मातीखालची माती
मातीखालची माती
ग्रामीण वास्तव जीवनाला नकळत झालेला स्पर्श... नाविन्यपूर्ण नावाने प्रकाशित झालेला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह ग्रामीण स्वभावचित्रांचे विविध दर्शन घडविणारा आहे. ‘मातीखालची माती ओली आणि उबदार असते... तिच्या उबीतच पिकं जीव धरतात’ आईच्या एका सहज बोलून गेलल्या वाक्यांतून ह्या संग्रहाला वेदनाशील मनाचे अंकुर फुटले आहेत असं भासतं. हातबुडी आलेला शिवा, चव्हाणांचा आबामा, बापू, आक्कू मावशी, गडी, सखाराम, बाबाजी बल्लाळ, फुलाआत्ती, भाडेकरु दत्तू, पोरका दिन्या, तपस्विनी, धोंडबा खादाड्या, खुळा इठू आणि लंगडा गोपा अशा चौदा व्यक्तिरेखांतून दर्शन घेतलंसं वाटतं एका सलंग खेडे गांवाचं - जिथं उंस पिकतो आहे-तितक्याच शिव्याही पिकताहेत, उधळल्या जात आहेत. ग्रामीण जीवनांतील विविध कथा मराठी साहित्यांत चांगल्याच रुजल्या आहेत, ‘खेड्यांत चला’ ह्या ग्रामोद्धाराच्या संदेशापाठोपाठच ग्रामीण कथांना आगळे महत्व आलें. शहरातल्या यांत्रिक जीवनाला कंटाळलेल्या मुळच्या ग्रामीण मनाला मूळ गावच्या व्यक्तिचित्रांचा आठव सुखद गुदगुदल्या करून जाणे स्वाभाविक होतं. भोळ्या-भाबड्या शेतकरी कुटुंबाच्या कथा निसर्गरम्य परिसरांतून डोकावणाऱ्या निर्व्याज आनंदासारख्याच स्वागतार्ह झाल्या, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, त्याचा वीट येणे हेसुद्धा निसर्गप्राप्तच आहे. अशापैकी ‘खेड्यावल्ली माणसं’ ही कथा लक्षात रहाण्यासारखी लिहिली गेली. भोळी भाबडी म्हणवून घेणारी ही खेड्यावरची माणसं किती लबाड आणि संधिसाधू असतात ह्याच एक नमुनाच ह्या कथेने पेश केला होता. ग्रामीण कथा लिहिणे याचा एक सांचाच तयार झाल्यासारख्या ग्रामीण कथा पटापट निर्माण होत होत्या - त्यातूनच अनेक नवे नवे साहित्यिक उदयाला आले. ग्रामीण कथानके लिहिण्याची खास स्पेशेलिटी असलेला लेखक - वर्ग वरचेवर लक्षात भरु लागला. श्री. आनंद यादव यांनी ह्या कथासंग्रहांतून असेच एक स्थान अशा लेखकमालिकेत निर्माण केले आहे. जिवंत भाषा, स्वाभाविक वर्णन आणि पुष्कळशा शिव्यांचे हे ग्रामीण जीवन ‘जुनेरा’ चे जुणेर करते. घाटली, निवद असे विविक्षित अस्सल गांवठी शब्द घेऊन साकार होते. गावच्या मळ्यांचे शिवाराचे व वस्तीचें ओझरते दर्शनही वास्तवतेचे नाते सांगून जाते. ग्रामीण जीवनांतील - विशेषत: घाटावरच्या ग्रामीण जीवनांतील - दैनंदिन व्यवहार व काही विशिष्ट मनोवृत्तीच्या स्वभावरेखा ग्रामीण जीवनाचे यथार्थ वर्णन करणाऱ्या आहेत. त्यात नाही ग्रामीण मनाची केवळ तरफदारी किंवा केवळ त्यांच्या मागासल्या स्वार्थी मनाचें कौतुक - ! शब्दाशब्दांतून इथे निर्माण होते आहे - कींव, दारिद्र्यांच्या ह्या जगाबद्दल कणव. येथलं अज्ञान, दारिद्रय, उपासमारीच्या पोटी आलेली अगतिकता, किंवा केवळ कष्ट करायला नको हा वृत्तींनी चटावलेली लाचारता, चोरटी वृत्ती किंवा रामोशीपणा पाहून मन विषण्ण होतं. ग्रामजीवनाची केवळ कौतुकं पहायला सरावलेल्या साहित्याला वास्तव जीवन स्पर्श करून गेल्याचा भास होतो. कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड टापूंतील कुठल्यातरी एका खेड्यांतील ऊसाच्या मळ्याचे, शेतकऱ्याच्या शेतीचे कष्ट ‘दिसाचा गोंडा उगवतीला मोहरत हुता, तवापून तो रातची चांदनी उगवून मिटायच्या वकतगत - आपण आखोदेखा हाल’ प्रमाणे पुन्हा अनुभवत आहोत, अशी भावना कुठल्याही घाटावरच्या व्यक्तीला होईल आणि मग ह्या व्यक्तिचित्र संग्रहांतील प्रत्येक व्यक्तिरेखा परिचयाची वाटू लागले. वऱ्हाड, कोंकण, मराठवाडा अशा महाराष्ट्राच्या विविध भूभागाची ग्रामीण वैशिष्टये आपण वाचली, अनुभवली. घाटावरची ग्रामीण चित्रे तर आपण सिनेमांतूनही अनेकदा पाहिली आहेत, पण त्यांतून दृश्य झालेल्या रगेल रंगेल जीवनाहून एक वेगळेच जीवन ह्या कथा संग्रहांतून पहायला सापडते. कष्ट, सुख-दु:खाचा खेळ हा मानवी जीवनाचा नित्याचाच भाग आहे, परंतु त्या सुख-दु:खाच्या विश्वालाही अनेक स्वभाव वैशिष्टयाचे पैलू असतात. प्रत्येक पैलूतून वेगवेगळे सप्तरंगी इंद्रधनुष्य हातांवर उमटतं - प्रकाशाचा किरण साधून मनाला हंसवतं - खुलवतं ! श्री. आनंद यादव ह्यांनी अशाच एका इंद्रधनुष्यांतून मानवी जीवनाचे स्वाभाविक रंग खुलवले आहेत. चौदा कथा घेऊन संग्रह मोठा करण्याऐवजी निवडक आठ दहा कथांनी तो छोटा केला असता, तर एका बैठकीत कथा संग्रह वाचन काढणाऱ्याला तो आटोपशीरही वाटला असता.
मातीखालची माती
लेखक: आनंद यादव
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे - १३८
वजन : १४७ ग्रॅम
ISBN10: 8171611095
मुल्य : १६०/-
सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र.
सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
वाचनीय , मार्मिक शब्दात
ReplyDelete