्याय दिला आहे.
जादूई जंगलात जादूच्या शाळा आहेत. त्या दिवसा उघडतात आणि रात्री गायब होतात. इथे जशा प्राण्यांच्या शाळा आहेत, तशा पक्ष्यांच्याही शाळा आहेत. माकडांच्या शाळेत 'प्राण्यांचे आरोग्य' हा विषय शिकवला जातो, तर हत्तींच्या शाळेत 'आपत्ती व्यवस्थापन' हा विषय शिकवला जातो. प्रत्येक शाळेत पर्यावरण संवर्धनाचे धडे दिले जातात. पक्ष्यांच्या शाळेत रोज जंगलगाणी गातात.
जादूई जंगलात कोकिळेची संगीतशाळा आहे. ससोबाने ह्या शाळांसाठी 'जंगलनीती' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथात जंगलाचे नीतिनियम आणि कायदे आहेत. या ग्रंथाला 'राजग्रंथ' म्हणून मान्यता मिळाली आहे.
एकदा काही माकडे ट्रकवर बसून शहरात जातात. तेथील दवाखान्यातील उपचारपद्धती शिकून घेतात. जंगलात आल्यावर तसाच दवाखाना सुरू करतात. जंगलात औषधी वनस्पतींची लागवड करतात. सगळे पशुपक्षी मिळून जंगलाला लागलेली आग विझवतात. सगळे प्राणी मिळून जंगलउतारावर आडवे चर खोदतात. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील माती वाहून जायची थांबते. पुराचा धोका कमी होतो. थोडक्यात काय, तर सगळे प्राणी मिळून जलसंधारणाचे काम करतात. काळाची हाक ओळखून माणसांनी जे जे करायला हवे, ते इथे मुके पशुपक्षी करतात. पशुपक्ष्यांची ही एकी वाखाणण्याजोगी आहे. पशुपक्ष्यांच्या माध्यमातून लेखकाने बालकुमारांच्या जीवनासाठी अतिशय उपयुक्त असा शर्करावगुंठित संदेश दिला आहे. यात मनोरंजन तर आहेच, शिवाय जीवनबोध आहे.
जांभूळबन, जांभळी नदी, गवती नदी,लव्हाळी नदी, उथाळी नदी, भोरप्या डोंगर, मसईचा माळ अशी येथील ठिकाणांची आणि नद्यांची नावे फारच अन्वर्थक आहेत. ह्या नद्या कधीच आटत नाहीत, हे विशेष! निळोबा लांडगा, सोन्या हरीण, चंद्री रानमांजर, टिकल्या माकड, बंकू अस्वल, लालू आणि भालू चित्ते, डॉक्टर चिकू आणि डॉक्टर मिकू ही दोन माकडे, ढोण्या रानरेडा, टुणटुण पोपट अशी पशुपक्ष्यांचीही नावे मोठी मजेशीर आहेत. पशुपक्ष्यांनी एकमेकांना घातलेली मजेदार कोडी उत्कंठावर्धक आहेत.
'ऊन पाऊस ऊन पाऊस
आकाशात पडली कमान
साती रंग समान'
यासारखी काव्यकोडी ह्या कथनाची रंगत वाढवतात.
ह्या कादंबरीत जादूचे मोरपीस आहे आणि जादूच्या चटया आहेत. त्यामुळे ह्या जंगलात जादूच्या करामती रोज घडत राहतात. जंगलाची, जंगलातील निसर्गाची वर्णने फारच लक्षवेधी आहेत.
लेखकाने ह्या कादंबरीत वातावरणबदलाच्या सगळ्या खुणा टिपल्या आहेत. थेट विषाणूसंसर्गही दाखविला आहे. आधुनिकतेचा आणि संस्कारांचा मसाला ठासून भरलेला आहे.
'जादूई जंगल' ही एक अद्भुतरम्य अशी कलाकृती आहे. समाधान शिकेतोड यांनी ह्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या विश्वाची सफर घडवली आहे. यात वास्तव आणि कल्पिताचे बेमालूम मिश्रण आहे. योगिता धोटे यांच्या मुखपृष्ठाने आणि आतील चित्रांनी पुस्तकाच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे. पुस्तकावर राजहंसी मुद्रा उमटल्यामुळे नवोदित लेखकाच्या लेखनाचे चीज झाले आहे. रोमांचकारी गमतीजमतींनी नटलेली ही एक रोमहर्षक आणि मनोरंजक कहाणी आहे. कादंबरीचा ओघ इतका प्रवाही आहे, की या पुस्तकावर ॲनिमेशन फिल्म तयार केली, तर ती बच्चेकंपनीला जखडून ठेवील, असे वाटते.
जादूई जंगल ( बालकादंबरी)
लेखक : समाधान शिकेतोड
राजहंस प्रकाशन, पुणे.
पृष्ठे १३४ किंमत रु. १८०
- सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment