सिनेमा पाहणारा माणूस
"सिनेमा पाहणारा माणूस"
तुमची शालांत परीक्षा आहे. शेवटचा पेपर गणित दुपारी ३ वा आहे आणि तुम्ही सकाळी घरातुन निघता. मॅटिनीला देव आनंदचा " तेरे घर के सामने " पाहता आणि ’ इक घर बसाऊंगा तेरे घर के सामने’ असं गुणगुणतच गणिताचा पेपर सोडवायला घेता. ( आणि १०० पैकी ९४ गूण मिळवता) असं करणारा माणूस हा ठार वेडा किंवा सिनेमावेडा असला पाहिजे. सिनेमाने ज्यांचं अवघं जगणं व्यापुन टाकलं आहे अशी काही माणसं असतात. राज कपुर म्हणायचे " आय ड्रीम सिनेमा.. आय लिव्ह सिनेमा.. आय ब्रीद सिनेमा". अशोक राणे हे त्यापैकी एक. म्हणुनच ते म्हणतात " थिएटरमधे अंधार पडला की मला खूप सुरक्षित वाटतं.. अगदी अॅट होम वाटतं !"
सिनेमा पाहणारा माणूस आणि तेही सातत्याने सिनेमा पाहणारा माणूस म्हणजे वाया गेलेला असा समज आहे. आज साठी ओलांडल्यानंतरही अशोक राणे वर्षाला ३०० च्या वर सिनेमे पाहतात. शाळेत नेहमी पहिल्या नंबरचा विद्यार्थी असणारे अशोक राणे यांना खरं तर केमीकल इंजिनिअर व्हायचं होतं. पण विधीलिखित काहीतरी वेगळंच होतं. लहानपणापासून असणारं सिनेमाचं वेड त्यांना अशा वळणावर घेऊन गेलं की सिनेमा हाच त्यांचा ध्यास झाला. जगण्याचा मार्ग झाला. याच सिनेमाने त्यांना जगभर फिरण्याची संधी दिली. पाचवीत असताना " हर्क्य़ुलिस" चित्रपट पाहण्यासाठी आईकडे पाच आणे रडुन मागणार्या अशोक राणे यांना आज जगभर चित्रपट पाहण्यासाठी, समिक्षण करण्यासाठी, ज्युरी म्हणुन, व्याख्याते म्हणुन सन्मानाने निमंत्रित केलं जातं. ( या हर्क्युलिस चित्रपटाला आई कडुन पाच आणे कसे मिळाले याचीदेखिल खूप गंमतशीर गोष्ट या पुस्तकात आहे)
"सिनेमा पाहणारा माणूस" ही काही अशोक राणे यांची आत्मकथा किंवा आत्मचरित्र नाही तर चित्रपटावर मनस्वी प्रेम करणार्या एका माणसाची रंजक गोष्ट आहे. ही गोष्ट सांगताना अगदी लहानपणापासून त्यांनी स्वत:बद्दल काही सांगितलं असेल तर तेही त्यांच्यातला सिनेमा पाहणारा माणूस कसा घडत गेला या विषयीच आहे. हे सांगणही फार प्रवाही आणि रसाळ आहे. वाचणारा त्यात गुंतून पडतो. अगदी लहान वयातही त्यांचं सिनेमा पाहणं त्यांच्याही नकळत सजगपणे होत होतं. एका ठिकाणी ते लिहीतात " आजूबाजूला घडणार्या गोष्टींनी घातलेली कोडी नकळत सिनेमा सोडवून देत होता". निमिर्ती प्रक्रियेसंबंधी मुळापासून असलेलं कुतूहलच आणि एकुण जगणं,सतत बदलत जाणारं भोवतालचं जग, भेटणारी माणसं यातून त्यांच्यातला सिनेमा पाहणारा माणूस घडत गेलाय असं अशोक राणे नमुद करतात.
गेली चार दशके अशोक राणे सिनेमा पहात आहेत. अगदी लहानपणी चित्रपट रसिक म्हणून सुरु झालेला हा प्रवास पुढे विद्यार्थी, प्रभात चित्र मंडळ या फिल्म सोसायटीचा कार्यकर्ता, विविध मराठी वर्तमानपत्रांमधे केलेले चित्रपट विषयक समिक्षण, नंतर फिल्म एप्रिसिएशन कोर्समधे चित्रपट रसास्वादावर शिकवणे, आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामधे ज्युरी किंवा सदस्य किंवा अध्यक्ष म्हणून सहभाग, टीव्ही मालिका, डॉक्युमेंटरीज आणि चित्रपटांचे लेखन, पटकथा, संवाद, दिग्दर्शन अश्या थक्क करणार्या प्रवासाची ही गोष्ट आहे.
सिनेमा आवडणार्या आणि सिनेमावर प्रेम करणार्या प्रत्येक रसिकाने आवर्जुन वाचावं असं हे पुस्तक आहे. जगभरातले सर्वोत्तम चित्रपट पाहिलेल्या, त्याबद्दल प्रचंड वाचन केलेल्या आणि त्यातल्या अनेक दिग्गजांना प्रत्यक्ष भेटलेल्या आणि त्यांच्या मुलाखती घेतलेल्या अशोक राणे यांची भाषा आणि सांगण्याची शैली अशी निगर्वी की वाटावं कोणीतरी आपलाच मित्र आपल्याशी बोलतोय. हे पुस्तक वाचताना त्यांच्या या प्रवासात आपणही नकळत सामील होतो. चित्रपटाकडे पाहण्याची आपलीही दृष्टी समृध्द होण्यास मदत होते.
