स्वामी( सर्वात आवडती कादंबरी)

स्वामी


"स्वामी" ही थोरल्या माधवराव पेशव्यांची जीवनगाथा. लेखक रणजित देसाई यांची पहिलीच ऐतिहासिक कादंबरी. यानंतर त्यांनी "राधेय" (कर्ण), "श्रीमान योगी" (शिवाजी महाराज) यांसारख्या उत्तमोत्तम कादंबया लिहिल्या, पण जनमानसात त्यांची ओळख निर्माण झाली ते "स्वामी"कार म्हणूनच!

मराठ्यांच्या इतिहासात समस्त मराठी जनांच्या जिव्हारी लागणाऱ्या अनेक घटनांपैकी एक म्हणजे पानिपतावरील जिंकता जिंकता हरलेली लढाई होय. पानिपतावरचा घाव हा खरच मोठा घाव होता पण ग्रॅंट डफ म्हणतो त्याप्रमाणे पानिपतापेक्षाही मोठी हानी म्हणजे माधवराव पेशवे यांचा अकाली मृत्यू होय. डफ असं का म्हणतो हे जाणून घेण्यासाठी "स्वामी" ही कादंबरी वाचायला हवीच.
माधवरावांचा पेशवाईच्या कालखंडात संघर्ष हा तीन स्तरावर चालू राहीला अगदी त्यांच्या मृत्युपर्यंत, कौंटुबिक कलह, निजाम हैदर यांच्याशी समरांगण आणि त्यांना जडलेला राजयक्ष्मासारखा जीवघेणा आजार

 या कादंबरीचे दोन भाग करता येतील भाग पहिला - माधवराव पेशवे  व त्यांचा राज्यकारभार यात ,

       माधवराव पेशवे हे नानासाहेब पेशवे यांचे द्वितीय पुत्र. पानिपतच्या युद्धात त्यांचे मोठे बंधू विश्वासराव यांचा मृत्यू झाल्यावर अवघ्या सोळाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. लहान वयात हि जबाबदारी त्यांना पेलवणार नाही असे बऱ्याच जणांना वाटल्याने त्यांचे काका राघोबादादा यांनी माधवराव व पेशवाईची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली. 
माधवरावांना सर्वात जास्त काळ हा घरभेद्यांवर लक्ष देण्यात म्हणजे राघोबादादा (माधवराव पेशवे यांचे काका) आणि त्यांचे सल्लागार यांवरच गेला. कारण राघोबादादा कितीही शुर असले तरी हलक्या कानाचे आणि अविचारी असा त्यांचा लौकिक.
पण म्हणतात ना सिंहाला शिकार करायला शिकवावी लागत नाही ते गुण उपजतच त्याच्याकडे असतात. त्याप्रमाणेच माधवरावांना राजकारणातील डावपेच, बारकावे, मुत्सद्देगिरी, लढाया या कुणी शिकवाव्या लागल्या नाहीत. अंगच्या उपजत गुणांमुळे आणि सभोवतालच्या परिस्थिती नुसार ते सर्वकाही शिकत गेले. ते अतिशय कुशल राजकारणी तर होतेच पण अत्यंत दूरदृष्टी असलेले सेनानी सुद्धा होते.

       पानिपतावर जेव्हा मराठी सत्तेची बरीचशी पडझड झाली, त्यांचे बंधू या लढाईत मारले गेले, अशा कठीण परिस्थिती मध्ये त्यांना पेशवेपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यानंतर काही दिवसांनी नानासाहेब देखील मरण पावले. मराठी साम्राज्यात आता आपल्याला तुल्यबळ, आपल्या सत्तेशी टक्कर देणारा प्रतिस्पर्धी कोणीच नाही असे वाटल्याने निजामाने मराठी साम्राज्यावर आक्रमण केले. या युद्धात जेव्हा राघोबादादा पराभवाच्या छायेत होते तेव्हा माधवरावांनी आपल्या सैन्यानिशी निजामावर चालून जाऊन त्यांचा पराभव केला.

       एकवेळ वारसाहक्काने चालत आलेली सत्ता पुढे चालवणे सोपे असते, कारण अशी सत्ता एक-एक करून बांधावी लागत नाही, ती आधीच परिपूर्ण असते. पण मोडकळीस आलेली सत्ता? ती मात्र एक-एक करून जमवावी लागते, अगदी मावळ्यांपासून ते सेनापतीपर्यंत सर्वांना एकाच धाग्यात बांधावं लागत. नवीन झालेला बदल प्रजेला आवडेलच असं नाही त्यासाठी एका राजाला शत्रूविरुद्ध युद्ध करण्याआधी स्वतःविरुद्धच एक युद्ध करावं लागत. स्वतःला सिद्ध करावं लागत जेणेकरून त्याद्वारे प्रजा राजाला स्वीकारेल. निजामाविरुद्धच्या लढाईत राघोबादादांना मदत करून माधवरावांनी स्वतःला सिद्ध करून जनतेच्या मनात आदराचं स्थान मिळवलं. त्यांनी पेशवाईची मोडकळीस आलेली सत्ता पुन्हा नव्यानं उभारली.

       अवघी अकरा वर्षांची राजकीय कारकीर्द त्यांची, पण आपण आयुष्य किती जगलो यापेक्षा ते कस जगलो याला जास्त महत्व असत. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त मराठी साम्राज्याच भलं पाहणारा हा पेशवा राजकारण निपुण तर होताच पण वेळ प्रसंगी सामान्य जनतेसाठी त्यांनी आपली जवळची नाती सुद्धा दूर सारली. माधवरावांची कर्तव्यनिष्ठा मला एका प्रसंगात खूप भावून गेली. गोपाळराव पटवर्धन आणि रामचंद्र जाधव जेव्हा त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे मोगलांना मिळाले, तेव्हा त्यांना परत आणून माधवरावांनी त्यांना सरदारकी बहाल केली. पण जेव्हा मल्हारराव रास्त्यांनी खुद्द त्यांच्या मामानी निजामाशी हातमिळवणी केली तेव्हा मात्र त्यांनी मल्हाररावांना दंड ठोठावला. प्रजेच्या रक्षणासाठी त्यांनी रक्ताच्या नात्यात नि सामान्य लोकात कधीच फरक नाही केला.

       माधवरावांच्या कारकिर्दीत जसे त्यांना हैदरअली, निजाम असे शत्रू होते, तसेच काही आप्तस्वकीय देखील त्यांच्या विरोधात होते. त्यात प्रामुख्याने नाव त्यांच्या काकांचं-राघोबादादांचं घ्यावं लागेल. खरतर राघोबांनी स्वतःच माधवरावांसाठी पेशवेपद नाकारलं होत पण त्यांचा सत्तेवरील मोह काही सुटत नव्हता. शिवाय सखारामबापू, गंगोबा तात्या असल्या काही त्यांच्या खास माणसांनीच त्यांचे कान भरल्यामुळे ते वारंवार माधवरावांना फितूर होऊ लागले. अगदी यासाठी राघोबादादांनी निजामाशी मैत्री सुद्धा पत्करली.

       माधवरावांनी केवळ रक्ताचं नातं म्हणून त्यांचं मन वळवण्याचे केलेले अनेक प्रयत्न अयशस्वी ठरले. बाहेरच्या माणसांची अचूक पारख असलेला हा पेशवा रक्ताच्या या नात्याला ओळखण्यात अयशस्वी ठरत गेला. १७७२ मध्ये हैदरवरील स्वारीत असताना माधवराव आजारी पडले. पुढे ते दुखणे क्षयावर गेले. पण अशा आजारी स्थितीतही त्यांनी प्रजेच्या कल्याणाचा वसा सोडला नाही. कादंबरीचा शेवट वाचताना एक प्रश्न कायम सतावत राहिला मला, एवढी असीम ताकद, कर्तव्यनिष्ठा या पेशव्याच्या ठायी आली कोठून? स्वतःच्या स्वार्थापलीकडे, दुसऱ्यांसाठी जो जगतो, जो दुसऱ्याचं नेहमी भलं व्हावं यासाठी झटतो तोच खरा माणूस हे त्यांनी जाणलं असावं हेच उत्तर असू शकत कदाचित या प्रश्नाच.

       त्यांचं स्थान जरी श्रीमंत पेशव्यांच असल तरी त्याबद्दल त्यांच्या मनात किंचितही अहंभाव नव्हता. स्वतःपेक्षा प्रिय त्यांना आपले लोक होते, मराठी जनता होती. घरच्या लोकांचे वाद-विवाद, मतभेद सांभाळून हैदरअली, निजाम यांच्याविरुद्ध लढून त्यांनी मराठी साम्राज्याची नवीन उभारणी केली.

उत्तरेत मराठयांचा झेंडा शिंदे होळकर जोडगोळीच्या साहाय्याने पुन्हा एकदा फडकावण्याचे महत्त्वाचे राजकारण हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च मानबिंदू ठरला. त्यामुळे पानिपतावरील मराठ्यांवरील जखम भरून काढण्यासाठी मदत झाली.

