स्वभावाला पत्र
*स्वभावाला पत्र*
प्रिय स्वभाव,
आम्हा सर्व मनुष्य प्राण्याच्या आयुष्यात तुला खूप महत्व आहे. मुळात आमच्या व्यक्तिमत्वाची पारखच तुझ्यावरून केली जाते. काल सहजच एक मैत्रिण बोलून गेली, (मनिषा ) तुझा स्वभाव फार हळवा आहे. ती सिंपथि होती कि काय कुणास ठावूक पण अप्रत्यक्षपणे तिने माझ्यात तुला अधोरेखित केले. म्हणूनच आज मुद्दाम तुला पत्र लिहितेय.
स्वभाव,तू प्रत्येकातच दडलेला आहे. कधी कोणामध्ये फटकळ,कधी मृदू,भोळा निरागस,तापट लबाड तर कधी चांगला कधी वाईट या आणि अशा कित्तेक स्वरुपात तू असंख्य व्याक्तीत्वामध्ये जागा घेतली आहेस. आपण जेव्हा एखाद्याबद्दल बोलतो कि याचा स्वभाव असा आहे...तसा आहे...तेव्हा आपण हे कशाच्या आधारावर बोलतो..त्याचं इतर लोकाशी व्यवहार करताना आढळून आलेलं वागणं.. त्याच्यातील चांगल्या-वाईट वागण्याच कमी जास्त प्रमाणात इतरांना होत असलेले दर्शन...त्यातून प्रदर्शित होणार संवाद-विसंवाद...वपुंनी काय म्हटलय कि कुठलाही माणूस हा कायमचा वाईट नसतो ...फक्त तो आपल्याला हवा तसं वागत नसतो एवढंच.व्यक्ती आणि वल्ली यात वपुंनी व्यक्तिनिहाय (स्वभाव)तुझे रूप रेखाटलेच आहे.
अरे पण स्वभावा,आम्हा तरुणांमध्ये तुझ्याविषयी फार अज्ञान आहे बाबा, जन्मजात तर कुठल्याही चांगल्या वा वाईट स्वभावाचं आम्हा तरुणाईला कवचकुंडल लाभलेलं नसतं.आमच्या अज्ञानाच्या काळात तू एक माणसाचा चेहरा घेऊन असतो...मुक्त आणि स्वच्छंदी पाखरासारखा आमचा विहार असतो,तेव्हा जसजसे आम्ही मोठे होत आलो,स्वभोवतालच्या वातावरणात असणाऱ्या माणसाचं...त्यांच्या आपापसातील व्यवहारांचं....वागण्या,बोलण्याच पावलो पावली आमच्याकडून निरीक्षण,पृथ्थकरण,अनुकरण होत गेल ,मग त्या अनुकरणातून प्रत्येकाने आपापल्या परीने त्याच्या सोयीचा अर्थ काढून स्वत:च्या आयुष्याची दिशा ठरवली आणि ठरवतोच आहे. मला वाटत अश्याप्रकारे स्वभावा तुझा जन्म होत असतो तो प्रत्येक व्यक्तीमध्ये. हं हं एक गम्मत सांगते सोयरिकी सारख्या जीवनाच्या प्रश्नावर सगळे आधी तुझा विचार करतात.मुलगा/मुलगी स्वभावाने चांगली मिळावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते. त्या बाबतीत तू नशिबवान आहेस. एरव्ही मात्र सगळेच तुझ्या नावाने(मेल्याचा स्वभावच असा आहे) खडे फोडतात.
तुझा मला नेहमीच राग येतो. कारण स्वभावा तू सगळ्यांमध्ये सारखा नसतोस,आम्हा मानवजातीच्या विचारांमध्ये दरी टाकण्याचा मूर्खपणा तू नेहमीच करतोस.
कारकुनाचा स्वभाव वेगळा… शेतकऱ्याचा स्वभाव वेगळा… मजुराचा स्वभाव वेगळा… भिकार्याचा स्वभाव वेगळा … भिकार्याचा स्वभाव वेगळा अस का करतो.
तू सगळ्यांमध्ये सारखा राहा. बघ सृष्टीच कल्याण नक्कीच होईल.सगळे माणुसकी जपायला लागतील, पैसा आणि स्वार्थाच्या धर्तीवर तुझ्यामुळे नक्कीच खेळीमेळीच वलय एकमताने नांदू लागेल.
. . . . . . . . . तुझीच मनिषा..
सौ.मनिषा राजन कडव
१६/ ए , ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ,रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
Comments
Post a Comment