फेरा
सदर - *पुस्तके उलगडताना*
उत्कट अनुभूतीचा जिवंत आविष्काराचा फेरा... ‘लज्जा’ या कादंबरीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशझोतात आलेल्या तस्लिमा नासरिन या बंगाली लेखिकेची ‘फेरा’ ही लघुकादंबरी मानवी भावविश्वाचे प्रत्ययकारी चित्रण करण्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाली आहे. मानवी भाभावानांच्या सूक्ष्म छटा या कादंबरीत समर्थपणे टिपलेल्या आहेत. मायभूमीपासून तुटलेल्या माणसाची जीवघेणी परवड, मायभूमीच्या मातीशी असलेले त्याचे नाते, त्या मातीची ओढ उत्कटपणे चित्रित करण्यात ही कादंबरी निश्चित यशस्वी ठरलेली आहे. फाळणीच्या पार्श्वभूमी या कादंबरीला आहे. मानवी मूल्यांचा होणारा ऱ्हास, धार्मिक विद्वेषांची माणसाच्या मनावर चढणारी पुटे, त्यातून लोप पावत जाणारी माणुसकी याचेही सुन्न करणारे दर्शन या कादंबरीतून घडते. माझ्या आवडत्या, सुंदर देशाची मूलतत्त्ववाद्यांनी केलेली भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक पातळीवरील अधोगती पाहून आक्रोशणारे लेखिकेचे मन वाचकांना अस्वस्थ करते. त्याचबरोबर अंतर्मुख होऊन विचार करायलाही प्रवृत्त करते. बांगला देशातील मयमनसिंह येथे (पूर्वीच्या अखंड भारतात) एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली कल्याणी ही या कादंबरीची नायिका आहे. ‘आनंद मोहन’ या महाविद्यालयात शिकणाऱ्या कल्याणीचे तिच्याच वर्गातील एका गावंढळ तरुणावर बादल) प्रेम बसते. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या जातात. सुखी जीवनाची सुंदर स्वप्नं पाहण्यातच तिचे दिवस जात असतानाच तिच्या जीवनात भयंकर वादळ येते. भारत-पाकिस्तानची फाळणी होणार, येथे आपल्या कुटुंबाला जगणे कठीण होणार म्हणून एके दिवशी अचानकपणे कल्याणीचे वडील (हरिनारायण राय) आपल्या मुलांना कलकत्त्याला पाठविण्याचा निर्णय घेतात. आपले गाव, तेथील निसर्ग, जीवलग मित्र-मैत्रिणी यांना सोडून जाणे कल्याणीच्या जीवावर आलेले असते. ती दडून बसण्याचा प्रयत्न करते, पण तिला तेथून पाठविले जाते. ती आपल्या भावंडांसह मामा-मामीकडे कलकत्त्याला येते येथे तिला मोलकरणीसारखी वागणूक मिळते. नातेवाईकांच्या वासनेने बरबटलेल्या नजरांना सामोरे जावे लागते. तिथे ती घरची काम करून महाविद्यालयात शिक्षण घेते. खासगी नोकरी करते. कलकत्त्यामध्ये तिचा परिचय अनिर्वाण या भारतीय तरुणाबरोबर होतो. परिचयाचे रूपांतर प्रेमात होते. बादल आणि आपले गाव, तेथील ब्रह्मपुत्रा नदी, तळे, विविध फळांची झाडं, हे तिच्या संवेदनशील मनावर कोरलेलेच असते. ते विसरणे तिला अशक्य होते. मामा-मामींच्या जाचातून सुटण्यासाठी, नातेवाईकांच्या वासनांध नजरातून बचाव करण्यासाठी एक उपचाराचा भाग म्हणून कोर्टात जाऊन ती अनिर्वाणबरोबर लग्न करते. त्यांचा संसार सुरू होतो. मात्र तिच्या डोक्यातून आपला देश, आपला गाव, तेथील माती, मित्र-मैत्रिणी यांच्या आठवणी तीव्रतेने येत असतात. तीस वर्षे ती या आठवणीवरच दिवस ढकलत असते. तिला दोन मुलं होतात. दरम्यान तिचे आई-वडील दोघेही मरण पावतात. आता तेथे आपले कोणीही राहिले नाही याची खंत तिला दिवसेंदिवस अस्वस्थ करते. आपल्या मैत्रिणींकडे जावे, जुन्या आठवणींना उजाळा द्यावा, असा विचार करून ती कशीतरी पतीची परवानगी घेऊन सहा-सात वर्षांच्या दीपनला सोबत घेऊन तीस वर्षानंतर ती बांगला देशातील मयमनसिंहला येते. पूर्वीचे वैभव तसेच असेल, आपले धर, ब्रह्मपुत्रा नदी, तळो, नारळ, पेरू, जांभळाची झाडं, मैत्रिणी पाहायला मिळतील. आपल्या मातीत काही दिवस तरी विसावता येईल अशी कितीतरी स्वप्नं घेऊन ती आलेली असते. मयमनसिंहला आल्यानंतर मात्र तिची घोर निराशा होते. तिचे घर सरकारने जप्त केलेले असते. ते घर पाडून तेथे सिंमेटची इमारत उभी केलेली असते. झाडं तोडलेली असतात. नदी आटलेली असते. नदीचे रूपांतर नाल्यात झालेले असते. तिला तेथे कोणी ओळखत नाही. तिचे म्हणून तिथे काहीच नसते. आपले घर असलेल्या जागेवर ती व्याकूळ मनान रेंगाळते. मूठभर माती उचलून घेते. तिच्या घरासमोरचे जांभळाचे झाड मात्र अद्याप असते. असंख्य आठवणी दाटून येतात. ती त्या झाडाला कवटाळून ओक्साबोक्सी रडते. जमलेली माणसं वेडी म्हणून मिला हिणवतात. तिची टिंगल करतात. तिची बालमैत्रीण शरिफदेखील तिला ओळखत नाही. तिला भेटण्यासाठी तर ती एका देशातून दुसऱ्या देशात आलेली असते. तिच्या सर्व स्वप्नांचा चुराडा होतो. ब्रह्मपुत्रा नदीप्रमाणे या माणसांची मनंही आटलेली आहेत, असे तिला वाटते. ती हिंदू आहे म्हणून तेथील माणसं तिच्याकडे तिरस्काराने पाहतात. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी झपाटल्यासारखे ती तिच्या आवडत्या गावातून भटकते. ‘आनंद मोहन’ महाविद्यालयात आल्यानंतर तेथील सर्वच बदललेलं तिला दिसतं. तिचा प्रियकर बादल मुक्ती लढ्यात एक पाय घालवून अपंग झाल्याचे तिला समजते. बादलने आपल्या देशासाठी काही तरी केले याचा तिला अभिमान वाटतो. त्याचबरोबर त्याच देशाचा होणारा ऱ्हास पाहूनही ती खंतावते. तेथील लहान मुलांना, तरुणांना हिंदूद्वेषाचे आणि नमाजपठणाचे शिक्षण कसे दिले जाते.
