अज्ञानी बनवणारे वाचन नकोय*
*अज्ञानी बनवणारे वाचन नकोय*
वाचन करणं म्हणजे विचार करण्याची सवय लावणं. त्यामुळे अर्थातच आपलं वा जगणंही समृद्ध होत जातं. सध्या वाचनसंस्कृती लयाला गेली आहे, आजचे तरुण काही वाचत नाहीत अशी एक सार्वत्रिक तक्रार आहे. यात काही प्रमाणात तथ्य असले तरी एकूणच कालानुरूप वाचन पद्धतीमधील बदलसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. सध्या डिजिटल युग असल्याने ई-वाचनसंस्कृती रुजली आहे, असे म्हणे वावगे ठरणार नाही. तरुण पिढी वाचत नाही, ती पुस्तकांपासून लांब गेली आहे, सतत स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसून असते, अशी ओरड आपण सतत ऐकत असतो. पण आताच्या काळात ती तितकीशी खरी नाही, उलट वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे, वाचनाची आवड जोपासणारे आणि वाढवणारे कितीतरी जण एकत्र येऊन वेगवेगळे प्रयोग करीत असतात. आताची वाचन संस्कृती बऱ्यापैकी स्टायलिश आणि पर्सनलाइज्ड झाली आहे. किंडलने छापील पुस्तकांचे वाचन आणि डिजिटल वाचन याचा बऱ्यापैकी सुवर्णमध्य साधला आहे. आजकाल फेसबुकवर पुस्तकप्रेमी, पुस्तक मित्र असे वाचनप्रेमींचे अनेक ग्रुप्स आहेत, त्यावर एकमेकांना चांगली पुस्तके सुचवली जातात. त्यांचं परीक्षण शेअर केलं जातं, त्यावर चर्चा झडतात. बुक एक्स्चेंज किंवा बुक बास्केट हा उपक्रम सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग आहे. पुस्तकांची देवाणघेवाण यात होते. सध्याच्या या फास्ट युगात कॅफे कॉफी डेप्रमाणेच बुक कॅफेज कॅफेजचीदेखील चलती आहे. आजच्या वाचन संस्कृतीचं हे एक नवं रूप आहे, असं आपण म्हणू शकतो. छापील पुस्तकातच वाचनाची खरी मजा असते, असं मानणारा मोठा वर्ग एकीकडे आहे, तर किंडल आणि मोबाइलच्या स्क्रीनवरसुद्धा वाचनाचा उत्तम आनंद घेऊ शकणारा दुसरा मोठा गट आहे. यात तरुणांचा भरणा अधिक असला तरी इतरही वयोगटातील वाचक आहेत. काहींना तर पुस्तके ऐकण्यात खरा रस असल्याचे चित्रसुद्धा दिसते. वाचन संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ती सर्वभाषिक, सर्वकालिक होती आणि असणार आहे. याचं कारण माणसाचं जगणं आणि त्याच्या पृथ्वीवर असण्याविषयीचं कुतूहल हेच होय. पुस्तक हातात येण्यापूर्वी माणूस वाचत होताच यात अजिबात शंका नाही. झाडाच्या ढोलीमधून बाहेर आल्यावर निसर्गाचा सारा दिवाणखाना त्याच्यासाठी सताड उघडा होता. या सगळ्याशी आपलं नातं काय, या प्रश्नानं तो अस्वस्थ होत गेला. जगण्याच्या आधी व्याधीतून समोरच्या आपल्यासारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या माणसाशी वागताना, त्याला समजून घेताना, त्याच्याशी लढण्यापासून ते थेट त्याच्या मदतीला धावून जाण्यापर्यंतचा पट त्याच्या डोळ्यासमोर होता. भोवतालची प्राणिसृष्टी आणि माणसं याचं आकलन होता होता तो भराभर परिस्थिती वाचू लागला, त्याचा अन्वयार्थ लावू लगला आणि गुहाचित्रांमधून व्यक्त होऊ लागला. गुहाचित्रांचा काळ साधारण तीस हजार वर्षांपूर्वीचा आहे. चित्रांमधून व्यक्त होता होता वाचन संस्कृतीचा प्रारंभ झाला. वाचन संस्कृती, वाचनाची परंपरा अजूनही महाराष्ट्रात खूप चांगली रुजली आहे, असं अगदी ठामपणे म्हणता येणार नाही. संस्कृती हा शब्द राजवाडे यांनी कल्चर या इंग्रजी शब्दासाठी वापरला. त्यांना या शब्दामागं वाचनाचा संस्कार हा अर्थ अभिप्रेत होता. या अर्थानं आपण मराठी मंडळी जगाच्या तुलनेनं खूपच मागे आहोत, याचा प्रत्यय निरंतर येत असतो. संस्कारांतून संस्कृती निर्माण होते. नुसतं वाचणं, म्हणजे वाचन संस्कृती नव्हे. वाचनातून वर्तनबदल अपेक्षित आहे. ग्रंथालयाचं पुस्तक वेळेत परत करणं, हाही वाचन संस्कृतीचाच भाग आहे. परदेशी लोकांप्रमाणे एतद्देशीय वाचन संस्कृती समृद्ध नाही. राज्यात साडेबारा हजारांपेक्षा अधिक सार्वजनिक अनुदानित वाचनालयं आहेत. काही