बावनकशी सोनं - बहिणाबाईंची गाणी.

बावनकशी सोनं - बहिणाबाईंची गाणी.

 बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी खानदेशातील असोदे या गावामध्ये झाला. असोदे हे गाव जळगाव पासून ५-६ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. त्यांच्या वडिलांचे नाव उखाजी महाजन होते.आणि आईचे नाव भिमाई होते. 

बहिणाबाईंना एकूण सहा भावंडे होती. त्यात तीन बहिणी-तुळसा , अहिल्या आणि सीता. आणि तीन भाऊ – घना, घमा आणि गणा. 

१८८० काळ म्हणजेच भारतातील ब्रिटिश राजवटीचा कालखंड होय. या काळात भारतीय सुधारकांची दुहेरी लढाई नुकतीच सुरु झालेली. एकीकडे सामाजिक सुधारणेसाठी समाजातील अनिष्ट रूढींविरुद्ध लढा सुरु होता. तर दुसरीकडे भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी टकराव उडत होते. 

अश्या या संघर्षाच्या काळात बहिणाबाईंचा जन्म झळ. तोही एका शेतकरी कुटुंबामध्ये. तत्कालीन रीतीप्रमाणे बहिणाबाईंचे वडील उखाजी महाजन त्यांनी आपल्या मुलीचा -बहिणाबाईंचा विवाह जळगावच्या नथुजी चौधरी यांच्याशी करून दिला. विवाहाच्या वेळी बहिणाबाईंचे वय फक्त १३ वर्षे होते. 

बहिणाबाईंचा संसार हा आधी एकत्र कुटुंब पद्धतीतीलच होता. मात्र काही घरगुती कलहामुळे त्यांचे कुटुंब विभक्त झाले. नव्या ठिकाणी नव्याने संसार उभा करण्याला यश येत असतांनाच नथुजी यांचे १९१० च्या काळात निधन झाले. त्यावेळी बहिणाबाईंच्या पदरी तीन लेकरे आणि थोडी जमीन या व्यतिरिक्त दुसरे काहीच नव्हते. 

कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी बहिणाबाईंनी शेतीचा आसरा घेतला. विविध परंपरांनी बुरसटलेल्या तत्कालीन समाजात एक विधवा म्ह्णून जगतांना बहिणाबाईंना कुठल्या कुठल्या समस्यांचा सामना करावा लागला असेल याचा तर आपण विचार न केलेलाच बरा. 

शेतातील आणि दैनंदिनची कामे करत असतांना मन रमवण्यासाठी प्रत्येकच काळात गीतांनी स्त्रियांना मोठा आधार दिला आहे. जात्यावरच्या ओव्या या त्याच प्रकारातील.बहीणाबाईंनीसुद्धा या गीतांचाच आधार घेतला. त्यांच्या बहुतेक रचना ह्या अश्याच कुठले न कुठले काम करतांना त्यांच्या मुखावर अवतीर्ण झालेल्या आहेत. 

स्त्री जीवनाशी हिंदोळे घेणारे वेगवेगळे विषय हेच बहिणाबाई चौधरी यांच्या कविता यामध्ये पुन्हा पुन्हा आढळतांना आपल्याला दिसतील. सासर, माहेर, संसार, शेती, व्यक्तिचित्रे अश्याच विषयांना बहिणाबाईंनी हात घातलेला आहे. 


कुठे कुठे त्यांची कविता उपरोधाने भारलेली जाणवते तर कुठे उपदेशाच्या कडू काढ्याने भारलेली. मुळात बहिणाबाई पूर्णतः निरक्षर.पण त्यांच्या कवितांची उंची हि मोठं मोठ्या पंडितांना चाट पाडणारी आहे. त्यांच्या रचना ह्या त्यांचे पुत्र सोपानदेव आणि पुतण्या यांनी लिहून ठेवल्यामुळे आज आपल्यापर्यंत पोचत आहेत. 

खरे पाहता बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आज आपल्याला वाचायला मिळाल्या नसत्या जर त्यांचे पुत्र आणि पुतण्या यांनी त्या लिहून ठेवल्या नसत्या. त्यांच्या कवितांच्या प्रकाशनाची कथाही फार मजेशीर आहे. 