कला क्षेत्रातही वर्गवारी असते. म्हणजे आर्ट फिल्म वाले कमर्शिअल फिल्मकडे तुच्छतेने बघतात तर कमर्शिअल फिल्मवाले आर्ट फिल्मवाल्यांची खिल्ली उडवतात. अशोक राणे कोणताही पूर्वग्रह न ठेवता या दोन्हीकडे डोळसपणे पाहतात. जागतिक चित्रपटांइतकंच त्यांना भारतीय चित्रपटांबद्दलही कुतूहल आहे. गाणी हे भारतीय चित्रपटाचं बलस्थान आणि अविभाज्य अंग.’ अशोक राणे यांनी ’ सिंगींग इन सिनेमा’ आणि " अॅंथनी गोन्सालविस- द म्युझिक लिजंड" या विषयावर डॉक्युमेंटरीज केल्या आहेत. त्या गोष्टी मुळा्तूनच वाचण्यासारख्या आहेत.
एकूण ५१२ पानांचं असलेलं हे पुस्तक दोन चार पानांच्या लहान लहान लेखांमधे विभागलं गेलं आहे. प्रत्येक लेख स्वतंत्र असुनही तो पुढच्या लेखाला जोडणारा आहे. यामुळे हे पुस्तक सलग वाचावं असं नाही. कुठलंही पान काढून वाचलं तरी रंजक वाटेल असं झालं आहे. सिनेमा पाहणारा माणूस घडत असताना सिनेमाच्या विविध अंगाशी निगडीत येणारे सर्वच घटक या पुस्तकात वाचायला मिळतात. उत्तमोत्तम चित्रपट, चित्रपटाची समिक्षा, जागतिक दर्जाचे समिक्षक, दिग्दर्शक, अभिनेते, एडीटर्स, पटकथा लेखक, सिनेमेटोग्राफर्स, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, संगीतकार अशा विविध अंगांची त्यातल्या दिग्गज माणसांची ओळख हे पुस्तक वाचताना होते. महत्वाचे म्हणजे यातले बहुतांश अनुभव हे लेखकाने त्या व्यक्तींना प्रत्यक्ष भेटुन किंवा त्या घटनेचे साक्षीदार असलेल्या इतर लोकांकडुन घेतले असल्याने ते जास्त परिणामकारक आणि गुंतवून ठेवणारे होतात.
या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे "अंडरस्टॅंडींग सिनेमा इज अंडरस्टँडींग लाईफ". जगात दरवर्षी निर्माण होणार्या चित्रपटांपैकी सर्वात जास्त चित्रपट भारतात निर्माण होतात. तरीही जागतिक चित्रपटांच्या तुलनेत भारतीय चित्रपट कुठे आहे हा प्रश्नच आहे. चित्रपट हे केवळ दोन घटका करमणूक करण्याचं साधन नाही तर ते साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला या सारख्या अभिजात कलांप्रमाणेच एक कला आहे हेच आपल्या अनेक जणांच्या गावी नसतं. सिनेमाचंही एक सौदर्यशास्र असतं. कथा, पटकथा, संवाद, चित्रिकरण, दिग्दर्शन, संकलन, संगीत अशा विविध अंगांनी चित्रपट सजत असतो. या प्रत्येक गोष्टीतलं सौदर्य टिपता आलं तर या कलेचा अधिक चांगल्या रितीने आस्वाद घेता येतो. मग तो चित्रपट कलात्मक असो वा धंदेवाईक. आपला चित्रपट प्रवास सांगताना अशोक राणे यांनी सिनेमाच्या अशा अनेकविध घटकांबद्दल आत्मियतेने लिहलं आहे. हे वाचताना सिनेमा या विषयावरचा व्यासंग आणि या माध्यमावरचं त्यांच अलोट प्रेम दिसून येतं. गेली चार दशकं सिनेमातल्या अशा अनेक क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतरही अशोक राणे हे स्वत:ला " सिनेमा पाहणारा माणूस" म्हणुनच समजतात आणि हेच त्याचं वेगळेपण आहे. सर्वसामान्य रसिकांपासून ते अगदी चित्रपट अभ्यासकांनाही उपयुक्त ठरावं असं हे पुस्तक म्हणजे सिनेमा आवडणार्या कोणत्याही रसिकाने चुकवू नये अशी चित्रपटांच्या अनोख्या दुनियेची समृध्द सफर आहे .
चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचे सिनेमा पाहणारा माणूस, हे आत्मकथन असलं तरी, सर्व काही सिनेमा असं आहे. ५१२ पानांचं हे पुस्तक वाचकांना मराठी , हिंदी आणि जागतिक सिनेमाबद्दलच आणि त्यात गुंतलेल्या लोकांविषयी बरीच माहिती पुरवणारं आहे. फिल्म सोसायटी चळवळीची गरज आणि मर्यादा, चित्रपट समीक्षा, खुसखुशीत किस्से असं खूप सारं काही यांत वाचायला मिळतं.
यांतील आशय सकस आहे मात्र तरी पुस्तक थोडंसं लांबलेलं वाटतं.
सोबत पुस्तकांचे छायाचित्र
Comments
Post a Comment