पैस
पैस
दुर्गा भागवत यांचे ‘पैस’ वाचून खरंच आनंद वाटला. पैसविषयी आधी ऐकलं होतं, पुस्तक वाचताना लेखिकेने हे स्वान्तसुखायच लिहिले असावे असं वाटत राहते.
या पुस्तकातील प्रत्येक लेख वाचनीय आहे.
पहिला ‘स्वच्छंद’ ज्यांत याच स्वान्तसुखाय लेखनाची, लेख लिहिण्याच्या ऊर्मीची आणि हे लेख लिहिण्याची सुरुवात कशी झाली हे दुर्गाबाई सांगतात. आत्मचरित्रपर लेख. साधा वाटतो पण लेखिकेच्या सहज सुलभ लेखन शैलीमुळे. छोटासा पण उत्तम आहे.
दुसरा लेख ‘पैसाचा खांब’ या लेखावरूनच पुस्तकाला पैस नाव दिले आहे. ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली त्या छोट्या खांबावरच्या पूर्ण अवकाशाला ज्ञानेश्वर पैस म्हणतात. ह्या पैस शब्दाला इतर संतांपेक्षा निराळेच परिमाण ज्ञानेश्वर देतात असे निरीक्षण दुर्गाबाई नोंदवितात. ह्याच लेखात ज्ञानेश्वरीत आलेले चार खास ज्ञानेश्वरांचे शब्द – महाशून्य, सहनसिद्धी, दु:ख-कालिंदी, ज्ञानमित्र याविषयी थोडक्यात पण अतिशय उत्तम विवेचन दुर्गाबाईंनी केले आहे. लेख मुळातूनच वाचनीय.
तिसऱ्या ‘पंढरीच्या विठोबा’ मध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचे तर ‘अध्यात्माचा पूर्ण अभाव’ असल्याने दुर्गाबाई त्यांच्या मूळगावी म्हणजे पंढरपुरात त्यांचा जुना वाडा पहाण्याच्या निमित्ताने जातात. या लेखात लेखिका पदूबाईची वेगळीच लोककथा सांगतात, जी रा. चिं. ढेरे यांच्या विठ्ठल – एक महासमन्वयक या पुस्तकात वाचावयास मिळते (ढेरे दुर्गाबाईंना अत्यंत मानायचे असे वाचल्याचे आठवते). लेखाचा शेवट “पंढरीच्या विठोबाचे व माझे पिढ्यांचे आंतरिक नाते नव्याने उजळले” अशा वाक्याने होतो.
यापुढे ‘जोगवा’ म्हणून लेख येतो, हा ह्या पुस्तकातला सगळ्यात छोटा पण अर्थवाही लेख, दुर्गाबाईंच्या निरीक्षण शक्तीला दाद द्यावीशी वाटणारा लेख.
त्यानंतर येतो ‘द्वारकेचा राणा’, द्वारकेतले एकूण वातावरण आणि वाळूमय गोमती नदी बघून लेखिका भयचकित झाल्या आहेत, तेंव्हा त्यांना आठवणारी मीरा आणि त्यातून लिहिलेली “भगवान व भक्त यांच्यातील भानगड लांबूनच पाहण्यासारखी नि कोरड्या काव्यात वाचण्यासारखी” अशी वाक्य स्तिमित करतात. द्वारकेचा राणा आणि चिरंतन दु:ख याचे कारण नंतर दुर्गाबाईंना भागवतपुराणातील दशम स्कंधात सापडते. लेखाचा शेवट उत्तर पुराणातल्या गोष्टीने लेखिका करतात.
ज्ञानेश्वरांच्या दु:ख-कालिंदी यावरून पुढचा लेख ‘यमुना-कालिंदी’ प्रभावित असावा असे वाटते. स्वत: यमुनेच्या काठी राहिल्यावर आलेले अनुभव दुर्गाबाई सांगतात त्याचबरोबर यम आणि यमीची गोष्ट सांगून यमी म्हणजेच यमुना अशीही नोंद त्या करतात. कदंब वृक्षाचे आणि यमुनेचे नातेही त्या स्पष्ट करतात. कालिंदी, गोपी आणि वृंदावन यांची जिवंत अनुभव देणारा लेख.
यांनंतर ‘नैनीचा पूल’ म्हणून लेख येतो. इतर लेखांच्या तुलनेत हा लेख मला वैयक्तिक फारसा भावला नाही, ह्या लेखात दंग्याच्या वेळचे प्रवासवर्णन आहे.
यानंतर येणाऱ्या ‘महेश्वरची महाश्वेता’ या लेखात दुर्गाबाई अहिल्याबाई होळकरांची सुंदर ओळख करून देतात, विविध घटना सांगतात. लेख मुळात वाचनीय.
‘ख्रिस्त-संगत’ दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्वाची वेगळीच ओळख, संकरी हिंदू आणि त्यातून तयार होणाऱ्या श्रद्धेतून येणारे संस्कार आणि शाळेत असल्यापासून मनावर बिम्बवण्याचा प्रयत्न झालेले ख्रिश्चन संस्कार यातून झालेल्या मानसिक संघर्षातून निर्माण झालेला समन्वय अतिशय उत्तम शब्दांकित झाला आहे.