महाराष्ट्राला एक कवी म्हणून माहिती असलेले सोपानदेव चौधरी हे बहिणाबाई यांचे पुत्र. बहिणाबाईंनी ३ डिसेंबर १९५१ ला जगाचा निरोप घेतला. त्यानंतर घराची आवरासावर करत असतांना सोपानदेव यांना एक वही सापडली. याच वहीमध्ये लहानपणी त्यांनी त्यांच्या आईने गुणगुणलेली गाणी लिहून ठेवलेली होती. 

ती वही मिळाल्यानंतर आईची आठवण म्हणून त्या कविता प्रकाशित करण्याच्या हेतूने सोपानदेव यांनीं आचार्य अत्रे यांची भेट घेतली. या कविता प्रकाशित करू कि करू नये असे विचारतांनाच त्यातील एक दोन कविता त्यांनी आचार्य अत्रेंना वाचायला दिल्या.

 कविता वाचून झाल्यावर अत्रेंच्या तोंडातून आपसूकच शब्द बाहेर पडले “हे तर शुद्ध बावनकशी सोने आहे.हे महाराष्ट्रापासून लपवण्याचा आपल्याला काही हक्क नाही.” शेवटी १९५२ ला सुचित्रा प्रकाशनाने बहिणाबाई चौधरी यांच्या कविता बहिणाबाईंची गाणी या नावाने प्रकाशित केल्या.

सिंधुताई सपकाळ यांचं एक विधान आहे. मनाला फार चटका लावून जाणारं -” हा महाराष्ट्र आहे बाळांनो. येथे मोठं होण्यासाठी मरावं लागतं.” नेमकं तंतोतंत बहीणबाई चौधरी यांच्या प्रकरणाला लागू पडतं हे विधान.जीवनभर दारिद्राशी दोन हात करीत झुंजणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता आज मराठी पाठ्यक्रमाचा भाग आहेत.

