वारी पंढरिची

*वारी पंढरीची*


जीव शिव ओवाळला
चला पांडुरंग भेटी
वारी पायदळ  चाले
वैष्णवांची झाली दाटी

टाळ मृदंग वीणा बोले
 तुळस डोईवर डोले
वारकरी चालताना
गुज अंतःकरणाचं खोले

झेंडे पताका वाऱ्यावर
घोडे बकऱ्या चालती
जागोजाग पांडुरंगी
भक्तीचे रिंगण घालती...

देह झाला हा पालखी
असा सोहळा रंगला
 मूर्ती सावळ्याची नयनी
 भोळा भाव वारीत दंगला

 वाटुली पाहे भक्तासाठी
 पांडुरंग उभा दारी
 उभी जिंदगी सारली
 आज घडली रे वारी

आता नको दाखवू बापा
वाट परतीची संसारात
धाड विमान विठ्ठला
माझा  जीव सांडो पदरांत

झाला संसार  मनभर
झाली हौस मौज सारी
जीवनाच्या शेवटाला
आलो देवा तुझ्या दारी

आता नको पाहू अंत
दार उघडून ठेव
पांडुरंग नाम मुखी
देह पालखीत ठेव

आली पंढरी कोसावर
परब्रम्ह आले दारी
मूर्ती सावळ्याची दिसली
झाली सफल जीवन वारी....!!!



सौ.मनिषा राजन कडव.

Comments

Popular posts from this blog

मोडी लिपीचा इतिहास

३१ डिसेंबर

किओस्क म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व.*