आकाशाशी जडले नाते
सूर्य का चकाकतो?
तारे का लुकलुकतात?
ग्रह आडवे तिडवे का फिरतात?
ग्रहणे का लागतात?
अनादीकाळापासून माणसाला कोडी घालत आहे हे अथांग आकाश. ती कोडी सोडवायला मदत करते विज्ञान आणि तंत्रज्ञान. मूलभूत सैद्धांतिक चौकट पुरवते विज्ञान आणि दुर्बिणी, उपकरणे यांसारखी साधने पुरवते तंत्रज्ञान. शिवाय जुने प्रश्न सोडवताना अवचित नव्याने समोर येणार्या अद्भुत, थरारक गोष्टी - कृष्णविवरे, कृष्णपदार्थ, स्पंदक, क्वेसार...
खूप काही दडलेले आहे या आकाशाच्या गूढगर्भामध्ये!
'आकाशाशी जडले नाते' घडवते त्याचेच दर्शन. खगोलविज्ञानातल्या मनोवेधक किश्शांपासून जयसिंहाच्या जंतरमंतरपासून हबल दुर्बिणी पर्यंत..., आर्यभटापासून आईन्स्टाईनपर्यंत..., सचित्र देखण्या पानापानातून घडते ही अवकाशाची सफर.
हे पुस्तक आकाशाशी आपले नाते अधिकच घट्ट करेल एवढं मात्र नक्की !
मराठीतील खगोलशास्त्रावरील सर्वात देखणे आणि माहितीपूर्ण पुस्तक म्हणून डॉ. जयंत नारळीकर सरांच्या "आकाशाशी जडले नाते" या पुस्तकाचा उल्लेख करावा लागेल. खगोलशास्त्रातील क्लिष्ट संकल्पना कमीत कमी गणित वापरून अत्यंत सोप्या भाषेत नारळीकर सरांनी पोहोचवल्या आहेत. या संकल्पना समजवून सांगत असताना मध्येच देखणी रंगीत चित्रे, शास्त्रज्ञांचे विनोदी किस्से, काही ठेवणीतली माहिती आणि अवैज्ञानिक गोष्टींवर केलेले खास शैलीतील भाष्य या वैशिष्ट्यांमुळे हे पुस्तक कमालीचे वाचनीय झाले आहे. पृथ्वी, इतर ग्रह, सूर्यमाला यांचा वेध घेता घेता विविध प्रकारच्या दुर्बिणी, ताऱ्यांची जीवनगाथा, आकाशगंगे बाहेरचे विश्व, विश्वरचनाशास्त्र आणि खगोलशास्त्रापुढील आव्हाने या विषयांचा सर्वसामान्यांना समजलेलं अश्या भाषेत आढावा घेतला आहे. ज्यांना गणिती सूत्रे दुर्भोध वाटतात अश्यांसाठी परिशिष्टात पायाभूत गणिती क्रिया क्लिष्टता टाळून मांडल्या आहेत. तसेच परिशिष्टातील नक्षत्रदर्शन या भागात आकाशात दिसणाऱ्या विविध नक्षत्रांचे नकाशे मांडून नारळीकर सरांनी हा विषय निव्वळ पुस्तकातच न राहता प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे अभ्यासण्यासाठी खगोलप्रेमींना उद्युक्त केले आहे.
दुर्देवाने आज या पुस्तकाच्या नवीन आवृत्या उपलब्ध नाहीत. लायब्ररीत नाहीतर जुन्या पुस्तकांच्या दुकानात हे पुस्तक शोधावे लागते. असंख्य खगोलप्रेमींना खगोलशास्त्राची आवड लावण्यात या पुस्तकाचा सिंहाचा वाटा आहे.
सौ.मनिषा राजन कडव.
छान लिहिले ,नारळीकर सरांच्या पुस्तकाची छान ओळख करवून दिली ..💐💐💐
ReplyDelete