बनगरवाडी
बनगरवाडी"
शाळेत जाण्यापेक्षा मुलांनी मेंढरामागे जावे या ठाम मतांचा पालकवर्ग असलेल्या बनगरवाडीत कादंबरीचा तरुण नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर नव्यानेच शिक्षक म्हणून दाखल होतो आणि येथूनच सुरु होते "बनगरवाडी" च्या कथेचा प्रवास.
लेखक व्यंकटेश माडगूळकर यांना आलेल्या अनुभवावर आधारीत असलेली "बनगरवाडी" ही कादंबरी माणदेशातल्या 'लेंगरवाडी' नावाच्या वाडीवर बेतलेली आहे. प्रथम ही कादंबरी १९५५ साली प्रकाशित झाली. त्यानंतर आतापर्यंत तीचे बारा भाषेत अनुवाद करण्यात अाले आहे. बनगरवाडी कथानकावर १९९५ साली अमोल पालेकर दिग्दर्शित एक मराठी चित्रपटही प्रदर्शित झालेला आहे.
मास्तर गावात दाखल होताच त्याला बालट्याच्या धमकीचा सामना करावा लागतो. हे घडत असताना बनगरवाडीतील म्हाताऱ्या कारभाऱ्याची त्याला साथ मिळते आणि तो त्याक्षणी स्थिरावतो. कादंबरीच्या सुरुवातीलाच हे प्रसंग वाचत असताना कादंबरीमधील रांगड्या गावरान भाषेचा अंदाज येतो. आणि त्या भाषेसह वाचक उत्कंठेसह पुढे सरकतो....
आधीच म्हंटल्याप्रमाणे मुलांनी शाळेत न जाता मेंढरामागे जावे ह्या मताच्या एका ओसाड माळरानावर ३०/४० घरांची वस्ती असलेल्या बनगरवाडीतील पालकवर्गाच्या विचारांचा सामना करत राजाराम मास्तरला वाडीतील मुलांना शाळेत आणण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्याच्या प्रयत्नातुन हळूहळू शाळेतील मुलांची संख्या वाढू लागते. त्यासह मास्तर बनगरवाडीतील सर्व गावकर्यांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी होतो जातो आणि तिथल्या समाजजीवनात एकरुप होतो.
अशिक्षित, गरीब परंतु इमानदार अशी बनगरवाडीतील माणंस मास्तराला कारभार्याच्या बरोबरीचा मान देतात. घरातील कोणतीही गोष्ट मग ती सुख दुख ह्या कश्यातही मोडणारी असुदे मास्तरला सांगतात. मास्तर गावी जात असताना किंवा तालुक्याला जाताना हक्काने त्याच्याकडे कामे सांगतात. मास्तरही तेवढ्याच विश्वासाने कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. मग ते काम कोणतेही असुदे, पत्रे पोस्टात टाकणे, एखादे सामान आणणे, मनिऑर्डरी करणे इत्यादी कामे मास्तर पूर्ण करतो. एकदा तर कारभार्याच्या अंजीने दिलेली चोळी शिवून आणण्याचे कामही मास्तर करतो. त्यामुळे होत काय की मास्तरांपुढे काहीही अशक्य नाही असं गावकऱ्यांना वाटत असते. आणि ह्या विश्वासामुळेच एकदा शेकू गावातून कोणाकडूनही पेरणीसाठी बैल घेउन दे अशी विनवणी मास्तरासमोर करतो. पण ही एकच मागणी मास्तर पूर्ण करू शकत नाही. ज्याचे मास्तराला खुप वाईटही वाटते. परंतु पेरणीसाठी बैल न मिळाल्यामुळे शेकूची बायको नांगराला दुसर्या बैलाच्याजागी स्वतःला जुपूंन घेते. आणि हे वाचताना मन अधिक बिथरते.
दरम्यान कथेत अनेक व्यक्ती आणि त्यांना निगडीत अनेक प्रसंगांचा उल्लेख आहे जे वाचत असताना वाचक पुस्तकापासून दूर हटत नाही. पोटापाण्यासाठी गावोगावी फिरणारा आयबु, गावकऱ्यांच्या शेतातील शेंगा, वांगी चोरणारा आणि वरून मालकाकडे कबुल करणारा आनंदा रामोशी, मास्तराच्या वाईटावर टपलेला बालट्या, बैलाशेजारी स्वतःला जुंपून नांगरट करणारी शेकूची बायको, माझी चोळी शिवून आणा म्हणणारी कारभाऱ्याची अंजी, आपल्या मेंढरांवर हल्ला करणाऱ्या लांडग्याला तोडणारा विद्यार्थी सता, नव्याने बांधत असलेल्या तालमीसाठी झाड न देणारा बाळा ही सर्व मंडळी डोळ्यासमोर चित्रस्वरुपात जशीच्यातशी उभी राहतात.
ह्या व्यक्तीरेखेतुन जात असताना गावात तालिमीची इमारत नसणाऱ्या बनगरवाडीत एक पक्की तालिमीची इमारत असावी म्हणून मास्तर तालीम बांधायची कल्पना सर्वांसमोर मांडतो. पुढे ह्या कल्पनेला सर्वांकडून अनुमतीही मिळते. मग ही इमारत बांधताना त्यात येणाऱ्या अनेक अडचणी, पैशाची जमवाजमवी, बांधकाम पुर्ण होण्याच्या मार्गावर असताना त्या इमारतीसाठी जीवतोड मेहनत करणार्या आयबूच तालमीच्या इमारतीवरून पडणं, नंतर एका रात्रीत उरलेली ईमारत पुर्ण होण, पंत सरकारांच्या हस्ते तालीमच्या उद्घाटनाचे नियोजन, मास्तरमुळे छोट्याशा धनगरवाडीत राजाचं येणं, सोबत म्हाताऱ्या कारभाऱ्याला पाटीलकीचा मान मिळणं. आणि हे सगळं चांगलं चाललेलं असताना अचानक म्हाताऱ्या कारभऱ्याचा मृत्यू, आणि त्यानंतर काही काळाने माणदेशी दुष्काळ पडणं आणि सारा भाग ओसाड होऊन बनगरवाडीतुन सर्वांचं स्थलांतर होणं. चाऱ्या अभावी, रोगराईने असंख्य मेंढरांचा बळी जाणं. आणि हसती खेळती बनगरवाडी निर्मनुष्य होणं हे वाचत असताना वाचक छिन्न मनाने बनगरवाडीत ते सर्व स्वत: अनुभवत असतो.
बनगरवाडीतील इतक्या दिवसांच्या आठवणी, अनुभव घेतलेला मास्तर र्हास झालेल्या त्या वाडीतील दृश्य हताशपणे पाहत राहतो आणि कादंबरीचा शेवट होतो. परंतु त्यानंतरही "बनगरवाडी" हे पुस्तक वाचल्यावर लेखकाच्या मनातील वाडीतच जन्मलेली त्यातली ती पात्रं मनात घर करून राहतात.
"माणसं चितारणारा लेखक" व्यंकटेश माडगुळकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून त्यांच्या मनातल्या खडकावरच निर्माण झालेली "बनगरवाडी" वाचकाला अद्भूत अनुभव देते. ओघवती शैली व प्रत्ययकारी चित्रण यामुळे ही कादंबतरी उत्कृष्ट साहित्यिक कलाकृती ठरली आहे. त्याचप्रमाणे ह्या कादंबरीतील प्रत्येक माणूस रांगडा व ताठर दिसत असला तरी त्याच्या अंतःकरणातून ओलावा पाझरत असतो. याचेच सुरेख वर्णन ह्या कादंबरीतून येते.
काही पुस्तके वेड लावतात, त्यांना वाचणे म्हणजे एक वेगळा अनुभव असतो.
अश्याच अमुभवाची प्रचीती देणारे पुस्तक म्हणजे "बनगरवाडी"
पुस्तक : बनगरवाडी
लेखक : व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन : माैज प्रकाशन
पाने : १३१
किंमत : १०० रु.
सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र.
सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
छान परीक्षण
ReplyDelete