पैस
पैस दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ वाचून खरंच आनंद वाटला. पैसविषयी आधी ऐकलं होतं, पुस्तक वाचताना लेखिकेने हे स्वान्तसुखायच लिहिले असावे असं वाटत राहते. या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे. पहिला ‘स्वच्छंद’ ज्यांत याच स्वान्तसुखाय लेखनाची, लेख लिहिण्याच्या ऊर्मीची आणि हे लेख लिहिण्याची सुरुवात कशी झाली हे दुर्गाबाई सांगतात. आत्मचरित्रपर लेख. साधा वाटतो पण लेखिकेच्या सहज सुलभ लेखन शैलीमुळे. छोटासा पण उत्तम आहे. दुसरा लेख ‘पैसाचा खांब’ या लेखावरूनच पुस्तकाला पैस नाव दिले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या छोट्या खांबावरच्या पूर्ण अवकाशाला ज्ञानेश्वर पैस म्हणतात. ह्या पैस शब्दाला इतर संतांपेक्षा निराळेच परिमाण ज्ञानेश्वर देतात असे निरीक्षण दुर्गाबाई नोंदवितात. ह्याच लेखात ज्ञानेश्वरीत आलेले चार खास ज्ञानेश्वरांचे शब्द – महाशून्य, सहनसिद्धी, दु:ख-कालिंदी, ज्ञानमित्र याविषयी थोडक्यात पण अतिशय उत्तम विवेचन दुर्गाबाईंनी केले आहे. लेख मुळातूनच वाचनीय. तिसऱ्या ‘पंढरीच्या विठोबा’ मध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अध्यात्माचा पूर्ण अभाव’ असल्याने दुर्गाबाई...