काबुलीवाल्याची बंगाली बायको
*‘काबुलीवाल्याची बंगाली बायको’*
सुस्मिता बॅनर्जी यांच्या ‘काबुलीवाला बंगाली बरू’ या बंगाली पुस्तकाचा मृणालिनी गडकरी यांनी अनुवाद केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आपल्या आयुष्यातील काही घटना मांडल्या आहेत. थरारक, पण करुण... भाषांतरित साहित्यकृतीसाठी या वर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेल्या मृणालिनी गडकरी यांचे ‘काबुलीवाल्याची बंगाली बायको’ हे भाषांतरित पुस्तक म्हणजे अस्वस्थ करणारी थरारक, पण करुण कहाणी आहे. सुस्मिता बॅनर्जी या मूळ बंगाली ेलेखिकेची ही कथा! रवींद्रनाथ टागोरांच्या ‘काबुलीवाला’ या कथेतील रहिमत खान पठाणाची प्रतिमा मनात जपलेली सुशिक्षित बंगाली ब्राह्मण कुटुंबातील ही मुलगी! इंग्लिश घेऊन बी.ए. झालेली, जॉबाजखान, या अफगाण पठाणाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करून अफगाणिस्तानमधल्या त्याच्या गावी सासरच्या लोकांना भेटायला गेली; पण तिथे तिची अवस्था तुरुंगातल्या कैद्याप्रमाणे झाली. १९८९ ते १९९५ अशी सहा वर्षे काढून नंतर तिथून अक्षरश: पळुन ती भारतात कशी आली, त्याची ही सत्य कहाणी. स्त्री म्हणून तिथे तिला आलेले विलक्षण दारुण अनुभव आणि त्याच वेळी अफगाणिस्तानातील राजकीय अराजक, सामान्य माणसाच्या सामान्य जगण्याची विस्कटलेली चाकोरी, तिथल्या अशिक्षित, अडाणी, छळ सोसणाऱ्या स्त्रिया, मुलांकडे होणारे अक्षम्य दुर्लक्ष, गुंतागुंतीचे अनेक नातेसंबंध असणारी खूप मोठी कुटुंबे आणि आर्थिक हलाखी– सर्वांविषयी लेखिकेच्या मनात येणारे विचार, तद् नुषंगिक भाष्ये– यांची एकत्रित वीा या पुस्तकात दिसते. ‘जंगली, असंस्कृत माणसांच्या हातात आपण सापडलो आहोत,’ याची भयावह जाणीव झाल्यावर परागंदा झालेल्या नवऱ्याच्या पश्चात तिथून पळून जातान तिने दाखवलेले धाडस आणि भारतात परत येण्याची तिची प्रबळ आकांक्षा या कहाणीतून सतत समोर येते. तिथल्या मूलतत्त्ववादी प्रवृत्तीविषयी, स्त्रियांच्या परिस्थितीविषयी तिला जे आकलन झाले आहे; ते व्यक्त करण्यामागे तिची तळमळ आणि आधुनिक जाणिवा प्रत्ययाला येतात. मात्र ही लेखिका सराईत लिहिणारी नव्हे, हेही जाणवते. त्यामुळे हे जिवंत अनुभवकथन करताना त्यात सलगता राहिलेली नाही. मधूनमधून तिचे लहानपण, लग्नापूर्वीचे दिवस, मित्र-मैत्रिणी, छंद, आवडी यांविषयी जे तपशील वा निवेदन येते त्यामुळे या अनुभवांची तीव्रता उणावते. मात्र तरीही या कहाणीची वाचनीयता कमी होत नाही. प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेकडे विचारपूर्वक पाहण्याचा, ती समजून घेण्याचा, परिस्थितीशी जुळवून घेण्याची धडपड करणारा तिच्या जिद्दी आणि चिवट स्वभाववैशिष्ट्यांचा दाट परिचय ही कहाणी करून देते.चुलत सासरे, सासू, गुलमुटी नावाची नणंद, द्रानाइचाचा, कालाखान ही व्यक्तिचित्रे उठावदार झाली आहेत. आसमंचासमोर ठामपणे उभे राहून जाब विचारणे, खुरियेच्या घरात तालिबानींवर बंदूक रोखणे किंवा इस्लामाबादमध्ये साओमदच्या घरातून अतिशय हिकमतीने तिचे निसटून जाणे, या प्रसंगातून लेखिकेचे जगावेगळे धाडस दिसते. पोटतिडकेने मांडलेले जिवंत अनुभव, समर्पक भाष्ये हे या पुस्तकांचे वैशिष्ट्य!
सौ.मनिषा राजन कडव.
Comments
Post a Comment