लग्न जमणे - मोठी समस्या*
*लग्न जमणे - मोठी समस्या*
लग्न जमविण्याच्या विविध पध्दतीत आपण जरा इतिहासात डोकावुन पाहिले तर आपणांस असे दिसते की, पुर्वी लग्न ही जास्तीत जास्त नात्यात लावली जात. जसे आत्याच्या मुलाला भावाची मुलगी देणे, मामाला मुलगी देणे, साटेलोटे करणे, जवळपासच्या नात्यामध्ये मुलगी देणे, मुलगी जन्माला आली की लगेचच तिचे लग्न ठरविल्या जात. नामकरणाच्या पाळण्याला टिळा लावला जात. तिला माहित सुध्दा नसायचे की, तिचे लग्न होत आहे किंवा तिचा जोडीदार कोण आहे? कसा आहे? काय करतो? हे प्रश्न तिच्या मनात येण्याची संधीच तिला कधी मिळाली नाही. वयात येण्यापुर्वी किंवा वयात आल्यानंतर तिला कळायचे नवरा म्हणजे काय? यात मुलीला काही समजण्याच्या आत कोवळ्या बालपणातच तिच्यावर संसाराच्या जबाबदा-या टाकल्या जात....
अशातच एखाद्या विदुराशी, म्हाता-या माणसाशी सुध्दा लहान मुलीचे लग्न लावले जात. आणि त्यात जर तो म्हातारा नवरा मेला की हिच्या हाल अपेष्टांना येथुन सुरुवात होत. जे खेळण्याचे वय होते त्या काळात तिच्यावर असंख्य जबाबदा-यांचे रहाटगाडगे तिच्यावर सोपवुन घरातील (माहेरची) मंडळी निश्चिंत होऊन जात, एकदा का मुलीचे लग्न झाले की ते मोकळे ना.....! त्या घरात तिचे काहीही होवो मग.... पुर्वी असे म्हणायचे उभ्याने आईवडीलांच्या घरातुन जायचे व आडव्याने सासरच्या घरातुन बाहेर पडायचे म्हणजे मेल्यावरच तुझी त्या घरातुन सुटका होणार...... आणि मुलगी म्हणुन सतत हजारप्रकारची बंधने तिच्यावर लादणे, आपल्या वाड-वडीलांचे नाव खराब होईल असे कधी वागायचे नाही अशा अनेक प्रकरच्या सुचनांचे ताट समोर वाढुन ठेवलेले असायचे. यातच सासरची मंडळी चांगली असतील तर ठिक नाहीतर तेथेही घरातील मंडळींकडुन तिचे शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण केले जात. या अवस्थेत तिला कोणाशी बोलण्याची, कुणाशी हितगुज करण्याची सुध्दा मुभा नसे, शिक्षण तर खुप लांबची गोष्ट होती. हे सर्व मुकाटपणे सहन करणे म्हणजे तिचा धर्म होता.... हीच का आपली संस्कृती होती, ज्यात पुरुषप्रधान लोक स्त्रियांना नेहमी पदोपदी पायाखाली पहात.
१८ व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांनी स्त्री शिक्षणाचा वसा घेतला व स्त्रियांना शिक्षणासाठीची दारे उघडुन दिली. एक-एक करत ब-याच समाजसुधारकांनी यात बहुमोल असा वाटा उचलत स्त्री शिक्षणाचे महत्व जगासमोर आणले.. एका घरात एक पुरुष शिकला तर फक्त तो एकटाच शिकतो परंतु एका घरातील स्त्रीला जर शिक्षण दिले तर पुर्ण घर ती शिक्षित करु शकते एवढी तिच्यात क्षमता होती पण तिलाच ब-याच गोष्टींपासुन वंचीत ठेवण्यात येत होते.
