सिल्व्हर स्टार' -
‘सिल्व्हर स्टार' -
सॅम उर्फ सॅम्युअल एडवर्ड. आई-वडिलांविना असलेला, मायेचे नातेवाईकही नसलेला जेमतेम अडीच-तीन वर्षांचा मुलगा. त्याचा बाप ब्रिटीश नौसेनेतील अधिकारी असतो. त्याच्या बायकोचा ठावठिकाणा तो कुणाला सांगत नाही आणि एक दिवस अचानक ‘वर्षभराने मुलाला न्यायला येईन’ असे त्याला सांभाळणार्या बाईंना सांगून, त्यांना थोडे पैसे देऊन भारतातील एका मोहीमेवर आपली बदली करून घेऊन निघून जातो. परतून येत नाही. त्या बाईंच्या टॉयफॉईडने झालेल्या अचानक मृत्यूनंतर तिचा नवरा पुढच्या सांभाळासाठी सॅमला एखाद्या गलबतावर नेण्याचं ठरवतो. गलबतावरच का? एकतर नौसेनेतल्या अधिकारी बापाचं रक्त असलेला सॅम आणि दुसरं म्हणजे, भविष्यकाळात जर त्या गलबताच्या प्रवासात सॅमचं भारतात जाणं घडलं तर तिथे असलेल्या बापाशी त्याची भेट होण्याची शक्यता! इतक्या लहान मुलाला सांभाळण्यासाठी दोन-तीन जहाजांच्या कप्तानांकडून नकार वाट्याला येतो. ‘सिल्व्हर स्टार' ह्या नौकेचा कप्तान मात्र ‘मोठ्या मोठ्या काळ्या डोळ्यांनी सगळीकडे बघणारा आणि पहिल्याच नजरभेटीत त्याच्याकडे बघून तोंडभर हसणारा’ हा मुलगा ठेवून घेण्यास तयार होतो. अशा रितीने, सतत पाण्यात विहरणारी शिडाची होडी हेच सॅमचं घर बनतं. तिथला कप्तान - खलाशी त्याचे पालक होतात. त्यातही काही खलाशी त्याला पोटच्या पोराच्या मायेने जपतात.
तेव्हाच्या त्या सॅमला आजचा सॅम्युअल एडवर्ड आठवणींच्या कोषातून वर आणतो. मधल्या ३५ वर्षांतील कित्येक आठवणी धूसर झालेल्या असल्या तरी, त्यापूर्वीच्या उमलत्या वयातील जे क्षण आसुसून, मन:पूत जगले गेले त्यातील बारकाव्यांसकट कितीतरी गोष्टी त्याला आठवतात.
निव्वळ आठवणींना उजाळा देण्याने खरंच काही साध्य होतं का? आणि साध्य होत असेल तर ते काय?
आयुष्यभर खलाशी म्हणून जी मिळेल ती जबाबदारी पार पाडत होडीवरच जगत रहावं लागणार की जमिनीवर राहून दुसरं काही करता येणार अशी आशंका मनात निर्माण होण्यापूर्वीच सॅमच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं आणि केवळ त्यामुळेच, जे स्वप्न उराशी बाळगत तो जगत होता ते पूर्ण होऊ शकतं. काय असतं त्याचं स्वप्न?
स्वप्नपूर्तीचं समाधान आणि त्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांच्याविषयीची कृतज्ञता बाळगून सांगितलेलं हे आठवणरूपी मनोगत म्हणजे माधुरी पुरंदरे यांची कादंबरी ‘सिल्व्हर स्टार'!
आयुष्यभर माणसाला कुणाची सोबत असते? बालपण सरतं, जगण्यात भली-बुरी वळणं येत राहतात. त्या प्रत्येक वळणाला आधीचं सुटत जातं, नव्हे ते सोडावंच लागतं. पण, मागे पडलेलं बालपण ही एकमेव गोष्ट अशी असते की जन्मभर ती त्याची सोबत करते. सफलतेचं अत्त्युच्च शिखर गाठलं तरी वा नाही तरी, प्रत्येक माणूस त्याच्या बालपणीच्या सोबतीनेच कळत-नकळत सर्वाधिक जगत असतो.
सॅमचंही तसंच होतं. त्या काळात त्याच्या अंतर्मनात काही स्वप्नं रुजतात आणि त्यांच्या पूर्ततेची आस त्याला लागून राहते. कुटुंब म्हणजे काय याचा पत्ताही नसलेले बहुतेक खलाशी! जहाजावरील पहिल्या भेटीतच लहानग्या सॅमला आपलंसं करणार्या ‘बुढ्ढे कंपनी’तील ‘थोटा मॉरीस’, ‘तिरळा पावलो’ आणि ‘पापा मारीओ’ त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात.
तोही त्यांच्या म्हातारपणात त्यांना आपल्या घरी मानाने घेऊन जातो. त्याच्याच वयाचा, दुसर्या जहाजावरील छळाला कंटाळून पळून आलेला ‘मुका किड’ तर त्याच्या जगण्याचा एक भागच बनून राहतो. आणि लायनेल, सदैव आपल्या दुरावलेल्या भारताच्या गोव्यातील आठवणींत बुडून राहिलेला व नंतरच्या धाडसी मोहीमेत मृत्यू पावलेला, त्याच्या मनात अढळ स्थानावर राहतो.
