हिंदवी स्वराज्याचा ईश्वरी हुंकार - छत्रपती शिवराय*
*हिंदवी स्वराज्याचा ईश्वरी हुंकार - छत्रपती शिवराय*
हिंदुस्थानच्या पुण्यभूमीचं स्वामित्व आपल्याकडे घेऊन मोगलांनी या देशातील संस्कृतीचाही उच्छाद मांडला. जेव्हा या जुलुमाचा कळस होऊ लागला त्यावेळेला या पुण्यभूमीचे अत्यंत पावित्र्याने पूजन करणाऱ्या भूमीतले ईश्वरी अधिष्ठानही जागे झाले आणि एका अद्भुत स्वराज्य हुंकाराचा ओंकारध्वनी त्रिखंडामध्ये दुमदुमला, तो ध्वनी म्हणजेच ईश्वरी अधिष्ठानातून साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे अवताररूप होय. आज महाराष्ट्रासह देशभर महाराजांची जयंती मोठ्या अभिमानाने आणि आदराने साजरी होते आहे. हिंदुस्थान म्हणून भारताची जी काही आज ओळख टिकून आहे त्याचे सर्व श्रेय महाराष्ट्रातल्या या शिवाजी नावाच्या एका दुर्दम्य हुंकारामध्ये दडलेले आहे. डोळ्यादेखत आपल्याच प्रजेवर चालणारे जुलूम शिवाजी महाराजांनी पाहिले होते. माता जिजाऊंनी याच गुलामीच्या विरोधात द्वेष वारंवार व्यक्त केला होता. आणि आपल्यापोटी असाच एखादा अवतार जन्माला यावा ज्यातून केवळ ही गुलामी नष्ट व्हावी असे नव्हे तर हिंदू धर्माचा अर्थातच हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज डौलाने फडकवावा. आपल्याच प्रजेविषयीची अत्यंतिक तळमळ आणि त्यासाठी असलेली एक मनस्वी इच्छा जिजाबाईंच्या ठायी होती. म्हणूनच संपूर्ण हिंदू समाजाला छत्र बहाल करणारे छत्रपती त्यांच्यापोटी जन्माला आले. महाराजांचे हे अवतार कार्य म्हणजेच शिवनेरीवरचा तो सुवर्ण सूर्योदयच होता. शौर्याबरोबरच औदार्य आणि कर्तव्यांबरोबरच करुणेचा स्पर्श लाभलेले महाराजांचे हे व्यक्तिमत्व शब्दांच्या वर्णनापलिकडचे ठरते. म्हणूनच त्यांना अष्टपैलू म्हणणे हेदेखील पुरेसे ठरत नाही. हिमालयासारखे उत्तुंग कर्तृत्व आणि सागरासारखी अथांगता त्यांच्या प्रत्येक कृतीतून साकार होते. अल्पावधीत दीडशेपेक्षा जास्त गडकिल्ले जिंकण्याचा विक्रम जसा सांगता येतो. आणि औरंगजेबासारख्या शत्रूला कायमचा धाक वाटावा अशा प्रकारची त्यांची रणनीती जेव्हा गनिमी कावा या नावाने मंडीत होते त्यावेळेला त्यांच्यातला हा गुणवैशिष्टय़ांचा साठा केवळ ईश्वरी वरदानच वाटू लागतो. त्यांच्या हातूनच स्वराज्याचे संस्थापन व्हायचे होते. आणि त्यासाठीच धर्माचे अधिष्ठान त्यांना प्राप्त झाले.