आज २१ शतकात स्त्रीयांना- मुलींना शिक्षणाच्या खुप संधी उपलब्ध झाल्या असुन त्या शिक्षण घेऊन खुप उंच भरारी देखील घेत आहेत. आज जर १० वी १२ वी चे निकाल आपण पाहिले तर सर्वात पुढे आपल्याला मुलीच दिसुन येतील. पुरुषांच्या बरोबरीने आज त्या शिक्षण घेऊन नौकरी देखील करत आहेत. आकाशाला गवसणी घालणे, किंवा स्मशानात लाकडे विकण्यासाठी बसणे अशी सर्व कामे ती हिंमतीने पुढे येऊन करत आहे. घरातील वाईट प्रसंग असो वा इतर कुठलाही यात निश्चितच चांगला निर्णय घेण्याची क्षमता आज तिच्यात निर्माण झालेली आहे. जर आयुष्यात कधी काही वाईट प्रंसंग आलाच तर ती स्वत:च्या पायावर आज खंबीरपणे उभी राहील एवढी हिंमत तिच्यात आलेली आहे. प्रत्येक बाबतीत स्त्रीया या पुढे गेलेल्या आपल्या निदर्शनास येतील.
आजच्या या धकाधकीच्या जिवनात मुला-मुलींना स्वत:चे शिक्षण, करिअर, नौकरी, घर, पैसा हे महत्वाचे वाटत असल्याने सर्वजण त्यामागे न संपणा-या स्पर्धेत सतत धावत आहेत. तसेच आइवडिलांच्या इच्छा पुर्ण करणे, (जसे आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर, वगैरे उच्च पदवी घेऊन चांगल्या नौकरीला लागणे) यामुळे आज मुलामुलींचे लग्नाचे वय वाढत चाललेले आहे. सरासरी २५ ते ३० च्या पुढे लग्नाचा विचार सुरु होतो. मुलांच्या बाबतीत विचार करतांना मुलाचे शिक्षण, नौकरी, घर, पैसा, शहर वगैरे गोष्टींचा विचार मुलीच्या भवितव्यासाठी प्रत्येक मुलीकडील पालक करत असतात.
याचप्रमाणे मुलींच्या बाबतीतही शिक्षण, नौकरी, पैसा, शहर, वगैरे गोष्टींच्या व्यतिरिक्त मुलीला घरातील सर्व स्वयंपाक, काम यायला हवे, घर सांभाळुन नोकरी करणारी असावी, तसेच महत्वाचा मुद्दा म्हणजे मुलीचा रंग, मुलीचे दिसणे खुप महत्वाचे असते. जसे एखाद्या सिनेमातील सुंदर, रुपवान सिनेतारका ही प्रत्येकाला बायकोच्या स्वरुपात हवी असते. काही ठिकाणी लोकांना २४ तास घरातील कामवाली बाईप्रमाणे काम करणारी, घरातील मंडळींची, पाहुण्यांची आवभगत करणारी बाहेर नौकरी करुन हातात पैसा देणारी, सुन हवी असते. अशा अपेक्षा ठेवणारे रती- महारती देखील निदर्शनास येतात.
सुंदरता म्हणजे काय? रंगाने उजळ असणे, यावरच मुला-मुलींची सुंदरता तपासली जाते, परंतु या ठिकाणी त्या व्यक्तीच्या अंगी असणा-या कलागुणांना कोणी वाव देतांना दिसुन येत नाही. आज महागाईच्या जगात मुलगा-मुलगी दोघेही कमावते असणे ही काळाची गरज बनलेली आहे, संसारातील सर्वच गोष्टींची पुर्तता करण्यासाठी, सर्व ईच्छा पुर्ण करण्यासाठी लग्न करतांना मुलगी चांगली कमावणारी, चांगले पॅकेज असणारी शोधण्याचा ट्रेंड सध्या सुरु आहे. सॉफ्टवेअर मध्ये असेल तर काही विचारण्याची आवश्यकता नाही असे लोकांना वाटत असते.
काही ठिकाणी प्रेम-विवाह करण्यास परवानगी दिली जाते, परंतु आजही काही पालक आंतरजातीय विवाहाच्या विरोधात असलेले आपणांस दिसुन येतात. कारण समाजातील लोक काय म्हणतील असा प्रश्न पालकांना पडलेला असतो. मुलामुलींचे एकत्र शिक्षण, एकत्र काम केल्याने काही व्यक्तींना आपला जोडीदार असाच असावा असे मनातुन वाटत असते. परंतु लग्नासाठी घरच्यांची परवानगी ज्या वेळेस मागितली जाते त्या वेळेस स्पष्टपणे नकार दिला जातो. अथवा काहीतरी धमकी त्या मुला-मुलींना पालक देतात. अशा परिस्थितीतील मुला-मुलींना स्वत:च्या इच्छांवर पाणी घालुन पुन्हा चहा-पोह्याच्या कार्यक्रमांना सामोरे जावे लागते. पण आयुष्यातील ही तडजोड चार लोकांना धोक्यात टाकणारी असते. यानंतर ज्या व्यक्तीशी ते लग्न करतील खरचं का ते मनापासुन दुस-या व्यक्तीला प्रेम, आपुलकीने स्वीकारु शकतील का? हा खुप मोठा प्रश्न न सांगता येण्यासारखा आहे. यामुळे पालकांनी आपल्या मुलांना येथे समजावुन घेणे खुप आवश्यक आहे.
यातच जन्मकुंडली, अंकशास्त्र मधुन-मधुन डोकावत असते, लग्न होण्याकरीता एखाद्या ग्रहाची शांती, जप करणे, विविध रत्नांचे खडे घालणे वगैरे उपाय भटजी सांगत असतातच आणि वरुन विविध प्रकारे घाबरवतात. जसे लग्न लवकर होणार नाही, कुंडलीप्रमाणे पुढे भरपुर अडचणी येतील, अशी विविध प्रकारची भीती दाखवतात. यातच जर चुकुन मुला-मुलीची पसंती आली की १८ पेक्षा कमी गुण जुळत असतील तर ते लग्न ही होत नाहीत. लग्न न जुळण्यास असे विविध अडथळे निर्माण होत असतांना आपल्याला दिसुन येतात. मग कुणाच्या कुंडलीतील मंगळ आडवा येतो तर कुणाच्या कुंडलीतील राहु, केतु, रवी, शुक्र, शनी असे ग्रह आडवे- उभे येतात त्यामुळे लग्न जुळविण्याचे राहाते दुर... समस्यांचा पहाड वाढत जातो...
यातच लग्न ठरवितांचा महत्वाचा मुद्दा असा तो म्हणजे हुंडा, Dowry, विविध वस्तुंची मागणी यात होते जसे सोने, गाडी, लॅपटॉप, घर, तसेच लग्न चांगल्या पध्दतीने लावुन देणे, येण्याजाण्याचा खर्च, पाहुण्यांची सरबराई हे सर्व करता- करता मुलीच्या माहेरच्यांची तर तारेवरची कसरत होते. कसे तरी मुलीचे चांगले व्हावे अशी प्रामाणिक साधी अपेक्षा मुलीच्या आईवडीलांची असते. परंतु काही ठिकाणी सतर्क मुली असतील तर एवढ्या गोष्टी मागणा-या मुलाकडील लोकांना त्या स्वत:च नकार देतात. आणि मी तर म्हणेन तो द्यायलाच हवा. कारण आज एवढ्या मागण्या असतील तर उद्या भविष्यात नक्कीच याचे प्रमाण वाढणार अशी शंका घेण्यास काहीच हरकत नाही.
काही वेळेस असे दिसते की, मुलगी चांगल्या नौकरीला असते आणि मुलाचे कमी शिक्षण असते, तो काहीच करत नाही, कुठेतरी- काहीतरी छोटेमॊठे काम करत असतो, तरी पालकांना वाटते आपल्या मुलीचे कुठे जुळत नाही तर तिचे अशा व्यक्तीसोबत लग्न लावुन द्यावे, मुलगी आहेच ना घर सांभाळायला. पुढे काहीतरी करेल तो असे पालकांना वाटत असते. पण खरचं का तिचे भवितव्य चांगले होणार असते? या ठिकाणी एका सुशिक्षित, नौकरी करणा-या मुलीच्या काहीच का अपेक्षा नसतात? आणि याच ठिकाणी जर मुलीने बोलुन दाखवले की, मला असा नवरा नको तर तेथे तिला एक मुलगी म्हणुन तडजोड करायला लावणारे देखील पालक असतातच.
