देव मला भेटला
*देव मला भेटला*
काहींनी तो मूर्तीत पाहिला
काही म्हणाले तो तर परमात्मा..
काहींच्या मात्या-पित्यात त्याची छाया
काहींना तो स्वतःतच भासला.
मी मात्र वेगळी असावी..
कारण,
मला देव शब्दांतच भेटला.
स्वतःवरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो
अशा काही ओळी वाचल्या होत्या
काही अक्षरे जोडली होती
काही छंद जमवले होते
पूजा स्वरांनी केली जेव्हा
आत्माही त्यात मी ओतला..
कारण,
मला देव शब्दांतच भेटला.
माऊलीची कूस असो की देवळाची पायरी
सुखाचं सिंहासन की ओसाड ओसरी
शिखरी उन्मादांच्या आणि निराश गर्तेत
कण कण जमवलेल्या यशाच्या वार्तेत.
प्रत्येकच ठिकाणी मी शोधली वर्णने
आणि त्यांना ओलावा बांधला
कारण
मला देव शब्दातच भेटला...
साऱ्या जगाला मी पहात आले आहे
नतमस्तक होताना देवांसमोर
कधी कुणा सत्पुरुषासमोर
कधी कुणा दगडासमोर
ती उच्चत्वाची भावना मला
दिसली कुठेच मात्र नाही
जी पाहून माझा श्वास थबकला
कारण
मला देव शब्दांतच भेटला
निथळत्या भावनेच्या अंगाअंगावरून
माझ्या मनाच्या सरळ तारा जोडणारे
काही उडणारे अन काही दडणारे
काही मात्र सावली बनलेले अबोल
शब्द शब्द इतके सारे जमले आहेत
त्यांचाच एक शब्द बनला
कारण
मला देव शब्दांतच भेटला.
सौ.मनिषा राजन कडव .
Comments
Post a Comment