राऊ(कादंबरी)

• राऊ •

                      छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्यानंतर मराठी साम्राज्याचा विस्तार खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर तो पहिल्या बाजीराव पेशव्यांनी . चाळीस वर्षांच्या अल्पायुषात त्यांनी छत्तीस पेक्षा अधिक लढता जिंकून  अजिंक्यपद प्राप्त केलं . छत्रपती शिवरायांच्या दिल्लीला पाणी चाखवण्याचं उराशी बाळगलेलं स्वप्नसुद्धा बाजीरावांनी साकार केलं . पहिल्या बाजीरावाच्या अखत्यारीत मराठी दौलतीने कधी मावळतीचा सूर्य पाहिला नाही . नर्मदे पासून उत्तरेला दिल्लीची कडा सुद्धा त्यांनी मराठी साम्राज्याला जोडली . बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठी साम्राज्याला उतरती कळा लागली . बाजीरावांइतकं सामर्थ्य कोणत्याही पेशव्याच्या ठायी लाभलं नाही . पेशवाईतील अनेक पेशवे अल्पायुषी ठरले . मात्र कर्तबहीन पेशव्यांना दीर्घ आयुष्य लाभलं . बाजीराव हे पेशवाईतील सर्वात कर्तबगार पुरुष . छत्रपतींचा वसा घेत त्यांनी मराठी साम्राज्याची सीमा विस्तारली . पण दुर्दैव म्हणजे भारतीय समाजाने ह्या वीर पुरुषाच्या शौर्यापेक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनाला च अधिक पसंती दिली . बाजीराव पेशव्यांच्या पराक्रम गाथेपेक्षा , मस्तानी सोबतच्या प्रेम कहाणीलाच अधिक लोकप्रियता मिळाली . प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या  वेळी सुद्धा बाजीराव - मस्तानी हे नाव अवश्य घेतलं जात .

                             बाजीराव मस्तानीची ही प्रेमकहाणी म्हणजे ' राऊ '  . बाजीराव पेशवे म्हणजे असं एक वादळ ज्याच्या तडाख्यातून दिल्लीपती सुद्धा सुटले नाही . अशा वादळाला मुठीत ठेवणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्याचं काम . हे शिवधनुष्य मस्तानीने सहजरीत्या पेलले . बाजीराव  मराठी दौलतीचे पेशवे तर मस्तानी बुंदेलखंड च्या सल्तानितील नाजयज वाढलेली कलावंतीण.  ह्यांची प्रेमकहाणी अगदी त्रिलोकात अजरामर झाली . रणांगणात ज्याच्या नावाने दुश्मन चवताळतात त्या बाजीरावांची ही नाजूक बाजू . रणधुमाळी रौद्ररूप धारण करणारे बाजीराव प्रेमाच्या जाळ्यात मश्गूल झालेले बघायचे असतील तरंच ' राऊ ' आहे .
 
           राऊ म्हणजे राव ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा असा प्राथमिक अंदाज किंवा त्याकाळी राव ह्या शब्दाला प्रेमळ साद देऊन राऊ असे म्हटले जात असावे . कर्त्या पुरुषाला राऊ म्हणत असावे . ' राऊ ' ही बाजीराव आणि मस्तानीच्या निःस्वार्थ प्रेमाची विलक्षण कथा आहे . संहारक वृत्तीने ज्यांनी दिल्ली पातशहाला सुद्धा सळो की पळो करून सोडलं अशा पराक्रम वीर पुरुषाची एक कोमल , सौम्य बाजू म्हणजे ' राऊ ' . जातीयतेला भेदनारी निखळ आणि अख्ख्या मराठी दौलातीला दखल घ्यायला लावणारी बाजीराव - मस्तानीची ही प्रेमकहाणी आहे . 

