गणिती*
*गणिती*
लेखक - अच्युत गोडबोले आणि डॉ. माधवी ठाकुरदेसाई
प्रकाशक - मनोविकास प्रकाशन पाने - 470
किंमत - 270रुपये
मित्रांनो,नुकतेच माझ्या आवडत्या लेखकाचे म्हणजेच अच्युत गोडबोले याचे गणिती हे अप्रतिम पुस्तक वाचून झाले. यापूर्वी गोडबोले यांचे किमयागार, मुसाफीर, मनात, झपूर्झा भाग 1,2,3, गुलाम, बोर्डरूम, अर्थात हे पुस्तके वाचून झालेली. ग्रंथालयात #गणिती हे पुस्तक बऱ्याचदा नजरेस पडले होते पण लहानपणापासुनच मला गणिताची तशी भितीच होती म्हणून ह्या पुस्तकाकडे त्याच्या नावावरून कधी लक्षच दिले नाही. पण माझ्या एका मित्रानेहे पुस्तक वाचले होते आणि मला या पुस्तकाबद्द्ल सांगितले त्यामुळे थोडे धाडस करून हे पुस्तक वाचायला घेतलेच. यात काही समजेल कि नाही याबद्द्ल जरा साशंक होतोच पण जेव्हा प्रस्तावना वाचायला लागलो (मला लेखकाच्या प्रस्तावना खूपच आवडतात त्यामुळे पुस्तक वाचण्याचा उत्साह अधिकच वाढतो ) तसा तसा पुस्तकाबद्द्ल फारच कुतुहल निर्माण झाले. पण जसे जसे वाचत गेलो तसे तसे मला खूपच रंजक वाटले. तुम्हीही या गणिताच्या मैफिलीचा आस्वाद एकदा तरी घ्यावा.
ह्यात अगदी ” स्टोन एज ” म्हणजे आदिमानवाच्या काळापासुन म्हणजे केवळ वस्तू मोजण्यासाठी अंक वापरणे तो सेट थेअरी, लॉजिक,इन्फिनिटी इथपर्यंत गणिताचा प्रवास कसा झाला यासाठी लेखकद्वयीनी इंग्रजी व मराठीतील ६० पुस्तके व कांही संकेतस्थळे यांचे परिशीलन करून हे पुस्तक लिहिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी शुद्ध गणितातील तज्ज्ञ मंडळीचेही मार्गदर्शन घेतले .
यामध्ये सुमेरियन संस्कृती, इजिप्तशिअन , अरब, भारत व चीन इथपासून गणिताच्या उत्क्रांतीचा वेध घेतला असून इ.स. पूर्वी ८०० वर्षे भारतातील आर्यभट्ट ब्रह्मगुप्त ज्याने शून्याचा शोध लावला , तसेच भास्कराचार्य , वराहमिर , महावीराचार्य ते रामानुजम यांच्या योगदानाचा धांडोळा घेत युरोपियनांनी यात दिलेल्या महत्वाच्या योगदानापर्यंत व उत्कर्षापर्यंत नेण्यासाठी जर्मन, फ्रेंच , ब्रिटिश ,नार्वे , स्विस इ देशातील गणितज्ञानी घातलेली मोलाची भर ह्याचे वर्णन आले आहे .अर्थात
यासाठी त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. उदा. चर्चचा विरोध, इतर गणितज्ञाना सिद्धता करून दाखविणे तर कधीकधी विचित्र राजे/राण्या उदा देकार्तला भेटलेली स्वीडनची राणी ख्रिस्तिना हि विचित्र राणी. यातील कांही गोष्टी आपल्या समजुतींना अत्यंत धक्कादायक वाटतील अशाही आहेत. उदा. उमर खय्याम आपल्याला फक्त रुबायांसाठीच माहित आहे , मात्र तोही एक गणितज्ञ होता व त्याने गणितात मोलाची भर टाकली हे आपल्याला धक्कादायकच वाटेल !
कांही गणितज्ञाना अत्यंत कमी आयुष्य लाभले उदा. गॅल्व्हा,सोन्या kovalevsakiya काहींना अत्यंत दारिद्र्य सहन करावे उदा निमान , तर काहींना राजेरजवाड्यांची जवळीक भोवली. माऊंज-फुरीए राज मैत्रीचे बळी ! थेओना ही जगातली पहिली गणितज्ञ तर तिच्या नंतरची हायपेशिया या स्त्री गणितज्ञाचा झालेला अत्यंत हृदयद्रावक अंत अशा अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य वाचकाला अज्ञात होत्या त्या तर कळतातच परंतु ह्या सर्व वाचनातून एक गोष्ट अधोरेखित होते ती ही कि या सर्व हालअपेष्टा सहन करूनही या लोकांची गणितावरील निष्ठा अजिबात ढळली नाही . यात “गणिताचा बादशहा गाऊस, ऑयलर” , “गणिताचा शिल्पकार रीमान” , “एका निर्धनाची गणिती श्रीमंती” ,”दुर्लक्षित लायबलीज” असे प्रकरणांचे मथळे खरोखर अत्यंत उचित वाटतात.
लायबीनीज व न्यूटन यांच्यातील वाद व ब्रिटिश आणि फ्रेंचातील एकमेकांविषयी असलेली अढी, त्यामुळे ब्रिटिशांनी स्वतःचे करून घेतलेले नुकसान अशा अनेक मनोरंजक हकीकती या पुस्तकातुन आपल्या समोर येतात व आपण स्तिमित होतो.
मला तर या पुस्तकातील सर्वच नाही पण कितीतरी गणितज्ञावर आपल्याकडे वीणा गवाणकर यांनी लिहिलेल्या “एक होता कार्व्हर” सारखी चरित्त्रे लिहिण्यास उत्सुक व्हावे असे अनेकदा जाणवते. सामान्य वाचक जो गणितात तज्ञ नाही , त्यांच्यासाठी ह्यात शुद्ध गणित, बीजगणित, भूमिती , संख्याशास्त्र , संभाव्यता शास्त्र , तर्कशास्त्र यातील वेगवेगळ्या गणितज्ञानी भर घातलेल्या क्रिया , शोध, सिद्धता इ. सर्व सोप्यातसोप्या भाषेत आकृत्यांसह समजावून सांगितले आहे.
Comments
Post a Comment