अपवाद वगळता या ग्रंथालयांमध्ये कोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत, हासुद्धा संशोधनाचा विषय ठरावा, केवळ पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत असतील, त्यांचा खप होत असेल, ती वाचली जात असतील म्हणजे त्या समाजात वाचन संस्कृती असेलच असे नाही. मात्र मराठीमध्ये यालाच वाचन संस्कृती म्हणण्याचा प्रघात दिसून येतो. खरे म्हणजे ही गोष्ट पुस्तक प्रकाशन, त्यांची खरेदी-विक्री आणि त्यांचे वाचन यांच्यापुरती निगडीत नाही. त्यातून काय निष्पन्न होते, याच्याशी संस्कृतीचा संबंध असतो. त्यामुळे हा शब्द वाचनाशी जोडताना त्याची संकल्पनात्मक मांडणी समजून घ्यायला हवी. कारण पुस्तकांची विक्री वाढली आहे म्हणजे वाचन संस्कृती वाढली आहे, असे अजिबातच म्हणता येत नाही. वाचन संस्कृती अस्तित्वात असलेल्या समाजात लोक कोणत्या प्रकारची पुस्तके वाचतात आणि वाचन हे त्यांच्या जगण्याचा किती प्रमाणात अविभाज्य भाग बनलेले आहे, हे सहजपणे दिसून येते. कोणाच्या वैयक्तिक संग्रहात किती पुस्तके आहेत किंवा कुणी किती पुस्तके वाचली, यावरून त्या व्यक्तीचा दर्जा ठरवला जाऊ शकत नाही. वाचन संस्कृती असलेल्या समाजात वैयक्तिक ग्रंथसंग्रहांना मानाची आणि हक्काची जागा असते. तो त्यांच्या सांस्कृतिक दर्जाचा अनिवार्य असा एक निकष असतो. हे खरे असले तरी केवळ त्यावरूनच तो ठरवला जाऊ शकत नाही. कोणती पुस्तके वाचली आहेत, त्यांचा त्या व्यक्तीच्या प्रत्यक्ष आचार-विचारांवर किती व कसा प्रभाव पडला आहे, बौद्धिक व भावनिक स्तराचे त्यामुळे कशा प्रकारे उन्नयन झाले आहे, हे त्याहून महत्त्वाचे असते. वाचन संस्कृतीचे भवितव्य हे समाजाच्या धारणेवर अवलंबून असते. जो समाज आपल्या भौतिक-सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नयनासाठी ज्ञानाचा मार्ग अनुसरतो, त्या समाजातील वाचन संस्कृतीचे भवितव्य हे उज्ज्वल राहते. जो समाज भौतिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ज्ञानाशिवायचे मार्ग अवलंबतो, त्या समाजातील वाचन संस्कृती ही अस्तंगत होऊ लागते आणि अशी वाचन संस्कृती अस्तंगत होऊ घातलेल्या समाजात ज्ञाननिर्मितीचा आदर होत नाही. परिणामी त्याची केवळ भौतिक प्रगती होत राहते, पण तो सांस्कृतिक- बौद्धिकदृष्ट्या कुपोषित होऊ लागतो. कुठल्याही समाजात बुद्धिवादी लोक तसे कमी असतात आणि या छोट्या वर्गावरच समाजातील वाचक-समाज आणि त्यातून वाचन संस्कृतीचे उन्नयन करण्याची जबाबदारी असते. ही जबाबदारी एका बाजूने जशी पूर्णपणे व्यावसायिक असते, तशीच दुसऱ्या बाजूने सामाजिक नीतिमत्तेशीही संबंधित असते. समाजहितासाठी आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी, स्वार्थ आणि अहंकार बाजूला ठेवणे, यातून व्यावसायिक नीतिमत्तेच्या जपणुकीपेक्षाही सामाजिक नीतिमत्तेची जपणूक अधिक मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यासाठी परंपरा, प्रेरणा आणि आदर्श यांची कास धरावी लागते. पण त्यांचे बोट सुटले की, भलत्याच गोष्टींना आदर्शाचे स्थान मिळायला लागते. अशा समाजात लेखक, प्रकाशक, पुस्तके यांना स्थान राहत नाही. ते उपहासाचा, चेष्टेचा विषय होतात. अशा समाजात वाचक समाज वाढत राहिला तरी वाचन संस्कृतीचे भवितव्य धोक्यात येते किंवा वाचन संस्कृतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांना फारसा व्यापक पाठिंबा मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. वाचनाची माध्यमं वेगवेगळी असतील; पण जग समजून घेण्याचं कुतूहल हे सनातन मूल्य आहे. एकोणिसाव्या शतकात ज्ञान सार्वजनिक झालं. ग्रंथालयांनी आपल्या दारापर्यंत ज्ञानगंगोत्री आणून ठेवली; पण दुर्दैवानं एकविसाव्या शतकात समाजमाध्यमांनी आपल्यापुढं ज्ञानाच्या नावावर अज्ञान पसरवले.
सौ. मनिषा राजन कडव
कल्याण ,पश्चिम
मार्मिक भाष्य
ReplyDelete