‘डोंगर माथ्यावर’, ‘आसन्नमरण काळी राणी’ आणि ‘बुद्ध-प्रलोभन’ या तीन लेखात दुर्गाबाई त्यांची मास्टरी असलेल्या बुद्ध, बौद्ध संप्रदाय आणि बौद्ध लेणी याविषयी मौलिक माहिती पुरवितात. कथा सांगतात, बुद्ध जीवनातले अनेक प्रसंग सांगतात, पूर्ण बुद्ध कथा सांगतात.
पैस’ या ललित लेखांच्या संग्रहातील लेख या आधी मौज, साधना, केदार, सत्यकथा इत्यादी मासिकांतून आधी प्रकाशित झालेले होते. दुर्गाबाई भागवत या एक विदुषी म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे प्रत्येक कार्य सखोलपणे केलेले असते. दुर्गाबाईंच्या प्रदीर्घ प्रस्तावनांमुळेही अनेक वाचकांना त्या माहिती आहेत. ‘पैस’ या ललित पुस्तकात जे दुर्गाबाईंचे निवडक लेख निवडले आहेत तो एक वेगळाच आस्वाद आहे. सर्व लेख एका खास साच्यातले आहेत त्यामुळे कोणतेही प्रकरण वाचले तरी पुस्तक वाचनाचा निखळ आनंद घेता येतो.
“गोदावरी आणि प्रवरा … या दोन नद्यांमधल्या एका लहानशा भागातल्या, अती साध्या गावात एक अद्भुत प्रतीक आहे. खांबाचे …. खांब, तोही ओबडधोबड आणि लहानखुरा …. पण त्या खांबावरचा एक अदृश्य भाग एका समाधिस्त जीवाला त्याच्या जीवनावधीतच भासमान झाला. तो भाग – चारी क्षितिजांना भेदून आरपार जाणारा, आकाशालाही उंच ओढून त्याच्या वर, थेट चैतंन्याच्या बेंबीला भिडणारा भाग – त्या दोन डोळ्यांनी अक्षरश: पाहिला. त्याला त्या साक्षात्कारी युवकाने ‘पैस’ असे नाव दिले. अजूनही ज्ञानेश्वरी वाचा की त्या खांबाच्या वर पैसाचा पारदर्शक पिसारा उभारलेला तुम्हाला दिसेल. म्हणून या खांबाचे नाव ‘पैसाचा खांब’ …. यालाच टेकून ज्ञानोबाने पैसाची मर्यादा पाहिली, काल व अवकाश यांची सीमारेषा जोखली आणि मानवाच्या अंत:स्थ गहनतेची अमर्यादिता अनुभवली. खोली आणि उंची, रहस्य आणि खुलेपणा, गूढ व प्रांजळ, वेदना व सुख, मृत्यू आणि जीवन, भोळेपणा व ज्ञान यांतले ऐक्य टिपले…” अशी ‘पैस’ ची भूमिका दुर्गाबाई स्पष्ट करतात.
‘पैस’ मध्ये एकूण १३ लेख आहेत. ‘द्वारकेचा राणा’ या कृष्णावर आधारीत ,पंढरीचा विठोबा’, ‘ख्रिस्त-संगत’, ‘बुद्ध-प्रलोभन’ अशी शीर्षके वाचकाला चक्रावून टाकण्यासाठी पुरेशी आहेत.
दुर्गाबाईंनी त्यांच्या खास ठेवणीच्या शैलीत प्रत्येक प्रकरणात जी शब्दांची पेरणी केली आहे ती मुळातूनच वाचण्यासारखी आहे. ललित लेखन वाचताना दुर्गाबाई आपल्याला एका वेगळ्याच उंचीवरचे तत्त्वज्ञानही देतात.
‘पैस’ बद्दल अजून काय लिहावे? शब्दांत त्याची गोडी वर्णन करण्यापेक्षा ‘पैस’ हा एक अनुभुतिचा भाग आहे.
ललित वाचनाचा निखळ आनंद असे मी दुर्गाबाई भागवत यांच्या ‘पैस’ चे वर्णन करेन. ‘पैस’ या पुस्तकासाठी दुर्गा भागवत यांना १९७१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला आहे.
आपल्या प्रदीर्घ, विद्वत्तेने भरलेल्या, साध्या सरळ शब्दांत व अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रस्तावना लिहिणार्या दुर्गा भागवत यांना मी आदराने प्रस्तावनाबाई म्हणते. दुर्गाबाईंची प्रत्येक प्रस्तावना वाचनीय असते. त्यांनी लिहिलेल्या कित्येक पुस्तकांच्या प्रस्तावना प्रसिद्ध आहेत. ब.रा.हिवरगांवकर यांच्या कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथाची प्रस्तावना, कथासरित्सागराला दिलेली प्रस्तावना व त्यांच्या अशा अनेक प्रस्तावना प्रसिद्ध आहेत. दुर्गाबाईंची ग्रंथसंपदा मोजकी असली तरी त्यांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे एक सुखाची अनुभूति असते.
संग्रही ठेवावे असे पुस्तक असेच या पुस्तकाचे वर्णन करता येईल.
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment