महिलांचे स्थान

महिलांचे देशाच्या विकासातील स्थान.

 
भारतात राहून, भारतीय असून भारताला नेहमीच रूढीवादी व स्त्रियांना शिक्षण व प्रगतीपासून दूर ठेवणारा अशा पद्धतीची प्रतिमा भारताची तयार करणारे लोक या गोष्टीचा कधीही विचार करीत नाहीत व भारतीय महिलांची जागतिक स्तरावर महिलांशी तुलनाही करीत नाही. ज्या देशांचा उगम जेमतेम 400-500 वर्षांपूर्वी झालेला आहे, त्या देशांशी स्वत:ची तुलना हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या देशातील जनतेने करणे हे कितपत बरोबर आहे? जगाच्या इतिहासामध्ये ज्यांना प्राचीन असं संबोधलं गेलं आहे अशा अनेक सभ्यता व देश जगाच्या रंगमंचावरून केव्हा अदृश्य झाले ते कोणालाच माहिती नाही. आजचे प्रगतिशील देश व त्यांचे नागरिक ज्या वेळेला अस्तित्वात नव्हते किंवा जंगलामध्ये लज्जा रक्षणासाठी झाडाची पाने गुंडाळून राहात होते, त्याच काळामध्ये किंवा त्यापेक्षाही आधी भारतामध्ये गार्गी आणि मैत्रेयीसार‘या महान विदुषी होऊन गेल्या आहेत. ज्या काळामध्ये महिला शिक्षणासाठी घराबाहेर म्हणजे शाळेत जात नव्हत्या, त्या काळामध्ये झाशीच्या राणी लक्ष्मीबाईने महिलांची फौज उभी केली. ही किती मोठी गोष्ट होती? परंतु, याचा भारतातील किती व्यक्ती आणि विदेशी लोकसुद्धा कितपत विचार करतात? भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आझाद हिंद फौजेच्या महिला सेनापती कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन या नव्हत्या का? भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचे योगदान तर अविस्मरणीय असेच आहे.
 
 
भारतीय कृषी व्यवस्थेमध्ये व अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान नेहमीच राहिलेले आहे. तरीसुद्धा जाणीवपूर्वक या देशातील सुधारणावादी म्हणविणारे काही लोक ज्या देशातील महिलांना हजारो वर्षांचा इतिहास आहे, त्या देशातील महिलांचा केवळ एखादा कालखंड अधोरेखित करून नवीन पिढीच्या मनामध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्था अशा पद्धतीचा आकस निर्माण केला जातो. देशामध्ये प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक राज्य, अनेक समाज असे आहेत की, ज्यामध्ये मातृसत्ताक पद्धती राहिलेली आहे.   काही लोक असेही  आहेत ते  शेतकरी विरुद्ध शेतमजूर, कारखानदार विरुद्ध मजूर तसेच महिला विरुद्ध पुरुष असा संघर्ष रेखाटण्याचा प्रयत्न होतो. याचा परिणाम नवीन पिढीच्या मनावर नकळत होत जातो. स्त्री-स्वातंत्र्य नावाचा एक शब्दप्रयोग आपण नेहमी ऐकत असतो. हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या मनात प्रश्न निर्माण होतो की, स्त्री स्वतंत्र नाही का? इंजिनीअर बनावे की डॉक्टर हे स्वातंत्र्य मुलींना नाही का? निश्चितच आहे.
 
 
प्रत्येकाला तो मुलगा असेल की मुलगी त्याला त्याचे करीअर निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. विवाह करावा की अविवाहित राहावे हे स्वातंत्र्य मुलींना नाही का? निश्चितच आहे. परंतु, जर कोणी म्हणत असेल की, समाजाच्या दबावामुळे आम्हाला हे निर्णय घ्यावे लागतात तर समाजाचा दबाव हा स्त्रियांवर असतो तसा पुरुषांवरही असतोच. विवाहानंतर अनेक मुलींना आपले शिक्षण, नोकरी किंवा करीअर सोडावे लागते, हे सत्य आहे. विशेषत: खाजगी कंपनीमधील नोकर्‍या मुलींना सोडाव्या लागतात. घरच्या जबाबदार्‍या व नोकरीतील जबाबदार्‍या यांचा मोठा संघर्ष विशेषत: स्त्रियांना सहन करावा लागतो. घरच्या जबाबदार्‍यांसाठी खाजगी नोकरी व शिक्षण सोडल्याची किंवा शिक्षण अर्धवट सोडल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर पूर्वीपासून आजपर्यंत आहेत. परंतु, विवाह झाला म्हणून घरच्या जबाबदार्‍यांसाठी सरकारी नोकरी एखाद्या महिलेने सोडली, याची उदाहरणे किती आहेत? फारच कमी असतील. त्यामुळे काय सोडावे व काय सोडू नये, याचे भान निश्चितच आजच्या महिलांना आहे व त्यांच्या सासरच्या लोकांनासुद्धा आहे.
 
