बाराशिंग्याचे जंगल
'कान्हा': बाराशिंग्याचे जंगल
पुस्तकाची सुरुवातच एका थरारक, विस्मयकारक आणि जादूभरल्या संध्याकाळने होते. कान्हाच्या जंगलात लेखक जिप्सीने सहजच भटकंती करत असताना मैनहर नाल्याजवळ केवळ नशिबानेच, एका अत्यंत नाट्यमय शिकारीचे ते साक्षीदार झाले.
अगदी अचानकपणे तिथे एक वाघीण अवतरली. ती इतक्या शांतपणे तिथे विहरत होती की तेथील आजुबाजूच्या प्राण्यांना जणू संदेश देत होती की आपण शिकारीच्या मूडमध्ये नाहीच आहोत ! आणि एका बेसावध क्षणी, अगदी नाट्यमयरित्या तिने केलेल्या एका चितळ-मादीची शिकार पहाण्याचं अहोभाग्य लेखक व त्यांच्या सोबत्यांना लाभलं. इतकंच नाही तर ती वाघीण ती शिकार तोंडात धरून, दूरवर चालत जाऊन, आपल्या लपवून ठेवलेल्या बछड्यांपर्यंत पोहोचते. तिने हाकारताच तिची तीन गोजिरवाणी पिल्लं पहायला मिळाल्याने तेथील उपस्थित अगदी हरखून जातात. लेखक ही सर्व घटना आपल्या चित्रवेधी शैलीने आपल्या डोळ्यांसमोर अशी काही उभी करतो जणू काही आपण तिथे उपस्थितच आहोत आणि आत्ता आपल्या डोळ्यांसमोर हे सगळं घडतंय. अशी जबरदस्त शैली आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत! आपण पुस्तक संपवून खाली ठेवेपर्यंत कान्हाच्या जंगलातच विहरत असतो.
लेखक कान्हाचा इतिहास आपल्याला आवर्जून सांगतो. त्यामुळे आपल्याला नैसर्गिक संपत्ती व वन्यजीवनानं परिपूर्ण असलेल्या या जंगलाचे महत्व समजते. लेखकाच्या मते 'कान्हा' हे एक फारच आगळंवेगळं जंगल आहे. प्रचंड मोठा विस्तार (एकूण क्षेत्रफळ १९४९ चौ.कि.मी.) असलेलं हे अरण्य मैकल पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. सातपुडा पर्वतांचाच हा एक भाग आहे. त्यामुळे कान्हात विविध प्रकारचे अधिवास बघायला मिळतात. डोंगर, दऱ्या, साल आणि मिश्र वृक्षांचं अरण्य, अथांग गवती कुरणं, नदी-नाले अशा वैविध्याने कान्हाचा अरण्यपरिसर नटलेला आहे. अधिवासांच्या याच विविधतेमुळे इथं आढळणाऱ्या प्राणी- पक्ष्यांमध्येही वैविध्य दिसून येते. यातील काही वन्यजीव प्रजाती तर जगात कुठेच आढळत नाहीत. उदा. 'बाराशिंगा' (टणक जमिनीवरचा बाराशिंगा) ही उपजात संपूर्ण जगात 'कान्हा' वगळता कुठेही आढळत नाही. कान्हातील वनखात्याने अथक प्रयत्न आणि अभ्यासातून या दुर्मिळ जिवाचं संरक्षण आणि संवर्धन केलं आहे. अशा या जगप्रसिद्ध कान्हाचं संरक्षण करण्यात मात्र आपण कमी पडलो होतो. अनेक स्वार्थी शिकारी, प्रचंड लोकवस्ती, बिनबोभाट पाळीव गुरं चराई यांमुळे धोक्यात आलेल्या या अरण्यावर मोठंच संकट ओढवलं होतं. परंतु १९७३ साली (स्व.) पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लक्ष घातले, काही कायदेही केले आणि कान्हा हे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आलं. तेव्हापासून हळूहळू परिस्थिती सुधारली, सुधारते आहे.
लेखक आवर्जून नमूद करतो की कान्हाची गवती कुरणं हा तेथील व्याघ्र प्रकल्पाचा आत्मा आहे. कुरणांशिवाय कान्हाचा विचार करणं देखील असंभव वाटतं. कान्हाच्या एकूण राष्ट्रीय उद्यानाच्या ७% एवढं क्षेत्रफळ असलेली ही कुरणं अतिशय पौष्टिक व वैविध्यपूर्ण असल्यानं वन्यजीवांसाठी अतिशय महत्त्वाची आहेत. पूर्वी इथे आदिवासींची गावठाणं होती. पण त्यांच्या जंगलतोड व चुकीच्या झूम शेतीपद्धतीमुळे जंगलाचं अतोनात नुकसान झालं. याशिवाय त्यांनी पाळलेल्या गुरांच्या चराईमुळे त्यांना होणाऱ्या ॲंथ्रेक्स, तोंडखुरी व इतर संसर्गजन्य रोगांच्या फैलावासाठी ही गवती कुरणं वन्यजीवांचाही जीव धोक्यात आणण्यास कारणीभूत होत होती. जंगलातील तृणभक्षी जनावरांचे कळपच्या कळप मृत्युमुखी पडायचे. विशेषतः रानगव्यांना या रोगांचा मोठाच धोका निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाने यात लक्ष घातले. वन्यजीवांच्या हक्काचा चारा त्यांना मिळायलाच हवा, म्हणून कुरणांच्या जैवविविधतेचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला. त्यावेळी तिथं १६ प्रकारच्या दुर्मिळ वनस्पतींचा शोध लागला. मग, कान्हातील या गावांना १९६९ ते १९९८ या काळात कान्हा व्याघ्र प्रकल्पाबाहेर पूर्ण सुविधांसह वसविण्यात वनविभागाला यश आलं. त्यामुळे सहाजिकच गावांची मोकळी झालेली जमीन किंवा शेती ही लगेचच गवती कुरणांमध्ये परावर्तित झाली व तेथे गवताच्या अनेकविध जातींचं अस्तित्व दिसू लागलं. तसंच, अशा गावांशेजारी गावतलाव वा पाणवठे असायचे. त्यामुळे गवती कुरणं तृणभक्षक जनावरांच्या गर्दीनं फुलून गेली. दुर्मिळ बाराशिंग्यांसारख्या तृणभक्षकांसाठी तर ही खूपच उपयुक्त कुरणं ठरली. या तृणभक्षक जनावरांपाठी वाघासारखे भक्षक प्राणी देखील आले. अशा प्रकारे मानवी हस्तक्षेप थांबताच निसर्गचक्राने आपलं काम चोख बजावलं. आता तर कान्हातील सगळीच कुरणं वन्यजीवप्रेमींकरता प्राणीसंपदा बघण्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची ठिकाणं झालेली आहेत.