                           अतिशय रोमहर्षक पद्धतीने ही कहाणी ना.सं. इनामदार यांनी वाचकांसमोर ठेवली आहे . इतिहासातील दुर्लक्षित व्यक्तिरेखांना उजाळा देण्याचं काम  इनामदार यांनी केलं आहे . फक्त नावारुपाने परिचित असणाऱ्या मस्तानी ला देखील इनामदार ह्यांनी वाचकांपर्यंत पोहोचतं केलं आहे . सोबतच राधाबाई , चिमाजी अप्पा , काशीबाई , नानासाहेब , अंबाजी पुरंदरे , अनुबाई , भिऊबाई  अशा अनेक व्यक्तिरेखांना अगदी जिवंत केलं आहे . अतिशय प्रभावशाली लेखणीने ही प्रेमकहाणी लेखकांनी वाचकांना सुपूर्द केली आहे . 

कादंबरीची सुरुवात होते ती शनिवारवाड्याच्या वास्तुशांती प्रसंगी . बाजीराव पेशव्यांनी  अगदी दिमाखाने शनिवार वाड्याची बांधणी केली . पण वास्तुशांत आधीच त्यांना मोहिमेवर जावे लागले . मराठी दौलातीचे सेनापती दाभाडे ह्यांनी केलेल्या फितुरीमुळे पेशव्यांनी दाभड्यांचा यथेच्छ बिमोड केला आणि मराठी दौलतीतील फंदफितूरीला आळा घातला . मोहिमेनंतर पेशव्यांचा शनिवार वाड्यात भव्य असा प्रवेश झाला . एकेदिवशी दरबारात तक्रार घेऊन आलेल्या कलावंतीणीची नजरभेट झाली . पेशवे तिला सर्वस्व देऊन बसले . स्वर्गातील अप्सरांनिही जीचं दासित्व पत्करावं अशा मस्तानीला रोखण्यासाठी अख्खी पेशवाई उभी ठाकली . पण बाजीराव आणि मस्तानी ह्यांनी साऱ्या समस्यांना तोंड देत प्रेमाचा नवा आदर्श घातला . पुढे कपटाने मस्तानीला अटक करण्यात आली आणि बाजीरावांनी अल्पायुष्यात दौलतीची साथ सोडली . 
   
                    कादंबरीत मराठी सेनापती दाभड्यांनी केलेल्या फितुरीचा निकाल लावण्यासाठी झालेले युद्ध , वसईतील हबशांविरूद्ध झालेले युद्ध , दिल्लीची मोहीम , राजस्थानावरील चाल अशा मातब्बर लढाईंचा संदर्भ आलेला आहे . ' राऊ ' ही बाजीराव पेशव्यांच्या अतुलनीय पराक्रमाची शौर्य गाथा नसून ही बाजीरावांच्या वैयक्तिक आयुष्यातील चढ - उतारंची रेखाटलेली कथा आहे .

       मुखपृष्ठ सुद्धा अगदी बोलकं असून कादंबरीचा आशय दर्शवतं . म्यानबंद केलेली तलवार बाजीरावांच्या युद्धभूमी ऐवजी त्यांच्या आयुष्य पटावरील मांडलेला घटनाक्रम दर्शवतं . बाजीरावांनी जातियतेविरुद्ध केलेले बंड , धर्मांध समाजजीवन , गगनाला भिडणारी महत्वाकांक्षा , निखळ निःस्वार्थ प्रेमाचा झरा हे सगळच सुद्धा उत्कटपणे प्रकट केलं आहे . 

                             बाजीरावांच्या अतुल्य मुत्सद्दीपणाची , युद्धकौशल्यतेची जाणीव होईल ह्या आशेने घेतलेल्या ह्या कादंबरीने माझा अल्पशा प्रमाणात भ्रमनिरास केला . मात्र कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाचल्यास अतिशय वाचनीय अशी कादंबरी आहे .


सौ.मनिषा राजन कडव .
 
 
 
 

Comments

  1. ना.स.इनामदार लिखित राऊ कादंबरीचा मार्मिक शब्दांत परिचय करवून दिलाय , छान लिहिले ,शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete
  2. Vow!! Beautifully written. Encouraging others, to reading habits. Manisha can you please share me translated books you read

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.