कर्मयोगिनी
लेखक : विजया जहागिरदार
अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील तेजस्वी कादंबरी
अहिल्याबाई म्हणजे मुत्सद्दी राजकारणी होत्या. अनेक सद्गुणांनी परिपूर्ण अशा होत्या... त्यांची ही तेजस्वी, बाणेदार, स्वाभिमानी बाजू वाचकांना कळावी असा ध्यास लागला. अहिल्याबाईंनी दानधर्मात खर्च केला असा आरोप टीकाकार करतात तेव्हा माझं मन उद्विग्न होतं. त्यांनी छावणीचे दिवसात पैसा कधी कमी पडू दिला नाही! हे खरे सत्य! त्यांच्यावरील आरोपामुळेच मी अस्वस्थ झाले. असेही म्हटले गेले की,'राष्ट्रीय भावनेच्या कर्तबगार माणसात अहिल्याबाईची गणना करता येत नाही. दुय्यम प्रतीची कर्तबगारी सुद्धा त्यांच्यात नव्हती. तटलेल्या राष्ट्रकाजास उघड उघड उपाशी मारून, कोट्यवधी पैसा केवळ स्वत:च्या लहरीखातर ब्राह्मणभोजनासारख्या लौकिक कृत्यास तीस वर्षेपर्यत उडवण्याचा त्यांना काय हक्क पोहोचत होता?' अहिल्याबाईवर कोसळलेले कौटुंबिक आघात पाहिले, तर त्यांच्या धार्मिक वृत्तीस कुणीही दोष देणार नाही. पती खंडेराव यांचा अकाली मृत्यू, त्यांच्याबरोबर सती गेलेल्या सवती, गौतमाबाई व मल्हारराव यांचे मृत्यू जरी वयोमानाप्रमाणे झाले तरी अहिल्याबाईंचा कौटुंबिक आधारच गेला. मल्हाररावांच्या दोन बायका सती गेल्या. पुत्र मालेराव अवघ्या बाविसाव्या वर्षी मृत्यू पावला. त्यांच्या दोन बायकांना सती जाताना अहिल्याबाईंनी पाहिलं. नातू नथोबा फक्त बावीस वर्षाच्या तरूण वयात वारला... त्याच्या दोन चिमण्या बायका सती गेल्या. अखेर राहिली मुलगी मुक्ता... पण जावई कॉलर्यासारख्या रोगास बळी पडला... मुक्ता तिच्या दोन सवतींसह सती गेली. एकूण पाच जिवलगांचे मृत्यू आणि अठरा स्त्रियांना सती जाताना ज्यांनी पाहिलं त्यांना या क्षणभंगूर जीवनाचं दर्शनच घडलं... अठरा सतींच्या किंकाळ्या त्यांनी ऐकल्या. संसाराचा हा उन्हाळा सोसून मरेपर्यंत ही बाणेदार स्त्री कुणासही शरण न जाता कर्तव्यकठोर कर्मयोग आचरीत राहिली. अब्रूच्या रक्षणासाठी तुकोजीची कर्जे निवारत राहिली. पैसा पुरवित राहिली. याचे कित्येक पुरावे आहेत. धर्मशाळा, विहिरी बांधण्यामागील तिचा सामाजिक दृष्टिकोन बघून थक्क व्हायला होते.मंदिरे, दर्गे याठिकाणी पूजेसाठी व व्यवस्थेसाठी सालिना उत्पन्न करून ठेवण्यामागची त्यांचीदूरदृष्टी बघून कुणीही चकित व्हावे. महादजी आणि राघोबाला त्यांनी जी बाणेदार उत्तरे दिली त्यांचं कौतुक माझ्या मनात फुलून आलं. तुकोजीला ज्या पद्धतीने त्यांनी वठणीवर आणलं, ठणकावलं ते सामर्थ्य त्यांच्या अध्यायाच्या पानोपानी मला प्रत्ययास आलं. ब्रह्मपुरीची स्थापना, वस्त्रोद्योग, ग्रामपंचायती यांच्या योजनेचं कार्य आजही अजोड ठरावं असंच! अहिल्याबाई धार्मिक होत्या, पण धर्मांध नव्हत्या. अशा या दिव्य स्त्रीच्या अंतर्मनाचा वेध घेणं सोपं नव्हतं. त्यांच्या अंतर्मनाचा वेध घेणारी ही चारशे पानांची कादंबरी.
सौ. मनिषा राजन कडव.
छान परीक्षण लिहिले ...!
ReplyDelete