सात्विक संताप
*सात्विक संताप*
मंदिरात आहेस तर , जाग जरा देवा ,
गाभाऱ्याला लागू देरे , बाहेरची हवा ..... ।
डोळे मिटून घेशी जणू ,पाहुनी पतन ....
तुवा दिले माणसाला पृथ्वीचे वतन .... ।
विध्वंसाचा ठेका ,जगी माणूस मातावा ....
त्याचे भय न्यारे , तुवा गाभारा गाठावा ...|
उन्हामध्ये ताठल्या गा , भाविकांच्या रांगा ....
कोरडेला कंठ , घाम धावे चहू अंगा .... ।
तुझ्या वाटे , भक्तीचाही व्यापार पाहावा ...
तरी तुला आम्ही भक्त वत्सल म्हणावा ....|
चराचरी व्यापलेला असशी म्हणती ...
नित्य येते तुझ्या नसण्याची रे प्रचिती ....|
अमानुष खेळ जगी ,चालला पाहावा ....
सांग देवा तुला ,कुण्या राऊळी शोधावा ....|
लेकीबाळी मरतात , वासनेच्या खेळी ...
सांग कुठे असतोस , देवा तू त्या वेळी ....
अणूरेणूतून तुझ्या असण्याच्या ओळी
वाटे मला , कस तुझा पणाला लागावा .... ।
प्राक्तनाचे , प्रारब्धाचे , पाठ सारे धडे ...
निष्पाप जीवांचा बळी , यातनांचे मढे ....
माणसाला दिले मन बुद्धी , तू तोकडे ....
माणसाचा लगाम तू पुन्हा हाती घ्यावा ..... ।
कोटी कोटी रूपातून , प्रकट होतोसी ....
कोटी कोटी मनातून का न तू राहसी ....
मनातला देव कधी दानव होताची ...
मनातला दानव तू निर्दाळून द्यावा ..... ।
रोज रोज काय मने ,रक्ताळली व्हावी ...
रोज रोज काय नवी हाक मी घालावी ....
तुझ्या जगताची तुला तमाच नसावी ...
कधीतरी तुझा जीव कासावीस व्हावा ....|
ठाम इथे उभी मीही ,तुझ्या पायरीशी ...
नाही येणार आत ,तुवा यावे रे दाराशी ...
भक्ती लागो पणा , मनी दाटली असोशी ....
मला नको , न्याय साऱ्या जगाला दे देवा .... ।
सौ.मनिषा राजन कडव.
Comments
Post a Comment