विंध्वस्त हो......!"
"विंध्वस्त हो......!"
एका गावात एक मूर्ख राहात होता. त्याच्या शेळीचं नाव होतं "विध्वंसिनी." तो लाडाने तिला 'विध्वंस' म्हणून हाक मारायचा. नावाप्रमाणेच ही शेळी जिथं जाईल तिथं नाशच करून टाकायची. कुणाचं गवत खा, भाजी खा, फुलझाड खा, रोपं तिच्या तडाख्यातून वाचायचीच नाहीत.
एके दिवशी ती चरायला म्हणून गेली अन् परतलीच नाही. त्या मूर्खाला तिच्या वाचून अन्नपाणी गोड लागेना. शेवटी तिच्या शोधासाठी तोही घराबाहेर पडला.
"विध्वंस! विधवंस!!" अशा हाका मारीतचं तो कावराबावरा होवून या गावातून त्या गावात असा हिंडू लागला.
ऐकणाऱ्यांना कळेना की, असा हा 'विध्वंस! विध्वंस!' जप का करतो आहे. खरं तर "शुभ बोल नाय रे!" असा जप करून हा माणूस स्वतःचाच नाश करवून घेणार. दुसरं काय!
दमून तो मूर्ख एका घरापाशी आला. घरातून रडणे ऐकू येत होते. गळा काढून रडणे. कुंटुंब प्रमुखाचा मृत्यू ५. झाला होता अन् मुले, आई सगळे दुःखाने आक्रोश करीत होते. मूर्खाला आपल्या लाडक्या शेळीची आठवण झाली आणि तोही हुंदके देवू लागला.
"विध्वंस! विध्वंस!" त्याचे आक्रांदन सुरू होते. त्याचं हे ओरडणं ऐकून मोठा मुलगा बाहेर आला. "अहो, आमच्या दाराशी बसून "विध्वंस, विध्वंस' असं काय बोंबलताय्. आम्ही आधीच दुःखात चूर आहोत. दिसत नाही का? आणखी आमचा नाश व्हावा असं तुम्हाला वाटतंय्? -' बोलता बोलता मुलानं रागानं मूर्खाच्या 11 तोंडाकडे पाहिलं आणि चेहऱ्यावरूनच त्याला समजलं हा 'मूर्ख' आहे!
त्याच्याजवळ जावून मुलगा त्याला प्रेमाने समजावू लागला, "अहो, तुम्ही दुसऱ्याच्या दुःखात सहानुभूती दाखवली पाहिजे. 'विध्वंस' असं म्हणण्यापेक्षा, 'अरेरे! अरेरे!! हे फारच वाईट घडलं!' असं म्हणायला हवं! काय, कळलं का?"
मूर्खाने कळल्यासारखी मान हलवली. "पुढच्या वेळेला मी तसं म्हणेन !" मूर्ख निघतांना बोलला. रस्त्यानं चालता चालता एका घराला आग लागलेली मूर्खाला दिसली. जिकडे तिकडे आग विझविण्यासाठी
बरीच धांदल आणि गर्दी उडालेली होती. दिसेल त्या
भांडयाने पाणी आणून लोक आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते.
त्या मुलाचा सल्ला मूर्खाला आठवला. जोरजोराने मान हालवून मूर्ख म्हणू लागला.......
"अरेरे! अरेरे!! हे फारच वाईट घडलं !!!"
एका माणसाच्या लक्षात हे उद्गार आले.
"अरे वेड्या, सारखं सारखं हेच म्हणण्यापेक्षा जरा कृती कर. आग दिसली की माणसांनं मिळेल ते भांड घ्यावं नि आग विझवायला लागावं. नुसतं 'अरेरे, अरेरे, ' अशी पोपटपंची करू नये!"
मूर्खानं मिळेल ती बादली घेतली आणि तो आग विझवू लागला. आग विझवल्यावर तो पुनश्च आपल्या शेळीच्या शोधार्थ निघाला.
रस्त्यात त्याला कुंभार आगीच्या भट्टीवर मडकं भाजतांना दिसला. आगीच्या ज्वाळा आकाशात उंच जावू लागल्या अन् त्याला आधीचा उपदेश आठवला. त्यानं कुंभारा कडचं मिळेल ते भांड उचललं आणि त्यात तो जवळचं पाणी भरून आगीवर मारू लागला. भट्टी विझल्यावर सहज कुंभारानं मागं पाहिलं तर हा आपला चांगला पेटलेला जाळ विझवतो आहे!
'मूर्खा! तुला दिसत नाही, मी मडकं भाजतोय् ते? सरळ आपला पेटलेल्या जाळावर पाणी मारतो आहेस?" "आग दिसेल तिथं पाणी मारावं असं मला शिकवलं गेलं आहे." मख्ख चेहऱ्यानं मूर्खानं सांगितल. कुंभाराला
लगेच समजलं हा चक्क वेडा आहे!
"अरे वेड्या, आग काय एकाच प्रकारची असते? ही भट्टी म्हणजे तर आमचं धंद्याचं साधन. खरं तर मी भाजलेल्या या मडक्यांना तू टिचकी मारून बघायचं..... कशी खणखण वाजतात.... तू उलट मला त्यांची वाजवून किंमत विचारायची, एखादं मडकं विकत घ्यायचं. ते दिल सोडून...."
"जावू द्या.... पुढच्या वेळेला मी लक्षात ठेवीन नक्की."
मूर्ख शेळीच्या शोधा साठी पुढे निघाला. एका गावाजवळ वळतांना समोरून त्याला एक माणूस येतांना दिसला. त्यानं पूर्ण 'चमनगोटा' केला होता. त्याचं डोकं कस तुळतुळीत, गोल आणि चकचकीत दिसत होतं. त्या कुंभाराच्या मडक्यासारखं. त्यांला कुंभाराचा सल्ला आठवला.
क्षणार्धात मूर्खानं त्या माणसाचा 'चमनगोटा' वाजवून मोठ्यांदा म्हटलं, "भल्या माणसा, तुझं हे मडकं छान, घाटदार, घोटीव आहे, त्याची किंमत सांग ना जरा !"
"असं काय, तुला किंमत करायची आहे? थांब, तुला दाखवतोच. तुझं मडकं चांगलचं कुचकामी दिसंतय्. कच्चं मडकं." त्याने मूर्खाला चांगले ठोसे लगावले. मूर्ख पुढे . नि हा मागे....
पळता पळता मूर्खाला आपल्या लाडक्या शेळी आठवण आली....
"विध्वंस! विध्वंस!!" तो ओरडू लागला. निदान ती तरी मदतीला धावून येईल.
हे उद्गार ऐकून तर तो माणूस अगदी संतप्त झाला... हा आपली टिंगल करतोय् असं त्याला वाटलं.....
तो वेड्याचा जोरात पाठलाग करू लागला. "तुला तुझा विध्वंस करायचा दिसतोय्... थांब. पकडतोच तुला आणि विध्वंसच करून दाखवितो."
सौ. मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment