पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया'

पुरेशा उजेडात नसलेली 'मेड इन इंडिया'


पु. ल. देशपांडे 'मेड इन इंडिया' या कादंबरीबद्दल असं म्हणाले होते:
गेल्या कित्येक वर्षांत अशी हसविणारी आणि तितकीच अस्वस्थ, अंतर्मुख करणारी कादंबरी मी वाचली नव्हती. 'मेड इन इंडिया'तील विनोद हा अंतिम सत्याकडे नेणारा परिपक्व 'शॉर्टकट' आहे. आजच्या सुशिक्षित तरुणाची नेमकी शोकांतिका आणि विदारक कोंडी या कादंबरीतून अतिशय प्रगल्भपणे मांडली गेली आहे.

वऱ्हाडी बोलीबरोबरच काव्यात्म, वृत्तपत्रीय, राजकीय आणि चिंतनशील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर या लेखनात अतिशय खुबीने केला गेला आहे. बोलीभाषा, ग्रांथिक मराठी, हिंदी, इंग्रजी यांच्या मिश्रणातून लेखकाने एक वेगळीच भाषा निर्मिली आहे. या रसायनाचा भाषातज्ज्ञांनी गांभीर्याने अभ्यास केला पाहिजे. कारण ही नव्या पिढीची भाषा आहे.
आधुनिक ग्रामीण-शहरी जीवनाचे एवढ्या समर्थपणे केलेले चित्रण मराठीत दुसरे नाही. मराठीत 'मैलाचा दगड' ठरावी अशी ताकद या कादंबरीत आहे. या कादंबरीने मला खूप हसविले आणि तितकेच डोळ्यांत पाणी यावे असे अस्वस्थही केले. मी मनात जपलेल्या मोजक्या पुस्तकांपैकी एक म्हणजे 'मेड इन इंडिया'!
यातला दुसरा परिच्छेद खरोखरच महत्त्वाचा आहे, आणि मराठीत भाषेचा इतका वैविध्यपूर्ण पट मांडणारं दुसरं पुस्तक नसावं. किमान ही नोंद लिहिणाऱ्या वाचनात तरी तसं पुस्तक आलेलं नाही. याचे दाखले नोंदवायचे तर सगळी कादंबरीच इथे नोंदवावी लागेल. भाषेचा वैविध्यपूर्ण पट असणं, एवढंच वैशिष्ट्य काही कादंबरीला सखोल करायला पुरेसं नाही, हे खरं. पण या कादंबरीत भाषेचा असा वापर असल्यामुळेच बहुधा ती फक्त एका नायकाची, एका पंजाबराव गरसोळीकर-पाटलाची कथा राहत नाही.
स्वातंत्र्यानंतर खेड्यातली बदललेली मूल्ये आणि खेड्यांनी गमावलेली स्वतःची ओळख, याची कथा ‘मेड इन इंडिया’मध्ये ओघवत्या शैलीत, बोचकारत, हसवत, उपहास करीत मांडली आहे. एका वेगळ्या धाटणीची कादंबरी. ती लिहिणाऱ्या बोरकरांना लेखक म्हणून स्वतंत्रपणे जगायचं होतं. त्यासाठी त्यांनी एका राजकीय पक्ष-संघटनेच्या मुखपत्राच्या संपादनाची स्वीकारलेली जबाबदारीही तीन-चार महिन्यांतच सोडून दिली.

१९८१ साली 'अनुष्टुभ' द्वैमासिकाच्या लघुकादंबरी स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालेल्या रचनेला दीर्घरूप देऊन ही कादंबरी लिहिली गेल्याचा उल्लेख या पुस्तकात आहे. 'मेड इन इंडिया' कादंबरीची पहिली आवृत्ती १५ डिसेंबर १९८७ साली आली. १९८८-८९चा महाराष्ट शासनाचा राज्यपुरस्कार या कादंबरीला मिळाल्याचं दिसतं. इतरही दोनेक पुरस्कार आहेत. 

'मेड इन इंडिया' कादंबरीत तत्कालीन अनेक तपशील सहजपणे आलेले आहेत, हे खरं. पण केवळ त्या काळातले म्हणजेच ८० घ्या दशकातले  राजकीय नेते, क्रिकेटपटू, अभिनेते-अभिनेत्र्या, काही वस्तूंचे ब्रँड आणि टीव्ही-व्हिडिओ इत्यादींचा वाढलेला वावर- अशा चिन्हांपुरती ही कादंबरी मर्यादित नाही. त्यात अख्खं भारतीय गाव आहे, शहराशी घसट होऊन आलेलं पात्र आहे, विविध जाती-जमातींच्या परस्परसंबंधांचा पट आहे, अलीकडच्या काळात आत्महत्यांमुळे बातम्यांचा विषय होत राहणारी शेतकऱ्यांची समस्याही आहे- हा सगळा पट काही मर्यादित दृश्य तपशिलांच्या चौकटीत बसवणारं हे कव्हर कादंबरीवर अन्याय करतं, असं वाटतं. आपल्याकडे २००८ सालची, तिसरी आवृत्ती आहे. पहिल्या व दुसऱ्या आवृत्तीचं कव्हर वेगळं असण्याची शक्यता कमी आहे. आणि आता इथून पुढे मुद्दाम नवीन मुखपृष्ठ करून ही कादंबरी चांगल्या डीटीपीसह बाजारात येण्याची शक्यताही कमी वाटते. अलीकडे आलेली आवृत्ती जुन्याच डीटीपीसह, जुन्याच बांधणीसह, त्याच मुखपृष्ठासह, फक्त किंमत वाढवून आलेली आहे. कागदाचे वाढलेले दर, वाढलेले कर यांमुळे किंमत वाढली असेल. पण २००८ साली शंभर रुपयांना मिळणारं पुस्तक आता तीनशे रुपयांना विकायचं असेल, तर जाता-जाता त्यातलं डीटीपी कम्प्यूटरच्या मदतीने नव्याने सुबकपणे करून घेणं, इत्यादी गोष्टी काही अतोनात खर्चिक नाहीत. किंबहुना, किंमतीत हा बदल करताना, इतक्या कालांतराने नवीन आवृत्ती येत असताना, दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानाने काही गोष्टी सहजपणे उपलब्ध करून दिलेल्या असताना, इतपत बदल करणं आवश्यक आणि व्यावसायिकदृष्ट्या बरं वाटतं. (पण मुळात श्रीविद्या प्रकाशनाने अशी साचेबद्ध नसलेली कादंबरी प्रकाशित केली, ही चांगलीच गोष्ट आहे). तर ही नोंद लिहिणाऱ्याला मुखपृष्ठ आवडलं नाही, म्हणून ते बदलावंच, असा आग्रह नाही. पण त्या काळी कादंबरी काढताना हे मुखपृष्ठ योग्य वाटलं असेलही समजा (खरं तर त्या काळाचा विचार केला तरीही अशा तपशिलांपुरता चेहरा कादंबरीला देणं अपुरं), तरी आता वाढीव किंमतीत थोडा खर्च नवीन मुखपृष्ठावरही करणं अव्यावहारिक नि अवाजवी, ठरलं नसतं. या कादंबरीवर आधीच उजेड कमी, तो अधिकाधिक कमी करत नेण्याची तजवीज अशा घटकांमुळे होते, असं वाटतं.





सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र





सौ.मनिषा राजन कडव
१६-ए ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग -४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*