श्यामची आई~ साने गुरुजी

श्यामची आई~ साने गुरुजी

 


श्यामची आई मध्ये वेगवेगळ्या भागांना 'रात्र' असे म्हटलेले आहे. साने गुरुजी रात्रीच्या वेळी या कथा आपल्या सहचारींना सांगत. त्यामुळे पहिल्या रात्री सांगितलेली कथा म्हणजे पहिली रात्र असे या कथनाचे विभाजन केलेले आहे. गुरुजींना आठवेल तसे त्यांची आई स्वर्गवासी होईपर्यंतचे बालपण हा त्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे. दररोज तीन रात्री वाचून काढणे हे टार्गेट ठरलेले होते. क्वचितच एखादी रात्र विस्तृत लिहिलेली आहे. पंधरा-वीस दिवसांत ते पुस्तक वाचून पूर्ण झाले. शेवटाकडे जाताना खूप भरून आले. तो शेवट मी पहिल्यांदा वाचला त्यानंतर परत कधीच वाचला नाही.

नकळतपणे मी माझी तुलना श्यामशी आणि आईची तुलना त्याच्या आईशी करू लागले. का कुणास ठाऊक पण ते पुस्तक वाचताना मी त्या जगात दूरवरून या गोष्टी पाहतेय असे वाटायचे. आई कधी रागावली की मला मी या घरात का जन्माला आले, श्यामच्या घरी असायला हवे होते असेही वाटायचे. त्या वयात सगळ्यांचे एक फँटसी जग असते. माझ्यासाठी ते श्यामचे घर होते. 

त्या पुस्तकातील बेचाळिसावी रात्र आहे लाडघरचे तामस्तीर्थ. ते माझे सगळ्यांत आवडते प्रकरण आहे. श्री. ना. पेंडसेंच्या 'गारंबीचा बापू' मध्ये जसा कोकण चितारला आहे तसे अलंकारिक शब्दांकन इथे नाही, आणि तरीही माझ्या कल्पनेतील कोकणावर या प्रकरणातील कोकणाची आणि समुद्राच्या त्या वर्णनाची कायमची छाप पडलेली आहे. एका दहा-बारा वर्षाच्या मुलाच्या भूमिकेतून गुरुजींनी कोकणातील बैलगाडीच्या प्रवासाचं आणि समुद्राचं सुरेख आणि सहज वर्णन केलेलं आहे. याच रात्रीत श्यामला थोपटताना आई काही ओव्या गाते त्यातील -

घनदाट या रानात | धो धो स्वच्छ वाहे पाणी|
माझ्या श्यामच्या जीवनी| देव राहो ||

या ओळी आजही मला जशाच्या तशा आठवतात. त्यावेळी मी या ओव्यांना एक चाल लावली होती तीसुद्धा आठवते. माझ्यासाठी ही एका आईने आपल्या मुलासाठी केलेली सर्वोत्तम प्रार्थना होती. यात उगाच जड शब्दांचा बडेजाव नाही. माझ्या मुलाच्या आयुष्यात देव राहो यातील 'देव' म्हणजे माझ्यालेखी शुद्धता आहे. कसलाही आकस, असूया, अभिलाषा यांच्या संपूर्ण अभावाने येणारी शुद्धता. याच प्रवासात त्यांच्या बैलगाडीसमोरून एक वाघ जातो. त्यावेळी श्याम आईच्या मांडीवर डोके ठेवून तिचे बोलणे ऐकत असतो. वाघ थांबतो, या मायलेकाकडे रोखून पाहतो आणि निघून जातो. एकाचवेळी क्रौर्य, मरणाची भीती आणि पराकोटीचे प्रेम यांची अनुभूती श्यामला येते. त्यांचा असा प्रवास हा आयुष्यात पहिल्यांदा आणि दुर्दैवाने शेवटचाही ठरतो. ही रात्र आई-मुलाच्या नात्यावरील साहित्याचा सर्वोत्कृष्ट नमुना आहे. माझ्यासाठी हे पुस्तक इथे conclude झालेले आहे. या रात्रीनंतरच्या रात्री मी वाचत नाही. 

 श्यामच्या वडिलांवर आलेली आर्थिक आपत्ती, चुलत्यांनी बाहेरचा रस्ता दाखवल्यावर अचानक रस्त्यावर आलेले कुटुंब, दूर कुठेतरी काम करून पैसे पाठवणारा मोठा भाऊ, सिंहस्थ कुंभमेळ्याला आजोबांच्या जीवावर फुकट जाऊ पाहणाऱ्या श्यामला आईने करुन दिलेली स्वाभिमानाची जाणीव, सावकाराच्या गुमास्त्याने पिळवणूक करण्याचा केलेला प्रयत्न, पूर्वीचे मोठे नाव असल्याने दापोलीच्या शाळेत नाकारण्यात आलेला श्यामचा नादारी अर्ज, औंधसारख्या दूरवरच्या संस्थानात माधुकरी मागून शिक्षण घेण्याची तयारी असलेला श्याम, घरावर आलेली जप्ती आणि त्या अपमानामुळे खंगून गेलेली आई, दुर्वांच्या आज्जीने आईच्या शेवटच्या काळात स्वयंपाकाचे सामान घरात नसल्याने केलेली बडबड हे सगळे प्रसंग त्या कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक संघर्ष दाखवणारे आहेत. नंतरच्या वाचनांमध्ये माझ्यासाठी हे पुस्तक केवळ आई-मुलाच्या नात्याचा साहित्यिक अविष्कार उरलेले नव्हते. जसा जास्त विचार करू लागले तशी समाजात स्थान टिकवून ठेवण्यासाठी एका सामान्य कुटुंबाने केलेल्या धडपडीची पार्श्वभूमी अधिकाधिक गडद होत गेली. 

अशी पुस्तके ही लहानपणीच वाचायची असतात. नंतर त्यांचे अपेक्षित रसग्रहण होऊ शकत नाही. उदाहरणादाखल, एका प्रसंगात केस वाढवलेल्या श्यामला वडील केस कापण्याचा आग्रह करतात. आपल्या धर्मात हे बसत नाही असे सुनावतात. त्यावेळी तो आईकडे केस ठेवण्यासाठी विनवणी करायला जातो. "केसांत कसला आला आहे धर्म" हा त्याचा युक्तिवाद असतो. तेव्हा आई म्हणते - "केस ठेवणे हा मोह आहे. मोह सोडणे म्हणजेच धर्म." कसलेही स्तोम नसलेली, माणसामाणसांत भेद न करणारी धर्माची इतकी सोपी व्याख्या क्वचित कुणी मांडली असेल. दुसऱ्या एका प्रसंगात "पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसे मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम." असे शिकवणारी आई ही संस्कारक्षम वयात हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाची आई असते. त्या वयात ते पुस्तक जितके relate होते तितके ते नंतर नाही होऊ शकत. आज ते पुस्तक परत हातात घेतले तर त्याचे संश्लेषण केल्याशिवाय राहवणार नाही आणि मला ते नको आहे कारण माझे या पुस्तकावर आणि त्यातील माणसांवर निरतिशय प्रेम आहे. श्यामची आई माझी लहानपणीची हळुवार आठवण आहे आणि ती मला शेवटपर्यंत तशीच जपायची आहे



सौ. मनिषा राजन कडव

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*