नोबेल कथा

नोबेल कथा



आपल्या आयुष्यात अनेक माणसांना आपण भेटतो , त्यांच्याशी बोलतो, काही वेळ घालवतो पण त्यातली फार कमी माणसं स्वतःच विशेष स्थान निर्माण करतात. पुस्तकांच्या बाबतीतही असंच आहे. काही पुस्तकं आपलं जगणं समृद्ध करणारी ठरतात. 
असंच एक पुस्तक नोबेल कथा

गेली ११२ वर्षे दिला जाणारा जागतिक पातळीवरचा सर्वोच्च सन्मान त्याची पार्श्वभूमी, त्याची पद्धती, आल्फ्रेड नोबेल यांचा प्रवास आणि अनेक नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या कार्याची माहिती याबद्दल या पुस्तकात सांगितले आहे . 

आयझॅक न्यूटनच्या मते 'प्रत्येक शास्त्रज्ञ हा पूर्वीच्या शास्त्रज्ञांच्या खांद्यावर उभा असतो म्हणूनच त्याचे हात आणखीनच वरपर्यंत पोहचत असतात' . सामान्य माणूस आजही आपल्याच रक्ताच्या नात्यात गटबाजी करत आहे पण असामान्य बुद्धिमत्ता घेऊन जन्मलेले शास्त्रज्ञ माणूस जगला पाहिजे यासाठी १६६६ सालापासून बाहेरून रक्त देण्याचे प्रयोग करत होते. 

धर्म जात वर्ण प्रांत या सगळ्या पलीकडे जाऊन आपण लावलेला शोध हा केवळ लोककल्याणासाठी व्हावा यासाठी १९०३ साली आपल्याच शोधाचं पेटंट नाकारणारी ज्याची किमंत ७० लाख रु होती अशी मेरी क्युरी वाचताना विद्वत्तेची नैतिकतेशी जुळली नाळ निःशब्द करते. 

'का आणि कसे हे दोन प्रश्न विचारीत राहण्याच्या काही माणसांच्या सवयीमुळे विज्ञान पुढे जात' अशा प्रश्नांना लहानपणापासूनच ध्यास बनवणारे चंद्रशेखर व्यंकटरामन यांच्याबाद्द्ल वाचताना गुलामगिरीतल्या भारतातही संशोधनाची बीजं रुजली होती हे लक्षात येत. हरगोविंद खुराणा, सुब्रमण्यम चंद्रशेखर, जगदीशचंद्र बोस यांनी या गुलाम देशाला वैज्ञानिक दृष्टी देऊन विश्वाला दखल घ्यायला लावली हि गोष्ट अभिमान निर्माण करते. क्ष किरणांचा, इलेक्ट्रॉनचा, रेडिओचा, अमोनिया वायूचा, इन्शुलिनचा अशा अनेक शोधांची पार्शवभूमी सांगताना लेखकाने त्यातली उत्सुकता किंचितही कमी होऊ न देता सोप्यात सोप्या भाषेचा वापर केला आहे. 

तीन वेळा शांतीचा नोबेल पारितोषिक मिळवणारी १५० वर्षांची रेड क्रॉस संस्था आणि संस्थेच्या कार्यामध्ये वाहून घेणारा तिचा संस्थापक जो शेवटचे काही वर्ष भिकाऱ्याचे आयुष्य काढू लागला असा हेन्री ड्यूनात यांच्याबद्द्दल वाचताना भारावून गेल्यासारखं वाटतं. 

शालेय शिक्षण डोक्यात न गेल्याने वैद्यकीय दाखला देऊन शाळा सोडणारा गेल्या शतकातला महान शास्त्रज्ञ अलबर्ट आईन्स्टाईन वयाच्या १७ व्य वर्षी प्रकाशाच्या वेगाचा ध्यास घेतो आणि अनेक शोध जगापुढे ठेवतो. तर ६९ वर्षे संशोधन करून मधमाशांची भाषा जाणणारे फॉन फ्रिश, दोन वेळा नोबेल पुरस्कार दिल्यानंतर शाळेतून १२वी च सर्टिफिकेट मिळवणारे डॉ लिनस पाउलींग असे कितीतरी नोबेल लॉरेत (पुरस्कार विजेते) या पुस्तकातून आपल्याला भेटतात. 

डॉ. प्रबोध चौबे आय आय टी मधून पदवीधर पुढे रसायनशास्त्रात डॉक्टरेट मिळवलेले 'नोबेल कथा' या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, देशात भरीव संशोधन होण्यास वातावरण निर्माण व्हावं हे करणाऱ्या पिढीला घडवणारी शिक्षण पद्धती- पालक जागरूकता व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. 
लेखकाची तळमळ, उद्दिष्ट, अभ्यास याला सलाम. आपलं आयुष्य सुलभ करणारे हे शास्त्रज्ञ यांच्या कार्याची दखल प्रत्येकानेच घ्यायला हवी.

त्यामुळे हे पुस्तक सगळ्यांनी नक्कीच वाचलं पाहिजे .....

सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

३१ डिसेंबर

संगीताचा बदलता प्रवाह आणि आशाताई

व्यक्ती आणि वल्ली.