पराकोटीचे पुस्तकप्रेम - बसराची ग्रंथपाल .
पराकोटीचे पुस्तकप्रेम - बसराची ग्रंथपाल .
जेनिट विंटर यांच्या ‘द लायब्ररियन ऑफ बसरा’ या पुस्तकाचा पृथ्वीराज तौर यांनी सुरस अनुवाद केला आहे. ‘बसराची ग्रंथपाल : इराकमधील सत्यकथा’ हे ते पुस्तक. बसरातील युद्धकाळात पुस्तकांवर निस्सीम प्रेम करणं ही बाबच किती आशादायी आहे हे वाचल्यावर कळतं.
बसराची ग्रंथपाल : इराकमधील सत्यकथा’ हे पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेले पुस्तक. अगदी छोटं, ३२ पानांचं. त्यातही प्रत्येक पानावर जवळजवळ ७० टक्के व्यापलेली बोलकी चित्रं. प्रत्येक पानावर फार फार तर चार-सहा ओळी लिखाण. पाचव्या मिनीटाला पुस्तक वाचून संपवलं. मात्र पुस्तकाचा विषय डोक्यात घर करून बसला.
‘बसराची ग्रंथपाल’ ही एक सत्यकथा आहे. ज्ञानाचा ठेवा असणाऱ्या पुस्तकांचे संरक्षण करण्याची प्रेरणा हे पुस्तक वाचून मुलांना नक्कीच मिळेल. सोबतच मोठ्यांनीही बोध घ्यावा अशी ही कहाणी आहे. ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार. ग्रंथ म्हणजे संस्कृती, संस्काराचे प्रतीक. ग्रंथ म्हणजे विविध विषयांची माहिती.
ही कथाय युद्धजन्य इराकची. २००० सालापासून इराकमध्ये युद्ध पेटलं. कथेचा कालखंड घडतोय तो साधारण २००३ च्या आसपास. इराकमध्ये मध्यवर्ती एक जुनं जाणतं ग्रंथालय होतं. ज्या ग्रंथालयाची ग्रंथपाल एक स्त्री, जिचं नाव आलिया मुहम्मद बकर. ग्रंथालयात अनेक नवीन आणि जुन्या पुस्तकांचा दुर्मिळ संग्रह. आलिया मुहम्मद बकर यांचं ग्रंथालयावर प्रचंड प्रेम. त्या प्रेमाखातर त्या अगदी इमानेइतबारे ग्रंथालयाची सेवा करायच्या. इराकमधल्या गुणी लोकांसाठी ते ग्रंथालय म्हणजे एकत्र येण्याचं, चार दोन कामाच्या गोष्टी बोलण्याचं ठिकाण.
सगळं सुरळीत सुरु असताना इराकवर युद्धाचे वारे वाहू लागले. जिथे पुस्तकांची चर्चा व्हायची तिथे आता युद्धाच्या चर्चा सुरु झाल्या. ‘आता गोळीबार सुरु होईल, आता बॉम्ब पडतील, आता रणगाडे शहरात घुसतील.’ अश्या भयाण चर्चांनी वातावरण काजळलं. ग्रंथालयाच्या माडीवर सैन्याचा तळ बसला. युद्धाला प्रचंड तोंड फुटलं, सगळीकडे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज भरून राहिले, आकाशातून पडणारे बॉम्ब त्यांच्या कह्यात येणार्या सर्व गोष्टी जाळू लागले. अनेक स्थानिकांनी बसरा सोडलं, सैन्यही परागंदा झालं. ग्रंथालयात स्मशान शांतता नांदू लागली. हे सगळं होत असताना आलिया मोहम्मद बकर यांनी मात्र जिवाच्या भीतीनं ग्रंथालय सोडलं नाही. सगळे आपआपला जीव वाचवायच्या धडपडीत लागली. आलिया मुहम्मद बकर यांचा सगळा जीव मात्र ग्रंथालयात अडकून राहिला. त्यांनी इराक प्रशासनाला कळवलं, ग्रंथालयात प्रचंड दुर्मिळ पुस्तकांचा खजिना आहे तो वाचवायला हवा. पण जिथं जीवाची शाश्वती नव्हती तिथं निर्जीव असणाऱ्या पुस्तकांसाठी कोण राबणार होतं?
