फास्टर फेणे
फास्टर फेणे
हॅरी पॉटर येण्याच्या आधीच्या म्हणजे थोडक्यात आमच्या नशिबवान पिढीने फास्टर फेणेचा थरार आणि शूर करामती अनुभवलेल्या होत्या. मुलांच्या मे महिन्याच्या सुटय़ा पडल्या की ‘फास्टर फेणे’ आठवतो. उन्हाळी सुट्टीमध्ये आंबे आणि फास्टर फेणेची सचित्र रोमहर्षक पुस्तके या दोन्हींचा फडशा पाडला होता! या फास्टर फेणेचे जनक होते प्रसिध्द बालसाहित्यिक भास्कर रामचंद्र भागवत. बनेश फेणे ऊर्फ फास्टर फेणे हे भा.रा. भागवत यांनी लिहिलेल्या मराठी कादंबरी मालिकेतील मुख्य काल्पनिक नायक आहे. कादंबर्यांतील संदर्भांनुसार तो शाळकरी विद्यार्थी असून महाराष्ट्रातील पुण्यातल्या विद्याभवन शाळेत शिकत असतो. प्रत्येक काम असामान्य गतीने करण्याच्या बनेश फेणेच्या गुणांमुळेच त्याला फास्टर फेणे असं नाव मिळते.या ‘फास्टर फेणे’च्या नावापासूनच सगळी गंमत आहे. त्यात नुसता ‘फ’चा झकास अनुप्रास नाही; नुसता इंग्रजी ‘फास्टर’ शब्दाचा ठसका नाही, तर त्या बनेश फेणेची सारी ईष्र्या, सारा वेग, गती आणि धडाडी त्या नावामध्ये उतरली आहे. भा. रा. भागवतांचा हा हीरो ‘फास्ट’च नव्हे, तर ‘फास्टर’ आहे आणि मग त्याचे कारनामे वाचताना आपणही त्याच्यासारखं गतिमान व्हायला हवं की काय असं वाचणार्याला सतत वाटत राहिलं आहे.
भास्कर रामचंद्र भागवतांचा जन्म ३१ मे, इ.स. १९१० रोजी इंदुरात सुधारकी कुटुंबात झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्राची बी.ए. पदवी घेतली. सुरुवातीपासून त्यांना इंग्रजी साहित्याच्या वाचनाची आणि विज्ञानाच्या अभ्यासाची आवड होती. बहुधा या आवडीच पुढील काळात विज्ञानकथा लिहिण्यास आणि जागतिक साहित्य मराठी बालवाचकांसाठी अनुवादित करण्यास त्यांच्या प्रेरणा ठरल्या असाव्यात.
फास्टर फेणे ज्या रीतीने भागवतांनी जिवंत केला; ज्या तऱ्हेने त्याच्या कहाण्या त्यांनी युद्ध, चक्रीवादळ अशा भव्य पटांवर रचल्या; ते सारं अतिशय प्रगल्भ, अतिशय नेमकं, चोख आणि उत्तम सर्जनाची खूण सांगणारं लेखन आहे. फुरसुंगीचा हा फास्टर फेणे पुण्यात येतो आणि बघता बघता भारतभर जातो. तो कधी हेर होतो, कधी योद्धा, कधी सवंगडय़ांचा निखळ मित्र; कधी अगदी कोवळा मुलगाही. ‘नेफा आघाडीवर फास्टर फेणे’ या नितांतसुंदर कथेत हा पठ्ठय़ा जमशेदपूरची शैक्षणिक सहल सोडून कलकत्त्याकडे पळ काढतो. तिथे हुशारीने विमानात सामानाच्या खोक्यांमध्ये लपून बसतो आणि युद्धभूमीवर पॅरेशूटने उतरतो. तिथे एक भारतीय सैनिक जेव्हा त्याला हेरतो तेव्हा हा शूरवीर मुलगा काय करतो हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्या धाडसी स्वभावामुळे बनेश समस्त कुमार जगताचा लाडका सुपरहिरो आजही आहे आणि हा फास्टर फेणे जसा शब्दात आहे तसा तंतोतंत उभा केला तो राम वाईरकरांच्या अफलातून चित्रांनी. एक किशोरवयाचा हडकुळा, चपळ व अवखळ पोरगा. पण, त्याचबरोबर हुशार, चलाख व तरबेजही!
