बरसल्या श्रावणधारा
*बरसल्या श्रावणधारा* (कविता )
खिडकीतून वेध घेत
मन फुलपाखराप्रमाणे बागडत
धावत.........सुसाट पळत
उंच उंच गरुडझेप घेत
अशा बरसल्या श्रावणधारा ||१||
रंगबिरंगी पक्षी...प्राणी
माना डोलत आनंदाने नाचतच
रेशीम सरींना स्पर्श करीत
धुंदावणारे मन देखील
थुई थुई नाचणाऱ्या मोराप्रमाणे
नृत्य करू लागताच
अशा बरसल्या श्रावणधारा ||२||
इटुकल्या पिटुकल्या बालमित्रांची
साचलेल्या पाण्यात डुबक्या घेत
तरुण मन देहभान विसरून
ओल्या चिंब भावनेने शहारत
कुणा आपल्या माणसाची
स्मृती आठवत
धुंदपणे धुंदावून ओल्या पापणीत साचवत
अशा बरसल्या श्रावणधारा ||३||
खटयाळ वारा जरा छेडतच
पाना-वेलींच्या कानी कुजबुजत
बेभानपणे साऱ्या सृष्टीला हलवत
स्वतः मात्र बेहोशीत डोलत
भुलवी सारा पसारा
अशा बरसल्या श्रावणधारा ||४||
फुलांचे गंध मादकपणे शोषून
तृप्तपणे मिटून... सुखावून....
बेधुंद सुगंधाची लयलूट करून
ओल्या गारव्याशी हितगुज करीत
शहारणाऱ्या मातीला अधिकच वेडावून
अशा बरसल्या श्रावणधारा ||५||
धरतीवर जणू हिरवा शेला पांघरून
पाखरांशी संवाद साधत
छान मस्तपैकी
साऱ्या रसिक मनाला मोहवीत
अशा बरसल्या श्रावणधारा ||६||
सौ.मनिषा राजन कडव
Comments
Post a Comment