घर
घर...
स्मिताने छकुल्याचा हात धरला आणि तडक घराच्या उंबऱ्याची वेस ओलांडून ती रेलवेस्टेशनच्या दिशेने निघाली. काल जरा जास्तच बोललो आपण असं तिला सारखं मनात खात होतं. "हा माझा प्रश्न आहे" हे वाक्य अश्रुधारा बनून वैनींचा पदर पूर्ण दिवसभर भिजवत होतं. जाऊबई खरं तर खूप प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या होत्या. पण प्रेमळ असलं म्हणजे त्या व्यक्तीला आपली मतं नसतात का? असे रमेशरावना वाटत होते. रमेशराव आणि वहिनी म्हणजे शिवपार्वतीचा जोडा वाटे. मुलं शाळेत गेली होती आणि रिकाम्या घरात हा असा भावनांचा महापूर सुरू होता.या घराला नवीनच!
स्मिता तीन महिन्यांपूर्वी महेशशी लग्न होऊन आपल्या सासरी आली , आणि लवकरच ती त्या घराची कधी झाली ते कळलं ही नाही.आपल्या दक्ष आणि प्रेमळ स्वभावाने तिने थोड्या काळात सर्वांचे मन जिंकून घेतले होते. आणि मोठ्या जाऊबाई तर जाऊ नाहीच मोठी बहीण,कधी आई अशाच. ही स्मिता लेक होऊन राहिली होती. स्मिता म्हणजे अगदी जाऊबाईंच्या ओठावर वसलेलं गाव झालं होतं. पण मग आज काय झालं होतं?
दादर हुन सुटणारी स्लो कल्याण पकडली स्मिताने. त्याच गाडीला भांडुपला महेश चढला. ठाण्याला सगळ्या कागद पत्रांची पूर्तता करून दोघे दादरला परत घरी आले. छकुल्याला स्मिताचा लळा लागला होता. कदाचित त्या तीन वर्षाच्या निरागस मनाने हीच आपली आई म्हणून तिला स्वीकारलं होतं. आता स्मिताने वैनींची माफी मागायची ठरवली. आधार ओरफनेज मधून छकुल्याला आणणं हा निर्णय वैनींच्या जुन्या संस्कारात वाढलेल्या मनाला पटत नव्हता,जरी अनाथाला आधार देणे पटत होते पण वळत नव्हते. स्मितासाठी हा निर्णय स्वाभाविक होता.वैनींनी स्मिताला समजावण्याचा प्रयत्न केला पण उपयोग नव्हता. आणि फटकळ स्वभावाच्या अनुसार स्मिताने त्यांना वरचे उत्तर दिले. वैनीचे भरून आलेले डोळे स्मिताला अस्वस्थ करत होते.
स्मिताने बेल वाजवली. काSSSSकु म्हणून तो वैनींना बिलगला. काय करावे त्यांना समजेना...मेण वितळावे थोड्याश्या उष्म्याने तशा वैनी पाघळल्या...त्यांनी गोबऱ्या गालाच्या छकुल्याला गचकन कुशीत घेतले आणि पुन्हा त्याच मायाळू डोळ्यांनी स्मिताकडे पाहिले. आणि सारा महापूर आता प्रेमाच्या सागराकडे अलोट वाटचाल करत होता.रमेशराव फक्त किनारा न्याहाळत होते.
सौ. मनिषा राजन कडव
१६/एक ओमशिवमकृपा को. सौ. सोसायटी
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
Comments
Post a Comment