जहाजावरच जगण्याची सुरूवात झालेल्या मुलाच्या नजरेला जहाजावरील, सतत अस्थिरतेच्या छायेखाली असणारं खलाशांचं आयुष्य कसं दिसलं आणि त्यातून तो कसा घडत गेला त्याचं कथन ह्या कादंबरीत आहे. आठ शिडांची आणि तीन डोलखांबांची, लहानश्या चणीची, माफक सजावटीची पण इतर बटबटीत नौकांमधे आपल्या साधेपणाने उठून दिसणारी व्यापारी नौका ‘सिल्व्हर स्टार'!
जमिनीवर सहसा न मिळणारे पण जहाजावरच्या साहसी जगण्यातील अनुभवाला येणारे थरार आणि सततचं अनिश्चिततेचं सावट अनुभवत मोठा झालेला सॅम्युअल एडवर्ड म्हणतो, "अंधार पडायला लागल्यानंतर किनार्यापासून थोड्या अंतरावर उभ्या असणार्या गलबतांचे एकामागून एक उजळत जाणारे दिवे आणि खालच्या काळ्या-निळ्या पाण्यात उठणार्या लाटांवर नाचायला लागणारी त्यांची प्रतिबिंबे. यातून आकाशातील नक्षत्रं खाली उतरल्याचा भास होतो. मला आठवतंय तेव्हापासून मी हे दृश्य बघत आलो आहे आणि आजही ते मला तितकंच भारून टाकतं."
काळाच्या रेट्यात ‘सिल्व्हर स्टार' ह्या नौकेचं स्वरूप व्यापारी नौका ते चाचेगिरी करणारी नौका असं बदलत जातं. कॅप्टन बदलला की तिचं विधिलिखितही बदलणार हे नौकांच्या बाबतीतलं अटळ सत्य! कॅप्टन ठरवेल तो व्यवसाय आणि तो जिथे नेईल तो मार्ग. त्या नौकेची देखभाल करणार्या, वर्षानुवर्षं तिथे काम करणार्या खलाशांचंही कॅप्टन ठरवेल तेच भागधेय. नवीन कॅप्टनशी ‘जुळवून घेता आलं तर रहा नाहीतर तिथून बाहेर पडा’ हा थेट नियम.
अशावेळी माणूस म्हणून जगताना कॅप्टनसकट सगळ्यांनाच कराव्या लागणाऱ्या तडजोडी, सोसावे लागणारे शारीरिक कष्ट, मानहानी हे सगळं वाचताना खिळवून ठेवतं आणि एकीकडे त्यांच्याविषयी मनात अनुकंपा निर्माण होत राहते.
चाचेगिरीत अडकल्याने एकेक करत जुने साथीदार मरण पावतात. शेवटी उरलेल्या मोजक्या दहा-बारा जणांना नाईलाजाने ढकलल्या गेलेल्या ह्या चाचेगिरीतून बाहेर पडण्याची संधी मिळते पण त्यांच्या लाडक्या ‘सिल्व्हर स्टार' ला मात्र कायमचा निरोप द्यावा लागतो. त्या प्रसंगाविषयी सॅम्युअल एडवर्ड म्हणतो, "एखाद्याचं गाव सुटलं तरी त्याला तिकडे परत जाण्याचं स्वप्न तरी पाहता येतं. पण माझं हे गाव माझ्या डोळ्यांदेखत नाहीसं होत होतं. परत जाण्यासाठी काही उरलंच नव्हतं."
नवीन आयुष्य, नवीन जहाज, नवीन मालक, नवीन कॅप्टन ह्यांच्या साथीने सगळ्यांचं आयुष्य सुरळीतपणे सुरु होतं.
कादंबरी वाचून पूर्ण होते आणि एखादा थरारपट बघितल्याच्या मनोवस्थेत असताना, शेवटचा भाग पुढ्यात येतो, `चाचे आणि त्यांची चाचेगिरी'. चाचे ह्या शब्दाचे उगमस्थान, चाच्यांच्या समुद्रमार्गाचा नकाशा, चाच्यांचा हल्ला झाल्यावरची कृष्ण-धवल रंगातील छायाचित्रे, चाच्यांचे झेंडे, अशी ऐतिहासिक माहिती तसेच ह्या विषयावरील प्रसिध्द चित्रपटांची माहिती सविस्तर वाचायला मिळते.
माधुरी पुरंदरे ह्या एकाच व्यक्तीत एकापेक्षा जास्त कलांचा वास असणे म्हणजे काय ते ह्या पुस्तकातील रेखाटनांवरून आणि चित्रमयी वर्णनांवरून स्पष्ट होते. ब्रशच्या फटकर्यातून साकारलेली, मुखपृष्ठावरील रंगीत आणि आतील पानावरील कृष्ण-धवल ‘सिल्व्हर स्टार' तसेच सॅम, कॅप्टन्स आणि इतर खलाशी ह्यांची रेखाचित्रे आणि मोजक्या वर्णनातून साकारलेली शब्दचित्रे बघून-वाचून चलत् चित्रपट डोळ्यांपुढे साकारतो. सॅम उर्फ सॅम्युअल एडवर्डप्रमाणे आपणही ‘सिल्व्हर स्टार’ च्या प्रेमात पडतो.
जगण्यातली अनिश्चितता, अनपेक्षितता, तरीही असणारी एक परिस्थितिबद्ध अवस्था आणि मानवी संबंधांचा एक अफाट पट यांचे दर्शन ही कादंबरी घडवते! या अर्थाने आपल्याच जगण्याबाबत आपण सजग होतो, समजुतदार होतो !
सौ.मनिषा राजन कडव.
काहीतरी नवीन माहिती मिळाली ...
ReplyDelete