वाचू आनंदे " भाग - १ ते ४
"वाचू आनंदे" ही चार पुस्तकांची पुस्तकमाला आहे. माधुरी पुरंदरे आणि नंदिता वागळे यांनी अतिशय परिश्रम करून या चार भागांची निर्मिती केल्याचे वाचताना वारंवार जाणवत रहाते.
रूढ पुस्तकांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारची, आणि वाचनीय बरोबरच अतिशय प्रेक्षणीय अशी ही पुस्तके हातात घेतल्यावर खिळवून ठेवतातच.
मराठीतील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध जुन्या नव्या लेखक, कवींच्या उत्तमोत्तम कलाकृतींमधील काही भागांचे संकलन- असे यांचे सर्वसाधारण स्वरूप सांगता येईल.
पण हे एवढेच नाही. पुस्तकांचे देखणेपण वाढवणारी आणखी एक गोष्ट, म्हणजे त्यातील फोटो, आणि चित्रे. भारतातील अनेक प्रांतांमधील शिल्पांचे, तैलरंग, जलरंगांतील चित्रांचे, लोकचित्रकलेचे, असे चोखंदळपणे निवडलेले अनेक फोटो रसिकमनाची तृप्ती करतात. योग्य त्या जागी विषयानुरूप केलेली त्यांची योजना साहित्याची रुचीही वाढवते. आपल्याकडे कलांचा केवढा समृद्ध वारसा आहे, हे जाणवून मन थक्क होते. (आणि हे सर्व फोटो रंगीत असते तर - - असेही वाटत रहाते.)
चारपैकी दोन भाग कुमारांसाठी, आणि दोन बालवाचकांसाठी, असे म्हटले असले, तरी सर्व वयांचे वाचक यांचा आनंद घेऊ शकतात. कारण, दर्जा, आणि उत्तम तेच निवडणे हे सूत्र सांभाळले आहे.
एकदा वाचायला सुरु करून सलग वाचून संपविण्याच्या प्रकारातली ही पुस्तके नाहीत. केव्हाही, कुठलाही भाग उचलावा, अधले मधले काहीही वाचावे, आणि आनंद घ्यावा.
बाल आणि किशोर गटातील वाचकांसाठी ही एक शोकेस, किंवा संपादिकेच्या म्हणण्यानुसार, किलकिली केलेली एक खिडकी आहे. खजिन्याकडे जाणार्या अनेक वाटांपैकी एका वाटेवर या दोघींनी वाचकांना आणून सोडले आहे.
यामुळे वाचनाची भूक भागणार नाही, तर चाळवणार आहे. चांगले साहित्य कसे असते, हे कळले, की काय वाचावे, याची समज आपोआप वाढत जाते.
संपादकीय/ प्रस्तावनाही वाचनीय आहे.
कुठल्या लेखक /कवींचे साहित्य निवडले, यांचे उदाहरण द्यायचे, तर सगळ्यांचीच नावे घ्यावी लागतील, कारण टाळण्यासारखे काही नाहीच. याकरिता वाचकांने पुस्तकाची अनुक्रमणिकाच पाहिल्यावर लक्षात येईल .
प्रत्येकाच्याघरात संग्रही असावीत अशी ही पुस्तके आहेत.
पुस्तकाची छान ओळख करवून दिलीत 💐💐💐
ReplyDelete