प्रशासनाने सरळसरळ काखा वर केल्या. आलिया मुहम्मद बकर यांना समजून चुकलं की आता ग्रंथालय हे मला एकटीलाच वाचवावं लागणार आहे. त्यांनी रोज रात्री गुपचूप गाडीतून पुस्तकं हलवायला सुरुवात केली. रोज जमतील तेवढी पुस्तकं त्या घरी हलवायच्या. पण पुस्तकांची प्रचंड संख्या बघता त्यांची धडपड तोडकी पडायला लागली. वेळ जसा जसा पुढे सरकू लागला तसं तसं विनाशाची भयावह कल्पना त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी ग्रंथालयाच्या बाजूला छोटं हॉटेल चालवणाऱ्या अनिस मोहम्मदला मदतीबद्दल विचारणा केली. त्यानेही मोठ्या मनाने मदतीचा हात पुढे केला. आलिया- अनिस- त्याचे मोठे भाऊ आणि काही मागे राहिलेले दुकानदार यांनी मिळेल त्या बासनात- पोत्यात, पेट्यात, खोक्यात पुस्तकं भरून ती सात फुटी भितींवरून ग्रंथालयातून त्याच्या हॉटेलमध्ये प्रचंड कष्टानं हलवली.
पुस्तक निर्जन स्थळी हलवल्या बरोबर नवव्या दिवशी अचानक ग्रंथालयाच्या मुख्य इमारतीला आग लागली. ग्रंथालय जळून राख झालं. आलिया यांची भीती खरी ठरली पण त्यांच्याच कष्टामुळं पुस्तकं वाचली होती.
पुस्तकं आता सुरक्षित होती. पण युद्धाचा जोर वाढला. आलिया परत अस्वस्थ झाल्या. त्यांना पुस्तकांची काळजी वाटायला लागली. त्यांनी त्यातल्या त्यात एक शांत दिवस बघून मोठ्या गाडीत सगळी पुस्तकं भरून ती स्वतःच्या राहत्या घरात हलवली. घरात त्यांनी मिळेल त्या जागी पुस्तकं रचून ठेवली. बंद पडलेल्या
फ़िजमध्ये, राशन भरून ठेवण्याच्या डब्यामध्ये, कार्पेट खाली सगळीकडे त्यांनी पुस्तकं रचून ठेवली. खिडक्यांच्या समोर पुस्तकं रचून ठेवल्याने पडदे उघडले तरी बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. थोडक्यात त्यांचं घर शब्दश पुस्तकांचं घर झालं होतं.या घटनेनंतर त्यांना हृदयविकाराचा जोराचा झटका आला पण त्या त्यातूनही सावरल्या. आता त्या वाट बघत आहेत युद्ध थांबण्याची. नवीन ग्रंथालय उभं करण्याची. घरात सुरक्षित ठेवलेली सगळी पुस्तकं परत इराकच्या जनतेला परत देण्याची.
जीवावर उदार होऊन त्यांनी ग्रंथालयांची ७० टक्के पुस्तकं वाचवली. ज्यात जगातल्या सर्व भाषांमधली दुर्मिळ पुस्तकं,अनेक हस्तलिखितं आहेत. इराकची वाचनप्रिय जनता बसराच्या या ग्रंथपालाचे उपकार आजन्म विसरणार नाहीत. आता २००४ मधे ग्रंथालय पुन्हा बांधण्यात आले आणि आलिया बेकर ह्यांची मुख्य ग्रंथपाल म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे. त्यांनी वाचविलेल्या ग्रंथसंपदेत इस्लाम धर्माचे संस्थापक आणि प्रेषित मोहम्मद ह्यांचे तेराव्या शतकातील दुर्मिळ चरित्र सुद्धा आहे.
छान पुस्तक परीक्षण केले ...!
ReplyDeleteछान पुस्तकाची माहिती मिळाली
ReplyDeleteअसा प्स्तक प्रेमी दुर्मिळ च
ReplyDeleteछान
ReplyDelete