रातराणी

*रातराणी*


त्या पूर्वेकडल्या, लहानशा गावात एक बंगली, सुंदर तेथ विराजित -

असे तियेच्या चहुबाजूंनी पर्णफुलांचे दाट आवरण जणु निसर्गराजाने दिधलेले तिला एक वरदान

त्या बागेमध्ये होती गर्दी एकच नाना वृक्षलतांची, कुणि होते वृद्ध वयाने, कुणि फुलती नव तेजाने कुणि अजुनि रंगती बालपणची स्वप्ने पाहुनी

त्या पलीकडे अति सुंदर ताठ्यात उभी ही कोण ? शोभे जणु कुणि तरी स्वर्गिची अप्सरा अवतरली भूवरी -

होते जवळच सुंदर एक सरोवर ज्यातून उडती अन् चमकती शुभ्र तुषार त्या जलामध्ये ती राणी न्याहाळत होती कान्ति आरस्पानी 

 आज पौर्णिमा, स्वच्छ चांदणे नीलाकाशी विखुरली सुमने अशा मुहूर्ती, राणी सुंदर सज्ज झाली मांडण्या स्वयंवर -

ती बहरली होती चहुबाजुने आणि नटली अंगप्रत्यंगाने घेउनिया सुंदर ओढणी तलम फुलांची जाळीतून खुलते कांती नवतेजाची -

घेतले तियेने ' जाई 'स अपुल्यासंगे आणि निघाली स्वयंवरासी सुंदर नवरसरंगे -

त्या बागेमध्ये जमले नृपती अनेक गुलाब, चंपक आणि पारिजातक तो तिकडे होता उभा मत्त निशिगंध चहूबाजुला पसरित होता धुंद सुगंध -

ही राणी रात्रिची गेली गुलाबापाशी परि जाता जाता काटा रुतला पायी पाहून फजिती, गर्वानेही गुलाब गेला फुगुनी परि क्षणात गेली रातराणी ती दुजाकडेही निघुनी -

तसाच तो चांफाही फसवा मोहुन जाता जवळी घेई चावा -

 आली राणी निशिगंधाचेपाशी जो उधळित होता गंधखाणीच्या राशी होता तोही उभा अति तोऱ्यात गेली राणी, परी आपुल्याच ऐटीत -

नव्हती त्याला किंमत सौंदर्याची तशीच नव्हती तिच्या मधुर पुष्पांची - आली राणी घेउन सखि ' जाई 'ला आणि नकळत दृष्टि वळली तिची भूमिला -

हा कोण ? उभा जो तिची वाट पाहात आतूर जियेचा कर घेण्या हातात तो सोज्ज्वळ, सुंदर होता पारिजातक ज्यावरी जाहली राणी अमुची मोहित तो पारिजात घे स्वर्गातून अवतार जणु रातराणीचे यशस्वी करण्या मंगल स्वयंवर

अगणित वर्षे आली गेली येता दिन ते शिशिर ऋतूचे राणी अमुची खुलते नवतेजाने आणि दरवळे सुगंध चहुबाजुने -

वर्षाऋतु संपे, येइल तोहि शिशिर आणि तयाच्या संक्रमणकाली पारिजात अन् रातराणीचे होईल मधूर मीलन सुरू तयांचे होईल अन् सौख्याचे ते जीवन


सौ.मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*