काळाची जन्मकथा*

*काळाची जन्मकथा*
 
लेखक : स्टीफन हॉकिंग
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन
मराठी अनुवाद : डॉ. सुभाष के. देसाई
पृष्ठे- २२६, मूूल्य- ३०० रुपये



शास्त्रज्ञ म्हणजे काय किंवा हे शास्त्रज्ञ म्हणवणारे लोक नेमकं करतात काय हेदेखील जेव्हा कळत नव्हतं त्या वयापासून ते आजतागायत मला दोन लोकांविषयी कमालीचं कुतूहल होतं, आहे. ते म्हणजे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग. दोघांनीही आपापल्या देशांत राहून जागतिक संशोधन क्षेत्राला दिलेलं योगदान खूप मोठं आहे. इतर क्षेत्रात मिळते तशी लोकप्रियता शक्यतो शास्त्रज्ञांच्या वाट्याला येत नाही कारण त्यांचं काम नेहमीच पडद्यामागे राहून अविरतपणे चाललेलं असतं. माणसाचे वयक्तिक आणि सामाजिक आयुष्य सुखकर करणाऱ्या अशा हजारो गोष्टी पडद्यामागे अपार मेहनत करून "शास्त्रज्ञ" बनवत असतात पण लोकप्रियता ही नेहमी त्यांच्यापासून चार हात दूरच राहते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि डॉ. स्टीफन हॉकिंग हे सध्याच्या घडीला याला अपवाद मानता येतील. एखाद्या नेत्याच्या किंवा अभिनेत्याच्यादेखील वाट्याला येणार नाही अशी लोकप्रियता मिळवणारे हे दोन महान शास्त्रज्ञ! डॉ. हॉकिंग यांच्याबद्दल बोलायचं झालं ते आजच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय शास्त्रज्ञ होते. 'मोटार न्यूरॉन डिसीज' या दुर्धर रोगाशी आयुष्यभर झटत, शरीराच्या सर्व प्रतिकूलतेवर मात करीत, मृत्यूशी झुंज देत देशाच्याच नाही तर भाषेच्याही सीमा ओलांडून सामान्य माणसांपर्यंत पोहचलेल्या डॉ. हॉकिंग यांनी केलेल्या कामाला तोड नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षी ही व्याधी जडल्यानंतर अवघ्या दोन वर्षांचे आयुष्य डॉक्टरांनी दिलेले असताना, मृत्यूवर मात करीत ते पुढे अर्ध्या शतकाहून अधिक काळ कार्यरत राहिले. त्यांची हालचाल मंदावली, जवळजवळ थांबली, वाचा गेली, परंतु ते हरले नाहीत! आपले काम करीत राहिले. त्यांना विश्व जाणून घ्यायचे होते, ते का अस्तित्वात आले आणि ते जसे आहे तसे का आहे, याचा शोध घ्यायचा होता! आपले पाऊणशे वर्षांचे सारे आयुष्य हॉकिंग यांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात खर्ची केली आणि त्यातून जे हाती आले ते त्यांनी शास्त्रीय चौकटीत मांडले. भौतिकशास्त्राच्या, खगोलशास्त्राच्या रूढ सिद्धान्तांना धक्का देणारं संशोधन त्यांनी केलं. ज्यावर इतर शास्त्रज्ञांसोबत त्यांचे मतभेदही झाले पण त्यामुळे पुढील संशोधनास एक दिशा मिळाली. विश्वनिर्मिती आणि कृष्णविवर यांवरील त्यांच्या संशोधनावरदेखील नेहमी शास्त्रीय वाद होत असले तरी भावी संशोधनासाठी अनेक द्वारे त्यांनी खुली केली. अशाच पद्धतीने काळाबद्दल संशोधन करून ऐंशीच्या दशकात त्यांनी "काळाची जन्मकथा" लिहिला ज्याने पुढे इतिहास घडवला. भयकथा, गूढकथा, कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांवर वाचकांच्या जशा उड्या पडतात, तशा त्या शास्त्रीय पुस्तकांवर पडणं कठीणच! मात्र, डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी ही कठीण गोष्ट अगदी सहज साध्य करून दाखविली. त्यांनी लिहिलेल्या "काळाची जन्मकथा". पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादाने इतिहास घडविला. जगभरातील ४० भाषांत अनुवादित झालेले हे पुस्तक तब्बल २३७ आठवडे 'बेस्ट सेलर' ठरले होते. त्यामुळे या पुस्तकाची नोंद 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'नेही घेतली. सामान्य लोकांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत महास्फोटापासून कृष्णविवरापर्यंतच्या "काळाची जन्मकथा" डॉ. हॉकिंग यांनी या पुस्तकातून मांडला आहे. हे जग कसे आहे ते समजून न घेताच आपण आपले रोजचे आयुष्य जगत असतो. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? सूर्यप्रकाश कसा तयार होतो? त्यांचं आपल्या जगण्यासाठी असणारं महत्व काय? हा निसर्ग असा का आहे? हे विश्व कुठून निर्माण झाले? काळाची दिशा उलट फिरली तर काय होईल? मानवी ज्ञानाला मर्यादा आहेत का?कृष्णविवर म्हणजे काय? आपल्याला भूतकाळ आठवतो पण भविष्यकाळ माहीत नसतो, असे का? या विश्वाचा आरंभ कसा झाला? या विश्वाला अंत आहे की अंतहीन आहे? या विश्वाला सीमा आहे की नाही? अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत? काळाच्या प्रवाहाला एकच दिशा आहे का? लहान मुलांचा अपवाद सोडला तर असे प्रश्न पडणारी व्यक्ती क्वचितच सापडेल. डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीने त्यांच्या या "काळाची जन्मकथा" मधून दिलेली आहेत.

आपल्याला हे एकमेव आयुष्य लाभले असून, याच आयुष्यात विश्वाला समजून घ्यायचे आहे आणि मी तेच करतो आहे, असे म्हणणाऱ्या डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी संपूर्ण आयुष्यभर विश्वाच्या रहस्याचा शोध घेतला. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेची साक्ष देणारं आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "काळाची जन्मकथा"

बिग बँक थेअरी कृष्णविवर पर्यंतची लोकप्रिय कॉस्मोलॉजी यावर असणारे पुस्तक ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी लिहिले आहे .याचे मराठी मध्ये भाषांतर सुभाष देसाई यांनी केले आहे. 1988 हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले आहे .खगोलशास्त्राचा काहीही गंध नसणाऱ्या परंतु नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा असणाऱ्या रसिकांसाठी हॉकिंग यांनी मूलभूत संकल्पना या पुस्तकातून मांडल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*