    'सुचित्रा प्रकाशन मुंबई' ह्यांनी प्रकाशित केलेले २०७ पानांचे हे पुस्तक बहिणाबाई चौधरी यांनी गायलेल्या कवितांचं त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचे पुत्र श्री. सोपानदेव चौधरी यांनी प्रथमतः प्रकाशित केले. त्यानंतर सोपानांची कन्या सुचित्रा यांनी हे कार्य आजतागायत चालू ठेवले आहे. म्हणूनच या पुस्तकाची खासियत म्हणजे जवळपास शंभरहुन अधिक पानांवर बहिणाबाईंच्या कवितेतील काही ओळी घेऊन ठराविक नामवंत साहित्यिकांच्या प्रस्तावना छापण्यात आल्या आहेत..ही साहित्याची वीण खूप आकर्षित करते.अगदी अलिकडील म्हणजे २०१४ ची  १८ वी आवृत्ती असल्यामुळे प्रत्येक साहित्यिकाने बहिणाबाईंचे केलेले कौतुक वाचून स्त्री-मन सहज प्रफुल्लीत होते. काव्यसंग्रह असून देखील हे पुस्तक वाचण्यास तितकाच वेळ लागतो जितका एखादी कादंबरी वाचण्यासाठी लागत असावा. "बहिणाबाईंच्या प्रत्येक ओळीत एक कथा आहे" असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.
    ‎पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांच्या मुलांनी आईसोबतच्या काही आठवणीसुद्धा लिहिल्या आहेत ज्यामुळे बहिणाबाई आज नसल्या तरीही त्या असण्याचा भास होतो. पुस्तक वाचताना जणू त्या मायेचा हात डोक्यावरून फिरवत कविता गातायत असेच जाणवते.
    ‎१०० पांनानंतर एकूण ५२ कवितांचा हा संग्रह आयुष्याच्या रंगांच्या ५२ विविध छटा दाखवतात. यात बहिणाबाईंनी आध्यात्मावर केलेले प्रेम, निसर्गाच्या कुशीत घालवलेला वेळ, संसारासाठी राबलेले हात, कुटुंबासाठी प्रेमाच्या गुंफलेल्या माळा, बाईपणाची धगधगती आग आणि या सर्वांहून विशेष म्हणजे माणूस म्हणून अभ्यासलेले मन याचा खास अंदाज येतो. निरक्षर असून देखील गायलेल्या या कवितांचे मर्म म्हणजे साक्षरतेला लाजिरवाणे ठरवण्यासारखे आहे. त्यांच्या या प्रतिभेला काळ्या शाईने पांढऱ्या मनांवर कोरण्याचे काम करून प्रकाशकांनी सर्वच साहित्यिकांना मनातल्या अंधारासाठीची काठीच जणू उपलब्ध करून दिली आहे.
    ‎'अरे खोप्यामधी खोपा', 'आला पह्यला पाऊस', 'माझी माय सरोसती', 'निजवते भुक्या पोटी','अरे संसार संसार' अशा बहिणाबाईंच्या अनेक कविता आणि ओळी खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांची कविता गाताना एक सुंदर लय घेते आणि त्यापैकी बहुतेक अष्टाक्षरीत असल्यामुळे त्या कविता गाताना ठेक्याची पकड खूपच सुरेख वाटते.अहिराणी, वऱ्हाडी, खानदेशी अशा भाषांमुळे गाव जिवंत ठेवणाऱ्या कविता वाचताना मन आपोआपच गावात फिरून येते.
    ‎त्यांची कुठली कविता आवडली म्हणून सांगावी असे वाटलेच नाही. प्रत्येक कवितेत एक महत्वाचा संदेश मिळतो आणि शंभर वर्षांआधी बहिणाबाईंच्या मनात आलेली ही गुपितं कागदावर मांडून कवितेच्या प्रांतात या प्रकाशनाने चैतन्यगुढी उभारली आहे यात शंकाच नाही!
    ‎ऊन वाऱ्याशी खेयता
    ‎ एका एका कोंबातून
    ‎पर्गटले दोन पान
    ‎ जसे हात जोडीसन
    ‎त्यांच्या या ओळीतून व्यक्त झालेल्या निसर्गासाठीच्या भावना पुढची कविता वाचायचं वेड लावते. अशाच कविता वाचत वाचत दुपारची सांज होऊन जाते आणि आपण अर्थ उलगडत माईंचे कौतुक करत बसतो.
    ‎रडू नको माझ्या जीवा
    ‎ तुला रड्याची रे सव
    ‎रडू हासव रे जरा
    ‎ त्यात संसाराची चव!
    ‎ऐन तारुण्यात कुंकू पुसलेल्या या स्त्रीच्या मनगटात कुठून आलं इतकं बळ... यांच्या कवितांना मराठी भाषेत तोड नाहीच!! 
    ‎काही ठिकाणी कवयित्रीच्या आर्त भावना ज्या गावाकडील भाषेत मांडल्या आहेत त्या समजताना संबंध जोडून अंदाज घ्यावा लागतो पण तो विचार मनात घोळवतानादेखील वेगळीच मजा येते.
    ‎अकल्पित, विपुल भाषिक कौशल्य असणारया माईंच्या अशा अनेक कविता अजरामर आहेत...या प्रतिभेला परिसस्पर्श लाभलेल्या त्यांच्या पुत्राचे आणि नातीचे कौतुक करावे तेवढे कमीच! संसाराचे सगळे रस अगदी दुःखात असूनही त्यांच्या आयुष्यात विनोद रस जपत त्या जगल्या आणि त्यांच्या कवितांना आपल्याच मराठी मातीतल्या सहृदांनी जगवलं... प्रत्येक माणसाने अगदी रसिक - अरसिक सगळ्यांनीच वाचावे असे हे 'बहिणाईची गाणी' हे पुस्तक!



पुस्तकाचे नाव: बहिणाईची गाणी
प्रकाशक: सुचित्रा प्रकाशन,मुंबई.
कवयित्री 
कै.बहिणाबाई चौधरी
साहित्य प्रकार 
कवितासंग्रह
पृष्ठे 
२०७
किंमत 
१५०/-


 सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*