लालबाग- परळ- गिरणी कामगारांचा संघर्ष (सिनेमा)
लालबाग- परळ- गिरणी कामगारांचा संघर्ष
निर्माता-लेखक-अभिनेता-दिग्ददर्शक अशा अनेक भूमिका पार पाडणारा महेश मांजरेकर मराठीत एकापेक्षा एक चांगले चित्रपट आणलेत त्याबद्दल त्याचे अभिनंदन करावे लागेल. शिक्षणाच्या समस्येवर आधारित शिक्षणाच्या आयचा घो नंतर महेश लालबाग-परळ झाली मुंबई सोन्याची हा गिरणी कामगारांच्या समस्येवरील चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर आला .
या चित्रपटाची कथा , अण्णा (शशांक शेंडे) मिल कामगार असतात. घरात खाणारी सहा तोंडे, मिलमधील विभाग बंद झाल्याने नोकरी नाही. मिल मालकाने वीआरएस घेतल्यानंतरही पैसे देण्यास केलेली टाळाटाळ त्यामुळे दोन वेळच्या जेवणाचीही समस्या. मोठा मुलगा मोहन (विनीत कुमार) एका पतपेढीत दुकानांमध्ये जाऊन पैसे गोळा करण्याचे काम करीत असतो. मधला मुलगा बाबा (अंकुश चौधरी) याला लेखनाची आवड असते. छोटा मुलगा नरू (करण पटेल) भाईगिरी करण्यात दिवस घालवत असतो तर छोटी बहीण मंजू (वीणा जमकर) एका ब्युटी पार्लरमध्ये काम करून घरखर्चाला मदत करीत असते. आई (सीमा विश्वास) कशी तरी सगळ्यांच्या पोटापाण्याची सोय करीत असते. या कुटुंबाच्या माध्यमातून महेशने गिरणी कामगारांच्या संपाची तीव्रता पडद्यावर भेदकपणे मांडलेली आहे.
शेंडे परिवारातील या सगळ्यांच्या भूमिका खूपच उत्कृष्ट झालेल्या आहेत. सीमा विश्वासने छोट्याश्या भूमिकेतही असहाय गिरणी कामगाराची पत्नी उत्कृष्टरीत्या साकार केली आहे. करन ने नारूची आणि अंकुश चौधरी ने बाबाची भूमिकाही चांगल्या पद्धतीने साकारली आहे.
अन्य कलाकारांमध्ये सिद्धार्थ जाधवने स्पीडब्रेकरच्या भूमिकेत जान ओतली आहे. त्याची देहबोली, त्याचा अभिनय एका गिरणी कामगाराच्या मुलाचे योग्य रूप पडद्यावर उतरवतो. सचिन खेडेकरने गिरणी कामगारांचा नेता राणे याची, गणेश यादवने परशा भाईची तर समीर धर्माधिकारीने कावेबाज आणि लालची मिल मालकाची भूमिका चांगल्या पद्धतीने वठवली आहे. विनय आपटेही छोट्या भूमिकेत प्रभाव पाडतात. यांच्याबरोबरच खरोखरच्या गिरणी कामगारांच्या मुलांनाही महेशने चांगले वापरून घेतले आहे. सतीश कौशिक यांनी मामा आणि कश्मीरा शहाने मामीची भूमिका साकारली आहे.
एका वेळच्या अन्नाची ददात असल्याने गिरणी कामगारांची मुले कशी देशोधडीला लागतात, गिरणी मालकांची अरेरावी आणि घर खर्च चालवण्यासाठी शरीर विक्रय करण्यास गिरणी कामगाराची मुलगी कशी तयार होते ते विदारकपणे दाखवले आहे. चित्रपटाचा बाज चकचकीत न ठेवता ग्रे ठेवला असल्याने तीव्रता अंगावर येते. खरे तर मुंबईचे वातावरण प्रदूषित असल्याने कॅमेर्यात चकचकीतपणा दिसत नाही परंतु काही दिग्दर्शक दाखवतात. महेशने हे टाळले आहे. गिरणी कामगारांच्या खडतर जीवनातील प्रेमप्रसंगही मोजक्याच दृश्यात महेशने दाखवले आहेत. परंतु काही ठिकाणी दृश्ये उगाचच ताणली आहेत असे वाटते. अर्थात ती दृश्ये अंगावर यावीत म्हणून महेशने असे केले असावे. एका दृश्यात सचिन खेडेकर एखाद्या वेड्याप्रमाणे भात खाताना दाखवला आहे. तेव्हा वाटते की हा आता वेडा झाला असावा परंतु दुसर्याच दृश्यात तो गिरणी कामगारांसमोर उत्कृष्ट भाषण देताना दिसतो. काही उणीवा सोडल्या तर गिरणी कामगारांचा हा जीवनपट सुंदरच आहे. जयंत पवार यांच्या कथेतच प्राण आहे आणि महेशने चित्रपटही तितक्याच ताकदीने मांडला आहे.
गुणदोष काही असोत, एका गोष्टीचं श्रेय मात्र लालबाग परळला द्यायला हवं, ते म्हणजे सामाजिक भान दाखवणं. आपला मराठी सिनेमा, हा सामाजिक विचारांपासून कायमच लांब होता. आजही आहे. पूर्वीच्या काळी तमाशा आणि विनोदाने त्याला घेरलं होतं, आज तसं नाही. पण आजचा सिनेमा हा सिनेमाची भाषा अधिक जाणणारा अन् संवेदनशील असला, तरी बराचसा पर्सनल आहे. आजच्या उत्तम सिनेमालाही अंतर्मनाची जी जाण आहे, ती भेदक सामाजिक वास्तवाची नाही. लालबाग परळ आपल्या व्यावसायिक कोषात राहूनही एका महत्त्वाच्या सामाजिक अंगाला प्रेक्षकांपुढे आणण्याचा प्रयत्न करतो. त्याची ही बाजू आपण विसरू शकत नाही. शेवटी शुगर कोटेड पिलचेही फायदे असतातंच.
अखेर मी एकच म्हणेन, की अनेक चित्रपट केवळ रंजक, करमणूकप्रधान असण्यातच धन्यता मानत असताना अवघड, समाजोपयोगी विषय चित्रपटातून मांडणं हे महत्त्वाचं निश्चितच आहे, पण ते पुरेसं नाही. चित्रकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं, की ते जेवढा महत्त्वाकांक्षी, कठीण विषय चित्रपटासाठी निवडतात, तेवढी तो शक्य तितक्या प्रामाणिकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची जबाबदारी वाढते. चित्रपट हे अप्रत्यक्षपणे सामाजिक प्रबोधनाचं काम करीत असतात, आणि ते काम अशाच चित्रपटांच्या माध्यमातून पुढे जाणारं असतं. त्यासाठी लागणारा प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव लालबाग परळमध्ये अधिक प्रमाणात दिसती, तर हा प्रयत्न कितीतरी अधिक यशस्वी मानता आला.
सौ.मनिषा राजन कडव.
छान लिहिले.💐💐
ReplyDelete