शिवनेरी आणि इतर गडकिल्ले
शिवनेरीवर सरकारतर्फे मोठा उत्सव साजरा होतो . एवढे वर्ष दुर्लक्षित असलेला हा शिवनेरी किल्ला प्रत्येक पिढीचा आदर्श व्हावा आणि एकूणच महाराजांच्या कर्तृत्वाचाही अभ्यास त्यातून घडावा असे कधी सरकारला वाटले नव्हते. आतादेखील उत्सवाच्या माध्यमातून शिवनेरीवर भाषणं होतील आणि घोषणाही दिल्या जातील. परंतु त्यांच्या गुणवैशिष्टय़ांचे अनुकरण व्हावे. निदान त्याचा अभ्यास व्हावा. महाराजांनी उपयोगात आणलेली युध्दनीती, त्यांचे संघटन कौशल्य, राज्यकारभाराची आदर्श पध्दत, प्रत्यक्ष शक्तीपेक्षाही युक्तीच्या माध्यमातून शत्रुला नामोहरम करण्याची कार्यपध्दती, अष्टप्रधान मंडळ नेमून राज्यकारभाराची निर्माण केलेली आदर्श व्यवस्था अशा एक ना शेकडो गुणांचा अभ्यास करता येऊ शकतो, आणि त्याकरीताच महाराजांनी जिंकलेल्या एखाद्या तरी किल्ल्यावर त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वाचा ध्यास घेता येईल असे अभ्यासकेंद्र गरजेचे ठरते. दरवर्षी केवळ भाषणं आणि घोषणा देऊनच जयंती साजरी होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराज जर खन्या अथनि समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या कर्तृत्वाला असलेले अनेक पैलू अभ्यासले गेले पाहिजेत आणि ते संक्रमित करण्याची व्यवस्था झाली पाहिजे. दुर्दैवाने राज्यकर्त्यांमध्येच तशी इच्छाशक्ती नसते. कारण राज्यकारभार करतानासुध्दा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे अनुकरण होत नाही. रयतेचे राज्य किंवा जाणता राजा म्हणून ज्यांचा इतिहासाने गौरव केला. त्या रयतेशी असलेले सलगीचे संबंध ही फार मोठी विलक्षण अशी शैली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचा एक भाग होती. त्याचेच अनुकरण करणे आताच्या राज्यकर्त्यांना शक्य होत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या जयंतीला केवळ उत्सवी स्वरूप देऊन सध्याचे राजकारणी आपल्या दोषांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या गडकिल्ल्यांकडे झालेले दुर्लक्ष हे अशाच उदासिनतेचे मोठे निदर्शक आहे. ज्या गडकिल्ल्यांमधून शौर्य युध्दनीती किंवा राज्य व्यवस्थेची कितीतरी माहिती जोपासता येऊ शकते. याविषयी संशोधन आणि सातत्याने जर अभ्यास झाला तर स्वराज्याचे संगोपन करण्याची नवी दिशा प्राप्त होऊ शकते.
सातत्याने अभ्यास करण्याचा विषय
जगातल्या अनेक इतिहास तज्ज्ञांनी महाराजांच्या या युध्दकलेचा अभ्यास केलेला आहे. जलदूर्गाचे त्यांनी त्याकाळात केलेले बांधकाम हे एक आश्चर्यच ठरू शकते, म्हणजेच युध्दकला आणि संरक्षणाची रणनीती याविषयीचा मोठा वस्तुपाठ महाराजांनी घालून दिलेला आहे. खरेतर महाराष्ट्रात संरक्षण सिध्दतेचा अभ्यास करून घेणारे देशातले मोठे संरक्षण विद्यापीठ कोकणाच्या सागरकिनाऱ्याच्या हद्दीत होऊ शकते. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले हे ईश्वरी वरदान मुळापासूनच समजून घेतले पाहिजे. समाजातल्या प्रत्येक घटकाला किंबहुना अठरा पगड समाजामध्ये आपुलकी निर्माण करणारा आणि स्वराज्यासाठी कर्मठ बनवणारा असा हा कीर्तीचा राजा महाराष्ट्राचे आराध्यदैवतच ठरतो. परंतु शिवो भूत्वा, शिवम् यजेत् म्हणजेच शिवाची पूजा करताना शिवासारखं होता आलं पाहिजे. असे जे सांगितले जाते. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांसारख्या आराध्यदैवताची आराधना करताना त्यांच्यातल्या अनेक गुणांचे अनुकरण अनिवार्य ठरते. मंत्र्यांच्या अधिकान्यांच्या बंगल्यांना किल्ल्यांची नावे दिली जातात. लाखो रुपये खर्चुन त्या बंगल्यांची डागडुजी होते पण किल्ल्यांकडे ढुंकूनही पाहिले जात नाही. म्हणूनच या हिंदवी स्वराज्याचा हुंकार हा रोजच्या अनुष्ठानाचा भाग झाला पाहिजे. आणि ज्यांनी हे हिंदवी स्वराज्याचे अनुष्ठान घडविले त्यांच्यासाठी ते समर्पितही केले पाहिजे. समर्थ रामदासांनी त्यांना श्रीमंत योगी अशी बिरुदावली दिली होती. स्वराज्याच्या कष्टमय साधनेतून त्यांना प्राप्त झालेला हा वर एखाद्या योग्यासारखाच म्हणावा लागतो. त्यांच्या या अद्भुत कर्तृत्वाचे पोवाडे. चंद्रसूर्य असेपर्यंत गायले जाणार आहेत. म्हणूनच त्यांचे व्यक्तीमत्व हे सातत्याने अभ्यास करण्याचाच विषय ठरते.
सौ. मनिषा राजन कडव
कल्याण
Comments
Post a Comment