अमृतवेल
अमृतवेल
वि.स खांडेकरांची एक अलंकारिक, तरलभाव्य कादंबरी,सन १९६१ साली लिहिलेले पुस्तक अजूनही नवी कोरी कथा आहे असे वाटते,
अशी दुर्मिळ पुस्तके हल्ली मिळत नाहीत
वाचायला हाती घेतली तेव्हा थोडं दडपण होतं कारण 'ययाती' सारख्या 'ज्ञानपीठ' विजेत्या साहित्य लेखकाची ही कांदबरी किती झेपेल माहित नव्हतं. पण अशा साहित्यप्रेमी लेखकांचं लिखाण केव्हातरी वाचावं ही उत्सुकता होती. माझ्या मनात सतत कुतूहल असायचे की अशी कुठली जादू या लेखकांच्या लेखणीत असते? अलंकारीक शब्दरचना ही फक्त शब्दसांप्रदाय वाढवणारी असू शकत नाही. एखाद्या प्रसंगाला किंव्हा व्यक्तिला आपण भरपूर विशेषणं दिली की ते लेखन समृद्ध होत नाही. त्या लेखनात, वाचकाच्या मनात शिरून ते भावविश्व उभं करण्याची शक्ती हवी.
या कांदबरीत नंदा या मुलीची गोष्ट आहे ती वेगवेगळ्या टप्प्यातून जाते. एका स्त्रीच्या आयुष्याला किती वेगवेगळे पदर असतात! काळानुरूप आजच्या स्त्री चे रहाणीमान बदलले असले तरी समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र बदललेला नाही. एकटी बाई म्हणून जगात वावरत असताना येणाऱ्या अडचणी मात्र बदलेल्या नाहीत. आणि त्या एकट्या बाईला जगण्यासाठी तग धरून राहताना येणाऱ्या व्यथा ही बदलेल्या नाहीत. प्रेम ही भावना स्त्री-पुरूषाच्या नात्यात सगळ्यात आधी कायम वासनेच्या रूपातचं येते आणि दिसते हे समाज म्हणून आपलं अपयश आहे. याच पार्श्वभूमीवर कादंबरीतलं एक वाक्य खूप भावलं- 'या वासनेला जेव्हा भावनेची जोड मिळते तेव्हा ही प्रीती अमृतवेल होते.'
शरिर सुखाच्या पलिकडे जेव्हा आपण मनं जुळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रेमाचा खरा अर्थ आपल्याला कळतो. पण हीच भावना एखाद्या स्त्री च्या मनात आली आणि तिच्या एकट्या पडलेल्या मनाचं नंदनवन झालं तर त्याला समाज नैतिक आणि अनैतिकतेच्या पारड्यात का मोजत असेल?
स्त्री च्या मनात प्रेमाची भावना देवघरातल्या निरांजनासारखी असते. ती उजळली की संपूर्ण घर पवित्र होतं. जी व्यक्ती आपल्याला माणूस म्हणून अधिकाधिक उच्च पातळीवर नेत असेल त्याच्या बद्दल ही पवित्र भावना निर्माण झाली तर काय बिघडलं?
ही कादंबरी असे अनेक प्रश्न मनात निर्माण करते. त्याची उत्तरं देखील त्याच्यातच आहे... आपण शोधली तर... पण ती लादलेली नाहीत. तरीही ती आपल्याला पटतात... हीच या लेखणीची कमाल आहे.
प्रेम या भावनेवर आतापर्यंत वाचलेलं उत्कृष्ट असं तरलं साहित्य!
सौ.मनिषा राजन कडव -
वि.स.खांडेकरांच्या या कादंबरीचा छान परीचय करवून दिलात ,शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteWachyachi aahey pdf send karu shakal ka ?
ReplyDeleteमाझ्याकडे आहे पण मी कशी पाठवू
Delete