आगीशीखेळताना -भारतीय लेखिका :हिंदीअनुवाद:कविता महाजन .
#आगीशीखेळताना -भारतीय लेखिका :हिंदी
अनुवाद:कविता महाजन .
'आगीशी खेळताना' हे पुस्तक म्हणजे सात स्त्री कार्यकर्त्यांचा सहप्रवास आहे. हे पुस्तक सीतापुर जिल्ह्यातील ग्रामीण स्त्रियांना समर्पित केले आहे. ह्या सगळ्यांच्या सोबतीमुळे अनुपमलता, रामशीला, रेश्मा अन्सारी, ऋचा सिंह,ऋचा नागर, विभा बाजपेयी,शशीबाला शशी वैश्य आणि सुरबाला अशा या नऊ लेखिकांनी मिळून या पुस्तकाचे लेखन केले आहे. ह्या पुस्तकाचा अनुवाद कविता महाजन यांनी केला आहे.
मुळात ९ स्त्रियांनी मिळवून दिलेलं एक पुस्तक या कल्पनेतच नवखे काही होते आणि त्यांनी हे कसं साधलं असेल याची उत्सुकता लेखिकेला सुरुवातीलाच असल्यामुळे अतिशय मुद्देसूद पणे याचा अनुवाद मांडला गेला आहे. या पुस्तकात समाविष्ट केलेल्या लेखनाचा आधार म्हणून मांडणीचा प्रकार जसाच्या तसा वापरला आहे. त्यापैकी सात व्यक्तीमत्वांची भाषेची काही समान वैशिष्ट्य आहेत.ती बोली भाषा आहे. अनलंकृत आहे. साध्या व अगदी मोजक्या शब्दांनी व लहान लहान वाक्यांनी बनलेली आहे. अनुवादित लेखिकेने म्हणजे कविता महाजन यांनी त्यातले तीन मुद्दे घेऊन एक एक परिच्छेद असे लेखन करून पाहिले आणि त्यानंतर हे क्षण त्यांना पोटात घुसून आतडी बाहेर काढणारे अनुभव वाटले.
या सातही जणींच्या डायर्या घरच्या लोकांच्या खास करून नवऱ्याच्या हाती पडल्यानंतर आलेले अनुभवही लेखिकांनी सांगितले आहेत. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर पुस्तकात जरी लेखिकांची नावे बदललेली असली तरी परिचितांना ती ओळखून घेऊन घरात संस्थेत व गावात जो काही धुरळा उडाला तो विलक्षण होता. त्यानंतर जे काही घडलं त्याबाबत या पुस्तकानंतर अजून एक पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झालं. जमल्यास तेही अनुवादित करावे अशी कविता महाजन यांची इच्छा होती.
स्त्रियांच्या सबलीकरणाचे अतिशय सुंदर असे धडे या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. हे पुस्तक स्त्री अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि स्वयंसेवी संस्थांशी संबंधी सर्व लोकांसाठी उपयुक्त आणि वैचारिक आव्हान देणारं ठरेल अशी या लेखक समूहाला आशा आहे. सात बायका सात आयुष्य अनेकविध आकांक्षा संसार स्वप्न आणि संघर्ष यांच्या आयुष्याचे धागे कधी एकमेकांत गुंफत असतात तर कधी विलग होऊन निघून जातात असाच काहीसा प्रवास आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतो.
गरीमाच्या डायरीत एक किस्सा सापडतो, "नेहमीच लोक सांगतात मुलांना चोरी करण्याची सवय लागू देऊ नका. मी लहानपणी किती वेळा खोटं बोलले आहे कितीदा चोऱ्या केल्या आहेत. तरीही मला चोरी करण्याची सवय लागली नाही आज काल तर मला असं वाटतं की इतरांच्या चांगल्यासाठी खोटं बोललं तर ते खोटं नसतंच उलट ते खरे ठरते कारण दलित कुटुंबात मोठं होऊन जगताना पावलोपावली संकटे तर आलीच त्या संकटातून मुक्तता मिळवताना पदोपदी खोटं बोलावं लागलं."
मधुलीकाच्या डायरीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आढळल्या.नोकरी करणं हे मधुलीकाचं स्वप्न होतं. तिच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती.त्यांना सासरी फार जाच व्हायचा.दोन-चार वर्षातून एक धड कपडा मिळणे देखील त्यांना दुरापास्त होतं.मधुलीकाला वाटायचे की आपले वडील शिक्षक आहेत तरीही त्यांनी मुलींची लग्न अशी का केली असतील. मग मधुलीका मनोमनी प्रार्थना करायची. तिचं लग्न ज्याच्याशी होईल त्याच्याकडे पुष्कळ पैसा असावा. ती त्याच्यासोबत शहरात राहील आणि माहेरी कधीही एकटी येणार नाही.मधुलीकाचा नवरा दहा-बारा वर्षं तिच्या पेक्षा मोठा होता. तिच्या वहिनीसाठी ज्याप्रमाणे पुष्कळ खरेदी झाली होती तसं तिच्या सासरहून काहीच मिळाले नाही आणि हा तिच्या वडिलांचा अपमान होता.असे वडिलांना वाटले म्हणून मधुलीकाच्या लग्नाच्या आधी कडाक्याचं भांडण झालं. बदनामी टाळण्यासाठी तिचं लग्न लावून देण्यात आलं आणि वरात तिला घेऊन गेली. मधुलीकाच्या सासरी तिला सगळं काम करावे लागले अगदी शेतापासून सासू-सासरे आणि तरीही वरून टोमणेही ऐकावे लागले पण यापैकी तिने माहेरी काहीही सांगितलं काही सांगितलं नाही.लग्नानंतरचा तिचा प्रवास खूपच खडतर होता.
