*स्पर्धा !स्पर्धा ! स्पर्धा!*
*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद*
*पश्चिम मुंबई विभाग, विद्यमाने*
*शब्द भाव मोती साहित्य समूह,मुंबई आयोजित*
*काव्य स्पर्धा.*
*दिनांक:- ०९/०९/२०२२*
*स्पर्धा क्रमांक: ११*
*विषय:- देऊ निरोप बाप्पाला*
निरोप घ्यावा कसा गणेशा , कंठ दाटतो पुन्हा पुन्हा … ।
वर्ष सरावे कसे अनंता ,तुझ्या वीण उल्हास सुना …। १॥
येतो येतो म्हणताना , आला अन गेलाही तुवा …
शुभंकरा तू , चैतन्याचा उजळीत येशी शुद्ध दिवा …। २॥
वाजत येशी गाजत येशी , बहरूनी जाई जग अवघे …
वाद्यांच्या गजरात झीन्गते तुझ्या सभोती जग अवघे ,,,।३॥
तेहतीस कोटी देवदेवता नित्य तुलाची भजतात ….
प्रथमपुज्य तू सर्व जणांना , तुझी थोरवी स्मरतात …। ४॥
तुझ्या भोवती आम्ही रमतो , विसरून जातो रे अवधान ….
तुझी मूर्ती अन तुझी च सेवा , मनामनातून एकच ध्यान ॥ ५॥
मान पान , ऐश्वर्य , प्रसिद्धी , सारे ठरुनी जाते फोल …
रूप सुंदरा , तुझ्या समोरी अन्य कशाला नुरते मोल …। ६॥
तुझीच सारी किमयागारी , जादू म्हणू कि मायाजाल ….
स्वतः भोवती खेचून घेतो अवघी दुनिया करुनी कमाल …। ७॥
मंगल तू अति मंगलदायक , व्यापून विश्वाला उरतो …
तुझ्या कृपेने तिमिर हरोनी प्रकाश जगती अवतरतो …। ८॥
मोदक लाडू , फळे फळावळ तुजला अर्पण करताती …
नाव तुझे घेवून गणेशा , प्रसाद भक्षण करताती …।९॥
कुणी भुकेला इथे न उरतो , तुझ्या दर्शना जो येतो …
हा राजा तो असे भिकारी , भेद असा न मग उरतो …। १०॥
तुझ्या समोरी कुणी न मोठा कुणी न छोटा उरतो रे …
जाती भेद विसरुनी रंगते तुझ्याच रंगी जग सारे …। ११॥
कुणी ना इतुका अति प्रियवर तुझ्या वाचुनी गणराया ….
तुझ्या भक्तीचा महिमा मोठा , भान हरविते मन काया …। १२॥
दहा दिसांचे आगमन तुमचे , उधळीत येते सौख्याला …
परतुनी तुम्ही कशास जाता , सोडूनी अमुच्या भक्तीला …। १३॥
तुझे विसर्जन करतो आम्ही परी न रुचते तव जाणे …
पुढल्या वर्षी लवकर येरे , ऐकून जा हे गाऱ्हाणे …। १४॥
सौ.मनिषा राजन कडव.
कल्याण
Comments
Post a Comment