मुख्यत्वेकरून फास्टर फेणे मराठी मुलांसाठी लिहिलेला असला तरी त्यात भागवतांनी हलके फुलके इंग्लिश शब्द चपखलपणे पेरलेले आहेत. त्यामुले आजही ही पुस्तकं कालबाह्य वाटत नाहीत. शिवाय सगळ्या गोष्टी अक्षरशः खिळवून ठेवणाऱ्या आहेत. या फास्टर फेणेच्या मालिकेत फक्त फास्टर फेणेच नव्हे तर आणखी काही पात्र अजरामर झाली. विद्याभवनातील सर्व मुलांचे लाडके सुर्वे सर. त्याचप्रमाणे बन्याचा जीवलग मित्र सुभाष देसाई, चकोर देशमुख, जनू जोशी इत्यादी पात्रांचा या मालिकेत खास प्रभाव पडलेला आहे व फास्टर फेणेच्या काही धाडसी प्रवासामध्ये किंवा सहलीमध्ये यापैकी अनेकांनी बनेश फेणेला उत्तम साथ दिलेली आहे.
विशेषकरून प्रतापगडावर फास्टर फेणे व जंगलपटात फास्टर फेणे हे या मालिकेतील सर्वात लोकप्रिय खंड होत. पण, त्याचबरोबर फुरसुंगीचा फास्टर फेणे व विमानचोर विरुद्ध फास्टर फेणे हेही तेवढेच गाजलेले खंड आहेत. पण, आपण कुठल्याही प्रकारे या खंडांची आपापसात तुलना करू शकत नाही. कारण, प्रत्येक खंड वाचकांवर एक वेगळी छाप सोडून जातो. आजही या सर्व २० खंडांची लोकप्रियता होती तशीच टिकून आहे. एकुणात काय तर फास्टर फेणेचा प्रभाव फार जबरदस्त होता… इतका, की त्याची बरीच पुस्तके अनेक वर्षे ‘Out of Print’ होती.
फास्टर फेणे ही कथामाला १९८८ साली दूरदर्शनवर १३ भागांतून प्रसारीत करण्यात आली. १९५४ साली “चंद्रावर स्वारी” या भागवतांच्या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पहिला शिरोळे पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९७५ साली आयोजित पहिल्या “बालकुमार साहित्य संमेलना”चे अध्यक्ष होण्याचा बहुमान भास्कर भागवत यांना मिळाला होता. अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या गौरव पुरस्काराचे भागवत मानकरी असून, त्यांची बालवाड्:मयाची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बाल-कुमारांसाठीच्या बालमित्र या पाक्षिकाचे भागवत संस्थापक होते. हा अंक त्यांनी जवळजवळ सात वर्षे काढला. त्यातले बहुतेकसे लेखन भागवत एकटाकी करत. त्यासाठी ते विविध टोपणनावे वापरत असत. हा अंक हौशीपोटी चालवताना त्यांना त्या काळात हजारो रुपयांचे कर्ज झाले होते.
खरंच आम्ही नशिबवान आहोत की आमच्या बालपणी फ़ास्टर फ़ेणे होता, तो आम्ही वाचलाय आणि जगलोय सुद्धा. आजही भागवतांचा फ़ास्टर फ़ेणे वाचताना आम्ही लहान होऊन जातो.त्याला पुनः एकदा उजाळा दिल्याबद्दल,आमचे बालपण हे आजच्यासारखे प्रौढ न होऊ देता फ़ास्टर फ़ेणेच्या माध्यमातून बालपणच ठेवल्याबद्दल भागवतांना मनापासून धन्यवाद
सौ.मनिषा राजन कडव
लहानपणीची आठवण फास्टर फेणे ..!
ReplyDelete