ब्र

ब्र  


अलिकडे  वाचलेली  कविता महाजन यांची " ब्र  ही कादंबरी नायिका प्रफुल्ला हीच्या  एका संशोधन विषयावर आहे. 'आदिवासी पाड्यातील राजकारणात सक्रिय असलेल्या महिला आणि त्यांच्यावर होणारा अन्याय' तसेच 'महिला सरपंचावर येणारे अविश्वास ठराव ' हे नायिकेच्या  संशोधनाचे विषय आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा शहरी भागातच अजूनही इतका घट्ट आहे, तर आदिवासी भागातील कल्पनाच केलेली बरी! तिथे पुरुष स्वतःच्या स्वार्थासाठी महिलांना निवडणूक लढवायला लावतात.  मात्र त्यांना कामकाजात सहभागी करून घेत नाहीत. तेथे एखादी महिला सरपंच झाली आणि ती गावातील कामकाजात लक्ष घालू लागली किंवा काही अनिष्ट  गोष्टीत हस्तक्षेप करू लागली तर लगेच तिच्यावर अविश्वास ठराव येत असे. जर एखाद्या ठिकाणी पुरुष सरपंच असेल तर तेथे ग्रामसभा घेतली जात नसे. एखाद्या महिला सदस्याने ग्रामसभा घेण्यासाठी त्याच्यावर दबाव आणला. तर  त्या महिलेला या ना त्या कारणाने त्रास दिला जाई. आणि त्यातून तिला बेदखल केले जाई. किंवा आणखी एक दुसरा मार्ग म्हणजे गावातील मांत्रिकाच्या साह्याने तिला प्रचंड त्रास दिला जाई. कधी कधी आणि वाळीत टाकले जाई.  तिच्यावर घाणेरडे आरोप केले जात. अनेक हृदय हेलावणाऱ्या घटना यात सांगितलेल्या आहेत. त्यातलीच एक घटना म्हणजे राजकारणात धाडसाने बोलणाऱ्या स्त्रीचा तिच्या नवऱ्याने तोडलेला हात! आश्चर्य म्हणजे  हे कृत्य त्याने मांत्रिकाच्या मदतीने केलेले असते. अशा अनेक घटना या कादंबरीत सांगितलेल्या आहेत.
आदिवासी पाड्याबरोबरच स्वतःवर झालेले अन्याय- अत्याचार सुद्धा नयिकेने यात मांडलेले आहेत. नायिका सुशिक्षित आहे. ती बाहेर समाजासाठी, समाजातील स्त्रियांसाठी झटते आहे. त्यांना न्याय मिळावा म्हणून धडपडते आहे. परंतु तिला तिच्या घरी तिच्या नवऱ्याची खूप दहशत आहे. नवरा तिला मारझोड करतो. आणि ती दहशत एवढी आहे की तिचा घटस्फोट झाल्यानंतर सुद्धा नवऱ्याचे नाव घेताच ती थरथरायला लागते. ग्रामीण भागातल्या आदिवासी पाड्यातल्या स्त्रीयांबरोबरच शहरी स्त्रियांचे दुःख यात हिरीरीने मांडलेले आहे. 
आजची सत्य परिस्थिती मांडायची झाली तर दुर्दैवाने असे म्हणावे वाटते की स्त्रियांचा बाह्य वेश बदललेला आहे. परंतु आतील अगतिकता तशीच आहे. त्यामुळे आजही त्यांना समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध ब्र उच्चारणे धाडसाचे वाटते. किंचितसा बदल झाला, अगदीच नाही असे नाही, परंतु तो वर म्हटल्याप्रमाणे स्त्रीच्या बाह्य रूपात झाला! ...आणि हेच या कादंबरीत लेखिकेने मांडलेले आहे.
या कादंबरीत या सर्व गोष्टींबरोबर आदिवासी पाड्यातील काही गमतीजमती सुद्धा सांगितलेल्या आहेत. संशोधन करत असताना  जेथे गाडी जाणे शक्य नसते, तेथे   नायिका मैलोनमैल पायी चालत जाते. एकदा ती अशीच एका पाड्यावर गेली असता तिची कमर खूप दुखू लागते. ... त्या वेळेला तिला तिची पाळी येणार असते. ज्या झोपडीवजा घरात ती राहिलेली असते,  तेथील बाईला ती तसे  सांगते. त्यावेळी ती बाई म्हणाते की उद्या सकाळपर्यंत तुझे कमरेचे दुखणे  राहून जाईल. नायिका तशीच झोपून जाते.  संध्याकाळी घर मालकीण तिला जेवायला उठवते.  इच्छा नसताना ती थोडासा भात आणि कसलासा रस्सा खाते. सकाळी उठल्यानंतर ती बाई विचारते कमर दुखी कशी आहे?  तर नायिका  सांगते की कमी आहे. त्यावर ती बाई म्हणते की  तरी छोटाच मिळाला मोठा नाही मिळाला. काय असे विचारल्यानंतर ती म्हणते काल तुला मी भाताबरोबर बेडकाच्या पायाचा रस्सा दिला होता. त्यामुळे कमर दुखी लगेच थांबते. नायिकेला काय करावे तेच सुचत नाही. त्यानंतर आणखी एक अनुभव सांगितलेला आहे. असेच एका एका पाड्यावर गेल्यानंतर, तिथे जेवण झाल्यानंतर त्या बाईने विचारले, आवडले का तुला जेवण?  नायिकेने सांगितले की हो आवडले आणि त्यातील ती आंबट खारट चटणी खूप आवडली. त्यावेळी त्या बाईने सांगितले की ती वाळवलेल्या लाल मुंग्यांची चटणी होती. नायिकेची बोलतीच बंद झाली. ...आणि त्याबरोबरच तिने सांगितले की पावसाळ्यात येथे मीठ जगत नाही त्यामुळे आम्ही या मुंग्या उन्हाळ्यात वाळवून ठेवतो आणि याचा नंतर मिठा प्रमाणे वापर करतो.  
  तर असे हे पुस्तक स्त्री-पुरुष सर्वांनी वाचावे असे आहे.


सौ.मनिषा राजन कडव.

Comments

  1. ब्र कादंबरीची छान ओळख करवून दिलीत. 💐💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.