काय हवय स्त्रीला
काय हवय स्त्रीला
सोने चांदी हिरे
अहो नकोत हिर्यांच्या माळा
फक्त कौतुकाने बघा डोळा
दमून जेव्हा ती घरी येते
कोणी देते का कपभर पाणी
इकडून तिकडून मिळतात फक्त
टोमणे क्षणोक्षणी
तिही दमते जरा
असाही विचार करा
घरी आल्यावर हवा असतो
तिला प्रेमाचा निवारा
कडकडीत उन्हात उन्हाच्या झळात
चालत असते तिही हो कुटूंबासाठी
सायंकाळी घरी आल्यावर तिलाही
हवा असतो हो शितल वारा
तोंडाने बोलत नाही कधी ती
पण तिचीही तळमळ होत असते
सगळे अपमान सहन करताना
आतून दाटून येत असत तिलाही
यावेळी अपेक्षा असते गोड फूंकरीची.
कपडे वाळत घालताना
एखादा कोपरा दुमडला जाऊन
तो दमट राहू नये म्हणून
काळजी घेणारी ती
एखादा दुःखी कोपरा
दुमडते मुद्दाम
नात्यात ओलावा टिकावा म्हणून
झोपताना बिछान्यावर
घातलेल्या चादरीला
चुण्या पडू नयेत म्हणून
काळजी घेते ती
आणि आयुष्याच्या चादरीला
अनुभवांच्या चुण्या पाडाव्यात
म्हणून झटत असते ती
स्त्री घेतेच काळजी
प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची
पोळी लाटताना चुकला आकार
नाही आला गोलावा
बाई लाटणं फिरवते
त्या चुकीच्या बाजूला
पोळी होते गोल
तसंच चुकीच्या गोष्टीवर
ती फिरवते नकाराचं लाटणं
आणि आणते गोलावा
योग्यतेचा
तिच्या कुटुंबासाठी ,
माणसांसाठी
दडलेले असतात तिच्या आत
कितीतरी समुद्र दुःखाचे
पण चेहऱ्यावर तिच्या नेहमी
हसत असतात काठ नदीचे
एखादा पसारा असलेला कोपरा
अचानक पाहुणे आल्यावर
ती शिताफीने ठेवते झाकून
तसेच ठेवते आपल्या माणसांचे
अवगुण ,त्रुटी जगासमोर लपवून
स्त्रीलाच जमतं
हे असं संसार करणं
स्त्रीलाच जमतं
आयुष्याला समजणं
आणि जगणं
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment