माय स्टोरी
माय स्टोरी
. मूळ लेखक -- इनग्रिड बर्गमन आणि ॲलन बर्गेस , मराठी अनुवाद -- आशा कर्दळे प्रकाशक -- मेहता पब्लिशिंग हाऊस .....जगप्रसिद्ध स्वीडिश अभिनेत्री इनग्रिड बर्गमन हिचं हे गाजलेलं आत्मकथन. तीन वेळा ऑस्कर पारितोषिकं आणि तीन वेळा न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स अवार्ड्स मिळवणाऱ्या या सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीनं या पुस्तकात स्वत:ची पडद्यावरची कहाणी तर सांगितलेली आहेच; पण पडद्यामागची कहाणीही हातचं राखून न ठेवता, प्रांजळपणे सांगितलेली आहे.सिनेमा हा विषय मला अभ्यासाच्या दृष्टीने आवडतो. मी सिनेमे फारसे बघितले नसले तरी ते बनतात कसे हा माझ्या आवडीचा विषय आहे. हिंदी सिने सृष्टीतील राजेश खन्ना, रफी, हेमा मालिनी, ऋषी कपूर यांची आत्मचरित्रे / चरित्रे मी वाचली आहेत. मराठीत माडगुळकर, सुधीर फडके, मोहन जोशी, सचिन पिळगावकर यांची सुद्धा चरित्रे वाचलेली आहेत. हॉलीवूड अभिनेत्री इनग्रीड बर्गमन हीचे चरित्र सुद्धा एका आगळ्या कुतूहलाने वाचून काढले. इनग्रीड बर्गमन ही स्वीडिश अभिनेत्री 1920 ते 1960 हा काळ गाजवून गेली. सिनेमा व रंगभूमी , दोन्ही तिने चार दशके गाजवून सोडले. तिची आई लहानपणीच गेली तर वडील 13 व्या वर्षी गेले. काकांनी मोठे केले पण त्यांना सिनेमा क्षेत्र अजिबात आवडत नव्हते. पण हिला मात्र अगदी लहानपणापासून अभिनयाचे प्रचंड वेड. काकांशी हट्ट करून ती नाटक शिकवणाऱ्या शाळेत प्रवेश घेते पण तिकडे वर्षे पूर्ण होण्या आधीच तिला सिनेमात काम करायची संधी मिळते. 40 वर्षाच्या तिच्या कारकीर्दीत तिने इटालियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश अशा सर्व भाषिक सिनेमात काम केले.कारकीर्दीत तिने अनेक चढउतार बघितले. आपल्या सर्वच दिग्दर्शकां बरोबर तिचे कडाक्याचे वाद झाले. काहीनी तिच्या हट्टापुढे मान तुकवली काही ठाम राहिले. या अशा वादातून सिनेमा किंवा नाटक कसे आकार घेते हे सुद्धा छान आले आहे. समकालीन तारकांबरोबर तिचे सूर अजिबात जुळले नाहीत. लोकांचे प्रचंड प्रेम व तेवढीच हेटाळणी सुद्धा तिने अनुभवली.पत्रकार कलाकारांच्या खाजगी आयुष्यात कोणताही विधिनिषेध न बाळगता कसे डोकावतात याचे सुद्धा भयंकर वर्णन यात आले आहे. जवळपास 6 फूट उंच असल्याने, उंची दिसू नये म्हणून काम करताना तिला सतत वाकून रहावे लागे. उंच टाचांच्या चपला ती कधी घालूच शकली नाही ! ती दिसायला मादक नव्हती पण आकर्षक मात्र होती आणि आपला अनोखा ठसा उमटवू शकली. तिचे खाजगी जीवन सुद्धा साधे सरळ नव्हते. तिची 3 लग्ने झाली व तेवढेच घटस्फोट. 3 मुली व एक मुलगा यांचा ताबा मिळवा म्हणून केलेली कायदेशीर लढाई यात वाचायला मिळते. युरोप आणि अमेरिका यांच्या संस्कृतीत किती टोकाचा फरक यात दिसतोच पण अगदी युरोपात सुद्धा प्रत्येक देशात लोकांचे वेगवेगळे स्वभाव तिने अनुभवातून उलगडून दाखवले आहेत. आई, आदर्श पत्नी, हाडाची कलाकार, सामाजिक दायित्व हे सर्व घटक सांभाळताना आपली कलेशी असलेली निष्ठा जपताना होणारी तिची घालमेल अस्वस्थ करते. हे सर्व सांभाळताना तिला अखंड संघर्ष करावा लागला. तत्कालीन अनेक थोर लेखक, कलाकार, राजकारणी यांचा सहवास तिला लाभला. शेवटच्या प्रकरणात तिने दिलेली कर्करोगाशी झुंज आहे. मूळ इंग्रजी कादंबरीचा मराठी अनुवाद आशा कर्दळे यांनी खूप सुंदर केला आहे. कादंबरी बऱ्यापैकी मोठी आहे. निवांत शनिवार रविवार असे जोडून घेवून तब्येतीत वाचावी अशी आहे !
माय स्टोरी. मूळ लेखक -- इनग्रिड बर्गमन आणि ॲलन बर्गेस , मराठी अनुवाद -- आशा कर्दळे प्रकाशक -- मेहता पब्लिशिंग हाऊस ..
मुल्य :- ४९५ /-
सौ. मनिषा राजन कडव
१६/ए,ओमशिवमकृपा को.हौ. सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग -४
उत्तम माहिती , परीक्षण छान लिहिले.
ReplyDelete