वीज

वीज

कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते
लख्ख प्रकाशामध्ये अवघे जगणे उज्ज्वल होते

उजेडात त्या न्हाते माझ्या मनातला अंधार
विचार पक्षी उडू पाहतो क्षितिजाच्याही पार
आकाशाचे अंगण त्याला अपुरे अपुरे होते
कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते

धगधगणारा अग्निलोळ मी हृदयामध्ये घेते 
धमन्यांमधून मग प्रवाही ऊर्जा धावत जाते
मरगळलेली प्रतिभा तेव्हा पुन्हा तरारुन येते
कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते

जणु एखादी नदी कोरडी दुथडी भरून वाहे
कवितेघरच्या श्रीमंतीची तऱ्हाच अद्भुत आहे
तिच्या कृपेच्या वर्षावाने झोळी भरून जाते
कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते

त्याच विजेला करून घेते मीही मग आपलेसे
लाख दिव्यांनी झगमगते हे घर माझे इवलेसे
चंदेरी सोनेरी होते, नशीब उजळुन निघते
कविता जेव्हा सुचते तेव्हा वीज चमकुनी जाते 
लख्ख प्रकाशामध्ये अवघे जगणे उज्ज्वल होते !

सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*