निश्चय

निश्चय


 ती मागे वळून पाहत होती . तीचा भूतकाळ आठवत होती. मन कसं खिन्न झाल होत. इथपर्यत पोहोचण्यासाठी तीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. आज ती नोकरीच्या बाबतीत समाधानी होती पण भूतकाळातील तिची अवस्था आठवून ती फार अस्वस्थ होत होती. ती बी.ए. झाल्यावर ती MPSC पास झाली आणि तिची नेमणूक कमिशनर ऑफीसमधे कनिष्ठ लिपीक म्हणून नेमणूक झाली. आणि ती कामावर रूजू झाली. सरळ साधी रहाणी तिची असली तरी ती कामामध्ये फार हुशार होती. त्यांच्या ऑफीसच्या परिक्षा पास करत ती आज या पदापर्यंत होती. ती मुख्य लिपिक पदापर्यंत पोहोचली होती. स्नेहल स्वभावाने खरच सरळ साधी होती. तिला गर्व असा कधीच नव्हता. तिच आयुष्य खूप चांगल चालल होत. पण फक्त भूतकाळातल्या कटू आठवणी सोडल्या तर सर्व काही व्यवस्थित होत. ती अत्यंत गरीब अशा कुटूंबात जन्माला आली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे परिस्थीतीला चार हात लांब करत ती आज येथे पोचली होती. आज तिच्या मैत्रिणीचा साखरपुडा ठरला होता. ती आपल्या होणार्‍या पतीविषयीच्या गोष्टी हिच्याशी सांगत होती. तीला आनंदाने या गोष्टी सांगताना पाहून हिला मनातून फार खीन्न वाटत होत. माझ्याच बाबतीत का असं घडत आहे. देव माझ्या बाबतीत का वाईट वागला. मनातून फार ती दुःखी झाली होती. पण ती कोणाशी याबाबत बोलूही शकत नव्हती. आपल्याच इज्जतीचे धिंदोडे कुठे काढत बसणार. मैत्रिण गेल्यावर ती टेबलावर डोकं ठेवून पहुडली डोक फार जड झालं होत. आक्रंदून हमसून हमसून रडाव असं तिला वाटल होत. स्नेहल नोकरीला लागल्यावर तिच्या बाबांनी तिच्यासाठी स्थळ पहायला सुरूवात केली. खरतरं घरची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती. पण योग्य वयात लग्न झालं तर बरं म्हणून बाबा आई प्रयत्न करत होते. दोन वर्ष स्थळ शोधूनही तिच्या योग्य स्थळ मिळत नव्हते. शेवटी एक स्थळ आले. पण मुलगा नोकरीला नव्हता. चांगला शिकलेला होता. स्वतःची गाडी होती. ती तो भाड्याने द्यायचा. किराणाचे दुकान होते. मोठा भाऊ व लहान बहिण अशी तीन भावंडे. बाकी दोन्ही भावंडे नोकरीला होती. स्नेहलच्या समाजात नोकरीला असलेले चांगले स्थळ मिळणे फार मुश्कील होते. म्हणून बाबांनी या स्थळाला होकार कळवला. तिचे लग्न अगदी थाटामाटात झाले. ती खूष होती . तिला श्रीमंत सासर मीळाले होते.पण पाहुणे घरात असे पर्यंत सगळ ठिक होत. पण पाहुणे निघून गेल्यावर नव्याची नवलाई ओसरली. घरात कोणीच तिच्याशी नीट वागेना,नीट बोलेना. नवर्‍याने तर तीला पत्नीचा दर्जाच देण्याच नाकारलं. तिच तिलाच कळतं नव्हतं. तिच काय चुकलं होतं ते. मनातून खूप खिन्न झाली होती ती. कोणाशी बोलू शकतं नव्हती. एकाच बेडवर झोपून दोघेही अनोळखी होते. तिने खूप वेळा त्याला विचारले. माझं काही चूकलं का? तूम्हाला काही समस्या आहे का? हवतरं आपण डाॅक्टरकडे जाऊ. ट्रिटमेंट घेऊ. तूम्हाला वेळ हवा आहे का ? तुम्हाला दुसरं कोणी आवडत होत का? घरच्यांनी तूम्हाला माझ्याशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली का? सर्व प्रकारे तिने त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. पण तो या विषयावर काहिच बोलत नव्हता. सासूशी याबाबत कसे बोलावे हेही तिला कळत नव्हते. नविन संसाराची स्वप्न रंगवण्याच्या वेळेला ती फार अस्वस्थ होती. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा झाला होता. तिला समजतच नव्हते कुठे काय चुकलय. माझ्यासोबत असं का होत आहे. याबाबत कोणाशी बोलावे. मनातल्या मनात ती रडत होती. पण चेहर्‍यावर ती दाखवत नव्हती. एकदा धिर करून तिने सासूकडे विषय काढला. यावर उलट ती तिच्यावरच भडकली. सकाळी लवकर उठून घरातल आवरायचं , ऑफीसमधे काम करून दमून घरी यायच आणि पुन्हा स्वयंपाकघरात वावरायचं. तिच्या शरीराबरोबर तिचं मनही दगडं झाल होत. तिच्या डोळ्यातलं पाणीही आटल होत. पण आज तिने मनाशी पक्का निर्धार केला. यातुन बाहेर पडायच. ज्या व्यक्तीशी तिने जन्मोजन्मीचे फेरे देवा ब्राम्हणांसमक्ष घेतले होते . तो तिचा कधीच नव्हता आणि पुढे होणारही नव्हता. मग इथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता. 