अशा विविध कारणांमुळे मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढत चाललेले दिसुन येते. त्यात अजुन एक भर म्हणजे विविध वधु-वर सुचक मंडळे. ही आपल्याला प्रत्येक ४ गल्ल्या सोडल्या की पाचव्या गल्लीत लगेचच सापडतील. प्रत्येक जातीनिहाय वेगळी मंडळे आढळतात, तसेच आज आंतरजातीय लग्न करण्यास इच्छुक असणा-यांसाठी आमच्याकडे याद्या उपलब्ध आहेत अशा जाहिराती करणारे देखील कमी नव्हेत... पण येथे येणा-या प्रत्येक इच्छुक मुलामुलीस स्थळे सापडतील याची काडीमात्र शाश्वती नसते.
आज इंटरनेट वर देखील भरपुर लग्नासाठीचे वधु-वरसुचक मंडळे आहेत. या इंटरनेटवर बरेच व्यक्ती स्वत:च्या बाबतीत खोटी माहिती लिहितांना देखील आढळतात. परंतु प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारखा जोडीदार मिळेलच असे नाही. यात मी कुठल्याही वधुवर सुचक मंडळांना दोष देणार नाही शेवटी त्यांचा उद्देश चांगला असतो. पण अशा ठिकाणी फार कमी लग्ने जुळुन येतात, शेवटी तडजोड ही प्रत्येकाला आपल्या आयुष्यात करावी लागतेच.
माझ्या काही होस्टेलच्या मैत्रिणी आहेत, ज्या दिसायला सुंदर, चांगली नौकरी असुनही स्वत:चे करिअर सांभाळत असल्याने त्यांचे लग्नाचे वय वाढत चाललेले आहे. काही मुलांचे देखील तसेच आहे ते जीवनात Option ठेऊन जगतांना दिसतात. मी सर्वच बाबतीत मुलांनाच दोष देते असे नाही, परंतु मुला-मुलींकडील दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना समजावुन घेणे आवश्यक झाले आहे. तसेच वरुन आजची पिढी लग्न करण्यापुर्वी दोघांचे विचार जुळले पाहिजेत या विचारावर ठाम असते आणि शिक्षणाने एकमेकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे, कोण आपल्याला सुटेबल असेल याची जाणिव प्रत्येक मुला-मुलीमध्ये आली आहे. पण केवळ लग्न होण्यासाठी वर्ष दोन वर्षाकरिता विचार जूळण्याच नाटक दोघांनी न करणे याच भान ठेवावं. खोटेपणा उपयोगाचा नाही. मेड फॉर इच आदर पेक्षा मोल्ड फॉर इच आदर होण्यावर भर दिला पाहिजे.
माझे तर असे म्हणणे आहे की प्रत्येक वधुवर सुचक मंडळांनी विवाहापुर्वी समुपदेशन केंद्र चालु करावेत. यात या ईच्छुक वधुवर मुलामुलींना बोलावुन त्यांना आयुष्यात काय हवे आहे, कसे हवे आहे हे समजवुन घेणे, लग्नानंतर संसारात येणा-या अडचणी यावर मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. कारण फक्त तडजोड करुन किंवा समाजात नाव खराब होऊ नये म्हणुन, आईवडीलांच्या इच्छेसाठी लग्न करुन गळ्यात लोडणे बांधायचे याला लग्न नाही म्हणता येणार.
कारण आज लग्न फार कमी टिकतांना दिसतात, त्यामुळे मुले-मुली लग्न न करता तसेच राहण्याचा देखील विचार करत आहेत. कुठेतरी घरातील, विविध समाजातील, मोठ्यामंडळींनी एकत्र येऊन यावर विचार विनिमय करायला हवा. कारण जोडीदाराची गरज प्रत्येकाला असते. वधु-वर सुचक मंडळातील मुला-मुलींचे वय जास्त न वाढता वेळेत लग्न होतील व टिकतील याकडे लक्ष देत महत्वाचे आहे. वेळेत लग्न न होणे ही समस्या म्हणजे पुढच्या येणा-या पिढीसाठी हे सर्व निश्चितच घातक ठरणारे आहे.
सौ.मनिषा राजन कडव
१६/ए ओमशिवमकृपा को.हौ. सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
Comments
Post a Comment