 राज्यात शिस्त, सुव्यवस्था निर्माण केली. इतक्या शारीरिक यातना असताना देखील हा राजा केवळ प्रजेच्या कल्याणासाठी जगत राहिला,शेवटपर्यंत लढत राहिला. त्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची पडझड सुरु झाली असं म्हणावयास हरकत नाही. अवघ २८ वर्ष आयुष्य जगलेला हा पेशवा कर्तबगार, दूरदृष्टी असणारा, निष्कलंक चारित्र्याचा होता यात वादच नाही.

       या कादंबरीतून आत्मसात करण्यासारख्या कितीतरी गोष्टी आहेत, ज्या आपल्याला पुढे मार्गदर्शक ठरतील.

१. "कर्तव्यनिष्ठा" - जी माधवरावांनी शेवट पर्यंत सोडली नाही.
२. सामान्य जनतेपासून ते मोठ्या लोकांचा, त्यांनी मांडलेल्या मतांचा केलेला "आदर".
३. आपापसात कितीही मतभेद झाले तरी वेळप्रसंगी आपल्याच माणसांसाठी घेतलेला "कमीपणा" - कारण या कमीपणामुळेच लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर अजून वाढला.
४. भेदभाव न करता केलेली गुणी माणसांची पारख - कोणतीही जात-पात न मानता फक्त माणुसकी हि जात खरी मानून या पेशव्याने माणसे जोडली. सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्या या गुणाला अवलंबवण्याची आज आपल्या समाजाला जास्त गरज आहे.
५. न्यायाचा आदर - न्यायदेवतेसमोर कोणीही लहान-मोठा नसतो,
न्यायदेवतेसमोर त्यांच्यालेखी सर्वजण सारखेच होते मग ती सामान्य जनता असो वा खुद्द पेशवा. 
त्यांचे हे गुण आपण नक्कीच आत्मसात करण्यासारखे आहेत.

    दुसरा  भाग हा  रमा-माधव  यांची
       सहज, साधी, सोपी तरीही खूप काही सांगून जाणारी. खूपकाही समजावून जाणारी अशी ही कथा. पती-पत्नीचं एक अबोल, अव्यक्त तरीही परिपूर्ण नातं काय असत हे या कादंबरीच्या अनेक प्रसंगातून आपल्या लक्षात येत. पेशवेपदाबरोबरच आपल्याला पती म्हणून देखील कर्तव्य पार पाडायची आहेत, पण सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे केवळ ती कर्तव्य बाजूला पडतायत हि खंत कुठे ना कुठे असलेला माधव आणि आपण पेशवा माधवराव यांच्या पत्नी आहोत, पेशवाईची जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे हे सत्य मनातून क्षणभर हि ढळू न देणारी रमा.

       मला त्यांची प्रेमकथा यासाठी अधिक आवडली कि त्यांच नातं मनानं मनाशी जोडलं गेलं होत. एकजण ढासळला तर दुसऱ्यानं येऊन सावरावं इतकं घट्ट होत. खेळण्या-बागडण्याच्या वयात रमाबाईंवर पेशवीणबाई म्हणून जी जबाबदारी येऊन पडली ती त्यांनी यथायोग्य पार पाडली. माधवरावांना त्यांच्यासाठी खूप कमी वेळ देता आला पण त्यांनी त्यामध्येही आनंद मानला, नि कुणालाही कसलीच खंत जाणवू दिली नाही. सर्व घर व्यवस्थित सांभाळलं. 

       अवघ्या काही वर्षांचा सहवास त्यांचा एकमेकांच्या सोबत, पण त्यातील प्रत्येक क्षण अगदी जपून ठेवावा असा होता. म्हणतात ना वटवृक्षाचे आयुष्य खूप मोठे असते, तर चंदन अल्पायुषी. पण आपल्यामागे आपल्या आठवणींचा सुगंध दरवळत ठेवणार चंदनच जास्त महत्वाचं मानलं जात. कारण त्याच जीवितकार्य संपल्यावरही ते जगाला सुगंध देऊन त्यांच्या उपयोगी येत. रमा-माधव हि प्रेमकहाणी सुद्धा अशीच आहे.

       रमाबाईंनी स्वतःहून कोणत्याच अपेक्षा केल्या नाहीत कि माधवरावांनी त्यांना काही कमतरता भासू दिली नाही. चंदनासारखं प्रेम होत हे, कि ज्याचा सुगंध पिढ्यान पिढ्या दरवळत राहील. एक साधी-निर्मल प्रेमकथा कशी असते याची जाणीव जगाला करून देईल. माधवरावांच्या प्रत्येक सुख-दुःखात त्यांना साथ देणाऱ्या रमाबाई. त्यांच्यासाठी अखंड उपवास करणारी ती साध्वी. पतीवरच्या निरपेक्ष प्रेमापुढे तिला कधी काही दिसलंच नाही. ती आयुष्यभर तर त्यांच्या सोबत होतीच पण मृत्युनंतरही तीन पतीची साथ सोडली नाही.