 
जागतिक महिला दिनानिमित्त 2022 यावर्षीची जी संकल्पना आहे, ती म्हणजे शाश्वत उद्यासाठी लिंग समानता; आज हे घोषवाक्य जागतिक स्तरावरचे आहे. म्हणजे भारतात जरी आपण लिंग समानतेसाठी प्रयत्न करीत असलो, तरीही जगामध्ये अजून लिंग समानता ही मानसिकता प्रस्थापित झालेली नाही. ते आपल्याला यावरून लक्षात येते. मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद संपूर्ण जगातच पाळला जात आहे. हे काही चांगले लक्षण नाही. एकेकाळी विम्बल्डनच्या टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष विजेत्याला जास्त राशी व महिला विजेतीला कमी राशी दिली जात होती. खेळाडू हा खेळाडू आहे. ती महिला असो की तो पुरुष असो. जगाची मानसिकता यावरून आपल्या लक्षात येते. भारतामध्ये ऑलिम्पिक असो की दहावी-बारावीचे निकाल असो किंवा आय. ए. एस.चे निकाल असो, ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा आहे अशा अनेक ठिकाणी मुलींचे यशस्वी होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त दिसून येत आहे. त्याला कारणं काहीही असली, तरी मागील शतकामध्ये अनेक प्रकारच्या संधी ज्यांना उपलब्ध झाल्या नव्हत्या, त्या आता जसजशा संधी उपलब्ध होत आहेत, तसतसे संधीचे सोने त्या करीत आहेत, असेच दिसून येते. कधीकाळी भारतामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती, असे म्हणावे लागेल. आता ती अपवादानेच आढळते.
 
 
खाजगी कंपन्यासुद्धा आरोग्य विमा देताना कर्मचारी, त्याची बायको व त्याची मुले यांनाच कुटुंबामध्ये गृहीत धरतात. त्याच्या आई-वडिलांना नाही. म्हणजे हळूहळू कुटुंबाच्या व्या‘येत नवरा-बायको व पोरं एवढेच उरले आहेत. पूर्वी महिला आर्थिकदृष्ट्या पुरुषांवर अवलंबून असायच्या. आता मोठ्या प्रमाणावर त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या आहेत. कोणी कोणावर अवलंबून नाही. ‘तुझे तू माझे मी,’ अशा पद्धतीचे वातावरण समाजामध्ये काही प्रमाणात निर्माण होत आहे. जागतिकीकरण, औद्योगिकीकरण या सगळ्यांचा परिणाम कुटुंब व्यवस्थेवर तर झालाच; परंतु त्याच बरोबर नातेसंबंध व भावनिक जवळिकीवरही झाला आहे. पूर्वी कुटुंबाकरिता आपल्या करीअरचे बलिदान करण्याची वेळ आल्यास महिलांनाच ते करावं लागत होतं. हळूहळू काळ बदलत चाललेला आहे. महिलांचे करीअरसुद्धा समाज गृहीत धरत आहे. पूर्वी कुटुंब ही मु‘यत्वेकरून स्त्रीची जबाबदारी असायची; परंतु आता स्त्री-पुरुष दोघांनाही ही जबाबदारी वाटून घ्यावी लागणार आहे.
 
 
ड्रायव्हर सीटवर कोण बसेल हा वादाचा मुद्दा असू नये. प्रत्येक कुटुंबाची गरज वेगवेगळी राहू शकते. जो योग्य चालक  असेल, ती स्त्री असो की पुरुष त्याने ड्रायव्हिंग केले पाहिजे. ड्रायव्हिंगचा आनंदही असतो आणि ड्रायव्हिंगमुळे येणारा थकवाही असतो. काही वर्षे एखादी गोष्ट चांगली वाटू शकते; नंतर ती गोष्ट नकोशीही होऊ शकते. हे ड्रायव्हिंग म्हणजे कार चालविणे नसून कुटुंब चालविणे आहे. पूर्वीपासून स्त्री आणि पुरुष यांच्या अंगभूत नैसर्गिक गुणांचा अभ्यास करून आपल्या समाजामध्ये दोघांसाठी वेगवेगळे क्षेत्र निर्धारित केले गेले होते. काही काळानंतर ते क्षेत्र का निर्धारित केले गेले होते, याच्या उद्देशाचा विसर पडल्याने काहींमध्ये त्या क्षेत्राबद्दल अभिनिवेश निर्माण झाला तर काहींमध्ये मला अमुकच एक क्षेत्र का? असा न्यूनगंडसुद्धा निर्माण व्हायला लागला. त्यामुळे साहजिकच समाज नवनवीन परिवर्तन आणत असतो. हे सर्वच परिवर्तन व्यक्तीच्या इच्छा आणि आकांक्षा यातूनच येत असते. कोणतीच गोष्ट चिरस्थायी राहत नाही. काही गोष्टी आज कालबाह्य असतील.
 
 
कदाचित या उद्या पुन्हा येतील. आज सर्वमान्य असलेल्या गोष्टी कदाचित उद्या कालबाह्य होतील. स्त्री असो की पुरुष दोघांचाही व्यक्ती म्हणून विचार केला गेला पाहिजे. दोघांचेही वैशिष्ट्यपूर्ण स्थान समाजरचनेमध्ये आहे, हे मान्य केले गेले पाहिजे. सायकलचे हँडल जास्त महत्त्वाचे आहे की चाक, अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित करणे जसे निरर्थक आहे; तसे स्त्री श्रेष्ठ आहे की पुरुष, हे प्रश्न निरर्थकच आहेत. दोघांनाही आपल्या शारीरिक, मानसिक व नैसर्गिक मर्यादांचे व शक्तिस्थानांचे भान हवे. दोघांना मिळून एक परिपूर्ण समाज उभा करायचा आहे. हे जर उद्दिष्ट निश्चित असेल तर स्वर वेगवेगळे असले, तरी त्यातून उत्तम संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न असेल.समाजाच्या नवपरिवर्तनात स्त्रियांचे योगदान महत्त्वाचे आहे हे नाकारता येणार नाही.
भारतातील दलित, पीडित, शोषित, अन्यायग्रस्त महिलांना न्याय, हक्क, प्रतिष्ठा देण्यासाठी संपूर्ण समाजाने मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे वाटते.



सौ.मनिषा राजन कडव
१६/ए ओमशिवमकूपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
भ्रमणध्वनी क्रमांक - 9869718659, 8169239825

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*