पल्लवी म्हणते की तिचे सासरे म्हणत "जर सुनेनं नोकरी केली तर मी फास लावून घेईन." या अशा विचारांचे तिचे सासरे असतानाही तिने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिचा नवराही या साठीच नाराज होता. मुलं मोठी झाली. तिला जे करायचं होतं ते तिने केलं. आपल्या मुलांना मोठं करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी माहेराहून तिने आपल्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च घेतला पण तिच्या घरच्यांना सदैव प्रतिष्ठेची चिंता लागलेली असायची या अशा मध्ये तिचं जगणं खूप कठीण होतं.
राधा, पल्लवी, मधुलिका, गरिमा, चांदणी, शिखा आणि संध्या ह्या सात स्त्रिया म्हणजे डायरी लेखिका.मूळ लेखिकांची नावे बदलून या पुस्तकांमध्ये वरील नावाच्या स्त्रियांच्या आयुष्यात आलेल्या अडचणी आपल्या समोर मांडल्या गेल्या आहेत. ह्या सगळ्या जणींना धार्मिक स्पृश्यास्पृश्यतेला देखील समोर जावे लागले.ह्या सगळ्या जणींनी अतिशय वाईट अशी आर्थिक स्थिती पार पाडली.
काम आणि पैशांचे मुद्दे गुंतागुंतीचे असले तरी कुटुंबासाठी त्यांनी घाम गाळला. रूढी आणि बंधनातूनही त्या मुक्त नव्हत्या. "लग्न झालेल्या बाई ने दुसऱ्या पुरुषाशी बोलू नये" लोकांमधील असा समज त्यांनी दूर केला. 'संगतीन' या संस्थेतून या सातही जणांनी आपली स्वप्ने पूर्ण केली.पुढे अनेक मुद्दयावर खोल चर्चा करताना यांचा सहभाग वाढू लागला. अनेक राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लोक या सातही जणींना सहभागी करू लागले.
आगीशी खेळताना या पुस्तकाचे लेखन सात निवेदिका यांनी दोन लेखिकेसोबत केले असले तरीही हे त्या नऊ जणींचे पुस्तक आहे असे वाटते. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेली ही एक सामूहिक कृती आहे. दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, इस्त्राईल, तुर्कस्थान या देशाचे संघर्ष सुरू होते त्या लढ्यात या पुस्तकाला जोडले गेले आहे. या पुस्तकाचा तुर्की अनुवाद २०११ मध्ये आंकरा येथील प्रकाशक आयिजी किताब यांनी केला. याचा इंग्लिश अनुवाद करताना या संघटनेला 'नारी क्षमता योजना' असे काल्पनिक नाव दिले गेले. एकंदरीत एखादी स्त्री-संस्था निर्माण होताना तिला एनजीओचे स्वरूप येताना स्त्रिया एकमेकींना कशा जोडल्या जातात आणि त्यातून एक सुंदर अशी वाटचाल दिसू लागते याचे अतिशय दुर्लभ असे चित्र या पुस्तकात दिसते.
अनुवादक कविता महाजन यांनी या पुस्तकाचे मराठीत अनुवाद करून मराठी साहित्यात एक सुंदर प्रतिकृती सादर केली याबद्दल लेखिकेचे कौतुक करावे तितके कमीच! वाचनीय असे पुस्तक प्रत्येक स्त्रीने वाचावे इतकीच इच्छा! पुस्तकाची मांडणी इतर पुस्तकांपेक्षा खूप वेगळी भासली. सातही लेखिकांनी अनुभव जसे सांगितले तसे एका खालोखाल मांडले गेले आहेत. खरेतर प्रत्येक निवेदिकेचे अनुभव वेगळ्या धड्यात मांडता आले असते पण एकच प्रकारची घटना प्रत्येकीने कशी वेगळी अनुभवली त्याचा सारांश डायरीत लिहिल्याप्रमाणे या पुस्तकात जसाच्या तसा मांडला गेला आहे आहे. हेच या पुस्तकाचे वेगळेपण आहे!
सौ.मनिषा राजन कडव.
सुंदर
ReplyDelete