अशीच कान्हाच्या जंगलाची अनेकांगांनी सखोल माहिती देत लेखक आपल्याला ज्ञानसमृद्ध करत रहातो. कान्हातील 'साल' या प्रमुख वृक्षाबद्दल पण त्याने विस्तृत माहिती दिली आहे. इतर वृक्ष, वनस्पती, कीटक, पक्षी यांबाबतचं माहितीचं भांडारच खरं तर या पुस्तकात आहे.
कान्हातील वन्यप्राण्यांप्रमाणे इथलं पक्षीजीवनही अतिशय समृद्ध आहे. येथे, पक्ष्यांच्या जवळजवळ ३०० पेक्षा जास्त प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त व्याघ्रप्रेमींव्यतिरिक्त खास पक्षिप्रेमींचीही गर्दी येथे पहायला मिळते. दुर्मिळ अशा पक्ष्यांमध्ये भारतातील सगळ्यात मोठा आणि जगातील सर्वांत मोठा उडणारा पक्षी 'सारस क्रौंच' हा कान्हातील प्रमुख पक्षी आहे.
लेखक आपल्याला आनंदाने सांगतो की त्यांनी एकदा तिथे 'ब्राऊन वुड आउल' चा फोटो टिपला. तोपर्यंतच्या पक्षिसूचीमध्ये याची नोंद नव्हती.
त्यामुळे, ही त्यांनी घेतलेली नोंद 'कान्हा'साठी पहिलीच नोंद होती. कान्हातल्या दुर्मिळ किंवा क्वचित दिसणाऱ्या पक्ष्यांमध्ये- काळा ढोकरी, काळा करकोचा, कलहंस, बोनेलीचा गरूड, इजिप्शियन गिधाड, शबल ससाणा, लग्गड ससाणा, काळा तितर, बॅलोनची पाणकोंबडी, तणमोर, तपकिरी व्याध घुबड, काळटोप खंड्या, निळ्या दाढीचा वेडा राघू यांचा समावेश आहे. त्याशिवाय इतर प्राणी-पक्ष्यांची मोठी सूचीच त्यांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेली आहे.
लेखकाने अगदी डोळसपणे प्रचंड जंगलभटकंती केलेली असल्याने त्याच्या तीक्ष्ण नजरेने वन्यजीवनातील अनेक अद्भुत घटना टिपलेल्या आहेत. त्या सर्वांचं वर्णन त्यांनी अगदी ओघवत्या शैलीत केलेलं आहे. मग ते दोन नर सांबारांमधील कळपावरील वर्चस्वासाठी ताकदीची लढाई असो वा कोतवालाने इतर पक्षांवर केलेली दादागिरी असो वा दोन कोल्ह्यांनी मिळून चतुराईने केलेली मोराची शिकार असो वा सामर्थ्यशाली व्याध गरूडाने केलेली होला पठाणाची शिकार असो... प्रत्येक घटनेचं वर्णन, 'ऑंखों देखा हाल' असल्याने ती घटना थेट आपल्याही मनश्चक्षूंपुढे उभी रहाते. एकदा तर एक प्रसंग त्यांच्या जीवावरच बेतला असता. केवळ नशीब बलवत्तर होतं म्हणून ते सुटले.अशा वन्यजीवनातील अनेक चित्तथरारक प्रसंगांनी हे पुस्तक आपल्याला खिळवून ठेवतं.
जंगलात जाऊन वन्यजीवांचं निरीक्षण व प्रकाशचित्रण करणाऱ्या वन्यप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्यासाठी लेखक या पुस्तकात उपयुक्त होईल अशी मार्गदर्शक सूची व नियमावली देतात. जी कोणत्याही अभयारण्यात जाण्यापूर्वी प्रत्येकाने जरूर वाचावी.
सर्वात शेवटी मी असं म्हणेन, अशी पुस्तकं वाचल्यानं माणसाला किमान हे जरी कळालं की निसर्गाच्या साखळीचं महत्व काय आहे आणि ती राखण्यात मानवाचं कर्तव्य काय आहे?...तरीही अशा पुस्तक-प्रपंचाचं सार्थक होईल.
'कान्हा': बाराशिंग्याचे जंगल.
लेखक - अतुल धामनकर
प्रकाशक - मनोविकास
पृष्ठ संख्या -२२७
किंमत -रु.३६०/
सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र.
सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
Comments
Post a Comment