पुस्तकचोर
मार्कस झुसॅक या आॅस्ट्रेलयन लेखकाची ही कादंबरी २००५ साली प्रकाशित झाली. या पुस्तकाला खूप बक्षिसे मिळाली. जगातील ३० भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला.
पुस्तकचोर या कादंबरीतील निवेदक /सूत्रधार आहे म्रुत्यु. लीझल मेमिंगर या मुलीच्या आयुष्यातील घटनांचे विश्लेषण करणारा हा म्रुत्यु तिच्या आजूबाजूचे वातावरण, युद्ध, मानवी स्वभाव, कष्टकरी गरीब जर्मन लोकांचे दैनंदिन आयुष्य, ज्यू लोकांची ससेहोलपट, हालअपेष्टा, कुपोषण अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगत राहतो.
जर्मनीतील मोल्कींग नावाच्या गावात रोझा आणि हान्स हुबरमान या जोडप्याकडे लीझल राहायला येते. गरीब परिस्थिती मुळे तिच्या आईवर आपल्या मुलीला दुसर्या कुटंबात ठेवायची वेळ येते. या मुलीला सांभाळण्यासाठी सरकार कडून आर्थिक मदत या हुबरमान कुटुंबाला मिळणार असते. लीझलचे हे दत्तक वडील पेशाने रंगारी असतात आणि अॅकाॅर्डियन वादक असतात. आणि आई रोझा श्रीमंतलोकांचे कपडे धुवून इस्त्री करुन देण्याचे काम.करत असते. या दांम्पत्याला दोन मुले असतात. मुलगा नाझी सैन्यात असतो आणि मुलगी श्रीमंत कुटुंबात मुलांना सांभाळायचे काम.करत असते.
हळूहळू लीझल या कुटुंबात रमायला लागते. तिची शेजारच्या रूडी ष्टाइनर शी मैत्री होते. दोघे एकत्र शाळेत जातात, सायकल चालवतात, साॅकर खेळतात. दोघांची घट्ट मैत्री होते. लीझलचे वडिल तिला लिहा वाचायला शिकवतात. हळूहळू लीझल शब्दात रमायला लागते. नाझी जाळून टाकत असलेल्या पुस्तकांतून एक पुस्तक चोरते. तसेच एका श्रीमंत बाईच्या घरातील पुस्तकं वाचायला सुरवात करते आणि क्वचित एखादे पुस्तक चोरते.
पुढे त्यांच्या घरी मार्क फॅन्डन्बुर्ग नावाच्या ज्यू मुलाला आश्रय दिला जातो. तो हान्स हुबरमन च्या मित्राचा मुलगा असतो.
पुढे पुढे युद्धाच्या झळा वाढायला लागतात. बाॅम्ब हल्ल्यातुन वाचण्यासाठी गावातील लोकांना एका तळघरात आश्रय घ्यावा लागतो. तिथही लीझल पुस्तक वाचून लोकांच्या मनावरचा ताण कमी करते. तेव्हा ती १२-१३ वर्षांची असते. आपल्यामुळे या कुटुंबावर संकट यायला नको म्हणुन मॅक्स तिथून निघून जातो .
पुढे या हुबरमान जोडप्याचे काय होते ते जिवंत राहतात की मरतात, मार्क फॅन्डन्बुर्ग नाझी छळातून वाचतो का? लीझलचे पुढे काय होते हे वाचकांनी पुढे वाचावे.
निरागस शाळकरी मुलांच्या खोड्या, सदैव भुकेले असल्याने खाण्यासाठी केलेल्या चोऱ्या , लबाड्या, गरीब पण फटकळ, शिवराळ जर्मन लोकांच्या रोजच्या जगण्याच्या विवंचना तसेच या लोकांच्या मधले ऐनवेळी प्रकट होणारे असामान्य धैर्य, उदारपणा असे अनेक गुणांचे चित्रण करणारे प्रसंग या कादंबरीत भरपूर आहेत. सर्वच जर्मन ज्यू द्वेषी नव्हते. ज्यू लोकांबरोबर सर्वसामान्य जर्मन नागरिकांना देखील या युद्धाचे बळी व्हावे लागले. हे कादंबरी वाचताना समजून येते.
एकीकडे हिटलर सारखा टोकाचा क्रुरकर्मा तर दुसरीकडे लीझल, हान्स हुबरमान,रूडी यांच्यासारखे माणुसकी जपणारे सर्वसामान्य नागरिक पाहून म्रुत्युही अचंबित होतो.
विनता कुलकर्णी यांनी अतिशय सुरेख असा मराठी अनुवाद केला आहे. युद्धस्य रम्य कथा या न्यायाने ही कादंबरी वाचलीच पाहिजे अशी आहे .
सौ.मनिषा राजन कडव
छान लिहिले . पुस्तक परीक्षण वाचल्यावर पुस्तक वाचण्याची इच्छा झाली ,शुभेच्छा 💐💐💐
ReplyDelete