ती पण सर्व महिलांप्रमाणे जग काय म्हणेल या गोष्टींचा विचार करणारी. स्वतः बरोबर अन्याय झाला आहे आणि त्याचा प्रतिकार करून स्वतःला न्याय मिळविण्यापेक्षा जग काय म्हणेल हे इतरांप्रमाणे विचार करणारी सर्वसामान्य स्त्री . पण एक दिवस तिच्या आयुष्यात असा आला की तिच आयुष्य पुर्णपणे ढवळून निघालं. ती अडकखळी ,गोंधळली, सुन्न झाली. तिच्या अस्तित्वावरच घाव घातला गेला होता. आजपर्यंत सगळे तिला नाव ठेवत होते. तिला मूल होत नाही. तिच्यात काही दोष आहेत. ती सर्व काही जाणून होती . त्या दोघांव्यतिरिक्त कोणाला माहित होत. त्या दोघांमध्ये कशाप्रकारचे संबंध आहेत. लोक काय त्यांच्या तोंडाला येईल ते बडबड करतात. कुठल्याही स्त्रीला मूलं झालं नाही कि दोष फक्त स्त्रीला दोष दिला जातो. कुणीहि पुरूषाकडे बोट दाखवत नाही. आणी प्रत्येक स्त्रीही कोणाला घरातल्या गोष्टी घरातच ठेवायच्या म्हणून कधी जगासमोर मांडत नाही. याप्रमाणे ती ही वागत होती

एवढ्यातच तिच्या आईचा तिला फोन आला. नागपंचमीच्या माहेरपणासाठी तिची आई तिला माहेरी नेण्यासाठी येत होती. तिला ते ऐकून देवच पावला असं वाटल. तिची आई दुसर्‍यादिवशी तिला नेण्यासाठी येत होती. तिने मनाशी ठरवलं आणि बॅग भरायला सुरूवात केली. 

 पुन्हा परत परतुन यायचं नव्हतं. कोणासाठी यायचं. तिची वाट पाहणार या घरात कोणीच नव्हतं, मग कोणासाठी यायचं ईथे. लग्न झाल्यापासून होणारी मारहाण आणि मनाचा कोंडमारा यामुळे तिचं जगणचं असह्य झालं होत. तिने पुन्हा परत न येण्याच्या हेतूने तिने तिचे सर्व कागदपत्रे सोबत घेतली होती. कालच तिने सासूने काढून घेतलेल ATM कार्ड बंद करण्यासाठी बँकेकडे अर्ज दिला होता. दुसर्‍या दिवशी आई न्यायला आल्यावर कोरड स्वागत झालं. घरात तिच्याशी नीट कोणी बोलल नाही. हे तिला अपेक्षितच होत. पण तिने त्याविषयी चेहर्‍यावर काही दाखवलं नाही. घरात सर्व थोरामोठ्यांच्या पाया पडून ती आईसोबत जायला निघाली. मनाशी निश्चय  करून या सर्व बंधनातून मुक्त होऊन फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा नव्याने अवकाशात भरारी घेण्यासाठी .



सौ. मनिषा राजन कडव
१६/ए , ओमशिवमकृपा को.हौ. सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*