ते पाहून तिचे अंत:करण तीळ तीळ तुटते. पंधरा दिवसांसाठी आपल्या देशात राहायला गेलेली कल्याणी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीच निराश मनाने आणि भरल्या अंत:करणाने परत येण्यासाठी निघते. या कादंबरीत लेखिकेने कल्याणीच्या भावजीवनाचे विविध छटांसह चित्रण केलेले आहे. हे भावविश्व त्या नायिकेपुरतेच मर्यादित राहात नाही तर मायभूमीपासून, मातीपासून तुटलेल्या माणसाचे ते प्रातिनिधक चित्रण बनते. मानवी भावभावानांचा जिवंत आणि ज्वलंत आविष्कार या कादंबरीचा गाभा आहे. सरळ, साध्या अंत:करणाला भिडणाऱ्या निवेदनामुळे या कादंबरीचा परिणामकारकता वाढते. आठवणीच्या रूपाने निवेदन तंत्र वापरल्याने कथानकात काही ठिकाणी अवरोध निर्माण झाल्यासारखे वाटते. लहान लहान उदाहरणांमधून लेखिकेने मानवी मनाच्या बदलांचे प्रभावी चित्रण केलेले आहे. लहान मुलांच्या मनावर हिंदू लोकांविषयी द्वेष कसा बिंबविला जातो. त्याचे अतिशय समर्पक उदाहरण लेखिकेने दिलेले आहे. काळ्या मुंग्या म्हणजे मुसलमान आणि तांबड्या मुंग्या म्हणजे हिंदू. काळ्या मुंग्यांना सोडून द्यायचे आणि तांबड्या मुंग्यांना मारायचे. या लहान मुलांच्या मुंग्या-मुंग्याच्या खेळाचे उदाहरण सूचकपणे आणि मार्मिकपणे दिलेले आहे. फाळणीमुळे केवळ भूप्रदेशच विभागला गेला नाही तर माणसा-माणसांची मनेही विभागली गेली आहेत, याचे विदारक चित्रण या कादंबरीत केलेले आहे. देश, प्रांत, प्रदेश येथील समानपणे बदलत जाणाऱ्या आणि वाह्यात बनत चाललेल्या तरुण पिढीसंबंधीचे वास्तव निरीक्षणही लेखिकेने स्पष्टपणे नोंदविलेले आहे. या कादंबरीतील नायिकेने उपस्थित केलेले, माणसांपेक्षा धर्म, देश, भाषा यालाच अधिक महत्त्व द्यावे का? माणूस धर्माचा गुलाम का बनतो? माणुसकीपासून दूर का जातो? यासारखे प्रश्न वाचकांना अस्वस्थ तर करतातच पण विचार करायलाही भाग पाडतात. उत्कट अनुभव आणि मानवतेला केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या बदलत्या वास्तवाचा वेध यामुळे या कादंबरीला कलात्मक उंची प्राप्त झालेली आहे. ही छोटीशी कादंबरी प्रांताच्या धर्माच्या, भाषेच्या आणि देशाच्या सीमा ओलांडून व्यापक मानवतेचा विचार करते म्हणूनच तिचे महत्त्व अनन्य साधारण आहे. या कादंबरीचा मृणालिनी गडकरी यांनी केलेला मराठी अनुवादही सहज ओषवत्या भाषेत आहे. हा अनुवाद लेखिकेच्या भूमिकेला, कथानकाला न्याय देणारा असाच झाला आहे.
फेरा
लेखिका - तस्लिमा नसरीन
अनुवाद - मृणालिनी गडकरी
प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
किंमत - १२५/-
पृष्ठे - १८२
सोबत पुस्तकाचे मुखपृष्ठ छायाचित्र.
सौ. मनिषा राजन कडव
१६/एक, ओमशिवमकृपा को.हौ.सो
गुरुनानक शाळेजवळ, रामबाग-४
कल्याण (पश्चिम) ४२१३०१
छान परीक्षण
ReplyDelete