       पतीसोबत सती जाणारी ती साध्वी मराठी इतिहासात अमर झाली. पूर्वीच्या राजे-राण्यांच्या, श्रीमंतांच्या प्रेमकहाण्या म्हणजे उंची राजवाड्यात, संगीत-सुगंधात, पुष्करणींच्या आरासीमध्ये फुललेल्या कथा असंच बहुतेक जगाला वाटत. दागदागिन्यांनी नटून, भरजरी-चकचकीत महालात मिरवणाऱ्या राण्या, दास-दासींचे मुजरे स्वीकारत स्वतःचा मोठेपणाच जास्त मिरवणारे राजे, या सगळ्यांपेक्षा हि प्रेमकथा वेगळी वाटते, हवीहवीशी वाटते कारण ती आपल्यातली असण्याइतपत जिवंत आहे. या कथेमध्ये आपण आपल्याला पाहू शकतो कारण त्यात भपकेपणा नाही, सामान्य वाटणारी असामान्य अशी ही प्रेमकहाणी आहे. पती-पत्नीचा एकमेकांवर असलेला विश्वास, त्यांनी एकमेकांची घेतलेली काळजी. न बोलताही सर्वकाही समजून जाणारी ती .  

राजकारणाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे नसलेले पण घरगुती शांततेला बाधा आणणारे तोतया सदाशिवराव भाऊ प्रकरण निपटुन काढण्याचा प्रसंग हा माधवरावांच्या हुशारी, धीरोदात्तपणाची साक्ष देणारे आहे. 

वरील सर्व घटना प्रसंगाच वर्णन रणजित देसाई यांनी अतिशय सुंदर शब्दयोजना आणि संवादातून व्यक्त केलं आहे. पण त्याचबरोबर रमा- माधव यांच्या निकोप प्रेमाचं, शृंगाराचं अत्यंत रसाळ पण तितक्याच सोज्वळ भाषेत वर्णन करुन दिलं आहे. त्यामुळे रमा माधव यांच्या तोंडी असलेले एकांतातील संवाद आपल्याला नकळत आजच्या काळात हरवत चाललेल्या निरलस प्रेमाची आठवण करुन देत राहतात. माधवरावांचा करारीपणा, दुरदृष्टी, बेधडकपणा, आपल्या माणसांच्या प्रती उचंबळुन येणार निरपेक्ष प्रेम, श्रीगजानन समयी असलेली भक्ती तस़च रमाबाईंचा भावूक स्वभाव व पतिवरील निर्लेप प्रेम; राघोबादादांचा सत्तेवरील मोह, त्यासाठी प्रसंगी स्वजनांचा घात करण्याची त्यांची वृत्ती, मराठी राजकारणातील डावपेच, उतार-चढाव, पेशवाईच्या कालखंडातील श्रीमंती, भाषा सौंदर्य यांचे वर्णन करताना चितारले गेलेले शब्द, संवाद यांमुळे आजही इतक्या वर्षांनी कादंबरी आपला स्वत:चा दर्जा टिकवून आहे आणि पुढेही राहील यांत कोणतीही शंका उरत नाही. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आतापर्यंत दुर्लक्षित असलेलं माधवरावांचं निसर्गाविषयी उत्कट प्रेम रणजित देसाईंनी अत्यंत ताकदीने समोर मांडल आहे. माधवरावांचा आयुष्यातील शेवटच्या प्रवासात, राजयजक्ष्म्यामुळे होणाऱ्या वेदना ह्यांच वर्णनही ह्रदय हेलावून टाकणारं आहे.

कोणतीही अवाजवी अपेक्षा न करता एकमेकांवर केलेल्या निर्व्याज प्रेमाची एक साधी पण अमर मराठमोळी प्रेमकहाणी “रमा-माधव”, जी "स्वामी" मधून मला नव्यानं उमगली. त्या कर्तव्यनिष्ठ, गणेशभक्त पेशव्यास आणि त्या देवीसमान साध्वीस माझा आदरपूर्वक नमस्कार!!!

१९६२ साली प्रकाशित झालेली ही कादंबरी आजही बेस्ट सेलर का आहे हे जाणून घ्यायचे असल्यास आणि मराठी साहित्याचा एक मानबिंदू ही कादंबरी का मानली जाते हे जाणून घेण्यासाठी एकदा ही कादंबरी जरुर वाचा.



सौ. मनिषा राजन कडव .

Comments

  1. स्वामी कादंबरीतून नेमक काय शिकायला मिळत याच उत्तम विवेचन केलय 💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.